Home बातम्या पत्नीच्या खूनप्रकरणी मनोहर केतकरला अटक

पत्नीच्या खूनप्रकरणी मनोहर केतकरला अटक

0
पत्नीवर अनैतिक व्यवसायाचा संशय घेऊन आरोपीने हा खूनाचा प्रकार केला असून आपल्या पत्नीला फसवल्याप्रकरणी सदर आरोपी शिरोडा-महाराष्ट्र येथील आणखी दोन महिलांचा खून करण्याच्या तयारीत होता अशी माहिती पुढे आली असून गेले दोन महिने प्रामुख्याने जंगल परिसरातच पोलिसांचा ससेमिरा चुकवत हा आरोपी फरारी होता.

हल्लीच मडगाव येथे एका रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकाचे काम करण्यास तो आला असता याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर डिचोलीचे पोलीस पथक निनाद देऊलकर व सहकारी तसेच मडगावचे विभागीय तपास विभागाचे निरीक्षक रवी देसाई यांच्या सहकार्याने काल रात्री मनोहर केतकर याला अटक केली. दोन महिने डिचोली पोलिसांना त्याला पकडण्यासाठी जंगजंग पछाडले होते. मनोहर हा गुन्हेगाराची पार्श्‍वभूमी असलेला अट्टल गुन्हेगार असून विविध प्रकरणांसाठी पोलिसांनाही तो हवा होता.
डिचोली पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निनाद देऊलकर, बाबाजी आजगांवकर, नीलेश फोगेरी, सुरेंद्र केरकर, कालिदास पास्ते, सखाराम गावस, समीर गावस, प्रसाद गाड, सर्वेश नाटेकर, दत्ताराम बोर्डेकर, मडगावचे रवी देसाई, गोरखनाथ गावस या पथकाने आरोपीला ताब्यात घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. १८ नोव्हेंबर रोजी मनोहर केतकरने दुपारी २.३० वा. पत्नी मनीषा हिचा लाडफे येथे खून केला होता. मनोहरची पत्नी मनीषा गेल्या काही महिन्यांपासून शिरोडा येथे राहत होती. दि. १८ रोजी त्याने पत्नीला काम बघुया म्हणून डिचोलीत बोलावले. सकाळी मनोहर डिचोलीला आला व पत्नीला फोन करून डिचोलीत येण्यास सांगितले.
मनीषा ११.२० वा. बसने डिचोलीत आली. त्यानी एका हॉटेलमध्ये जेवण केले व पत्नीला लाडफे येथे एका पडक्या शेडमध्ये आणले. मनोहर पूर्वतयारी करूनच सोबत दोरी व इतर सामान घेऊन आला होता. मनीषाच्या डोळ्यांत मिरची पूड मारून हात बांधले, गळ्यात सुतळीचा फास आवळला व ओरड करू नये म्हणून तोंडावर चिकटपट्टी बांधली व त्यानंतर तो फरार झाला नंतर तो दोन महिने आमडगावच्या जंगलात वावरत होता. पत्नीचा खून केल्यानंतर मनोहरने आपल्या मुलाला दूरध्वनीवरून आपण खून केल्याचे सांगितले.