– विष्णू सूर्या वाघ
(भाग-४)
आधुनिक मराठी संगीत रंगभूमीचा पाया अण्णासाहेब किर्लोस्करांनी घातला हे सर्वमान्य आहे. समाजातील उच्चभ्रू व बुद्धिजीवी वर्गाला अभिरूचीसंपन्न, सुबुद्ध अशी करमणूक उपलब्ध नव्हती त्या काळात किर्लोस्करांनी एक नवे दालन उघडले आणि मराठी रंगभूमीला एक नवे नेटके डौलदार रूप बहाल केले. इतकेच नव्हे तर मराठी रंगभूमीला त्यांनी संगीताचे एक नवे लेणे चढवले. अण्णासाहेबांचे पहिलेच नाटक सं. ‘शाकुंतल’ हे रंगभूमीच्या उत्कर्षाचा जो काळ पुढं येणार होता त्याची नांदी ठरले. किर्लोस्कर कंपनीनं मराठी रंगभूमीवरील वैभवशाली पराक्रमी कालखंडाचा पाया घातला तर तिच्याच अपत्यानं- गंधर्व नाटक मंडळीनं- मराठी रंगदेवतेच्या कीर्तीमंदिरावर सोन्याचा कळस चढवला.
१९०५ साली गुरुद्वादशीच्या सुमुहूर्तावर बालगंधर्वांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यांनी प्रथम केलेली शकुंतलेची भूमिका रसिकांना स्वागतार्ह वाटण्याइतकी यशस्वी ठरली. या यशामध्ये देवलमास्तरांच्या तालमीचा वाटा फार मोठा होता. शंकरराव मुजुमदारांशी मतभेद होऊन शीघ्रकोपी देवल किर्लोस्कर कंपनीतून निघून गेले. त्यानंतरच्या बालगंधर्वांनी केलेल्या सुभद्रा, वसंतसेना व नंदिनी या भूमिका चिंतुबुवा गुरव व गणपतराव बोडस यांनी बसवून दिल्या. त्या प्रेक्षकांनी पसंतही केल्या. भाऊराव कोल्हटकरांची जागा कधीच भरून निघणार नाही असे सुरुवातीला बोडसांना वाटत असे. पण बालगंधर्वांनी आपले गाणे व अभिनय यांच्या बळावर भाऊरावांचा या भूमिकांवर उमटलेला ठसा हळूहळू पुसून टाकला.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘प्रेमशोधन’ या नाटकाच्या तालमी घेण्याचे काम नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर यांच्याकडे आले तेव्हापासून बालगंधर्वांच्या स्त्री-भूमिकांची मोहिनी प्रेक्षकांवर पडू लागली. ‘प्रेमशोधन’मधील इंदिरा या नायिकेच्या अभिनयकौशल्याबद्दल विशेष गाजावाजा होऊ लागला. ‘इंदिरेच्या साध्या वेषात नारायण मोह पडण्याइतका सुंदर दिसे’ असे त्यांच्याबद्दल बोडस यांनी म्हणून ठेवले आहे. या नाटकाचा खरा फायदा बालगंधर्वांना असा झाला की नाटकाच्या निमित्ताने त्यांचे अभिनयगुण खाडिलकरांच्या नजरेत भरले. तोवर खाडिलकरांचा लौकिक उग्र-प्रखर, तेजस्वी, गद्य नाटके लिहिणारे नाटककार एवढ्यापुरताच मर्यादित होता. बालगंधर्वांचे संगीत व अभिनय यांचा आवाका लक्षात घेऊन खाडिलकरांनी ‘मानापमान’ हे नवे नाटक किर्लोस्कर कंपनीला लिहून दिले. खाडिलकर- बालगंधर्व ही गुरू-शिष्यांची युती मराठी रंगभूमीवर युगप्रवर्तक ठरली.
बालगंधर्वांच्या ‘प्रेमशोधन’ नाटकातील इंदिरेच्या भूमिकेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक सुशिक्षित समाजात आणि विशेषतः कॉलेजवयीन युवावर्गात अत्यंत लोकप्रिय झाले. किर्लोस्करी नाटकांची पौराणिक चाकोरी कोल्हटकरांनी मोडली. नाटकाचे कथानक कल्पनारम्य होते. प्रयोगही बहारीचा होत होता. स्त्रीशिक्षणाची दारे तेव्हा खुली झाली होती व एक प्रकारचे मोकळेपणाचे वारे समाजात वाहू लागले होते. तरुणींच्या वेशभूषेत, भाषेत आणि हालचालीत एक प्रकारचा नवीन खेळकरपणा आला होता. त्याच्याशी बालगंधर्वांचे रंगभूमीवरील स्वरूप हे तंतोतंत मिळतेजुळते होते. सुसंस्कृत समाजाला बालगंधर्व हे आपल्या मुलीबाळीसारखे दिसू लागले व साहजिकच त्यांच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात ममत्वाची भावना निर्माण झाली. असं सांगतात की किर्लोस्कर कंपनीच्या पुण्याच्या मुक्कामात नाटकाचं अर्ध्याहून अधिक उत्पन्न कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळे मिळायचं. डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी तर म्हणे बालगंधर्वांवर बेहद्द खूश होते. त्यांची वरचेवर होणारी गाणी, त्यांना निरनिराळ्या क्लबमधून देण्यात येणार्या मेजवान्या, बक्षिसे, फोटो इत्यादींचा कॉलेजमध्ये अक्षरशः वर्षाव व्हायचा. नाटकी लोकांना, आणि विशेष करून स्त्रीपार्ट करणार्यांना समाज त्यावेळी तुच्छतेनं वागवीत असे. पण बालगर्ंधांच्या गोड, निष्पाप, लाघवी वागणुकीमुळे समाजाचा दृष्टिकोन हळूहळू निवळला. पुढल्या पंचवीस वर्षांत तर नटवर्गाला प्रशंसा व मान मिळू लागला. कलाकारांचा सामाजिक दर्जा वाढला तो बालगंधर्वांमुळेच यात तीळमात्रही शंका नाही.
दुसरी गोष्ट अशी की, बालगंधर्वांनी पुरुषांच्या तसेच स्त्रियांच्याही मनात सौंदर्य व शालीनता या बाबतचे नवीन संकेत रूढ केले. स्त्रीसौंदर्याचा आदर्श आणि नीटनेटक्या, तरतरीत परंतु शालीन सौंदर्याचा आदर्श म्हणजे बालगंधर्वांचे रंगभूमीवरील दर्शन असा पुरुष प्रेक्षकांप्रमाणे स्त्री-प्रेक्षकांचाही ग्रह झाला. त्या काळची जुनी अशिक्षित स्त्री उंची वस्त्रातही गबाळी वाटे. त्यात पुन्हा भरमसाठ अलंकारांची गर्दी! बालगंधर्व सादर करीत ती स्त्री मोजक्या अलंकारांत रंगभूमीवर प्रवेश करायची. तिच्या पोषाखात नेटकेपणा व टापटीपणा असायचा. केशरचनेत सौंदर्यदृष्टी असायची. तिच्या हालचालीतील मनोहर डौलानं, लाडिकपणानं प्रेक्षकांच्या चित्तवृत्ती उल्हासित व्हायच्या. म्हणून बालगंधर्वांच्या पोषाखाचं, संभाषण पद्धतीचं, हावभावांचं, केशरचनेच्या पद्धतीचं अनुकरण करणारी फॅशन महिलावर्गात हा हा म्हणता लोकप्रिय झाली. बालगंधर्वांनी नव्या पद्धतीचा शालू रंगमंचावर आणला किंवा ब्लाऊजमध्ये नवी फॅशन केली की त्या त्या व्यापार्याच्या दुकानात लोकांची गर्दी उसळू लागली. यात पुरुषही मागे नव्हते. जेव्हा ‘गंधर्व कॅप’ निघाली तेव्हा पुरुषांनीही ती अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. त्यावेळचे एक छायाचित्रकार दादा लाडू हे तर दर नाटकाच्या वेळी बालगंधर्वांचे निरनिराळ्या स्त्री-भूमिकांतील फोटो छापून ते अर्धा आणा पोस्टकार्ड व चार आणे कॅबिनेट अशा साईजमध्ये विकायला ठेवायचे.
बालगंधर्वांचं हे आकर्षण पुढं वाढत गेलं. सर्वव्यापी बनलं. समाजातील सर्व थरांच्या लोकांत त्यांचं गायन आणि भूमिका ही अतिव जिव्हाळ्याची, कौतुकाची बाब होऊन बसली. बालगंधर्वांचा लौकिक इतका सर्वदूर पसरला की १९२७-२८ सालातील वर्हाडच्या दौर्यात वर्हाडातील सधन शेतकरीवर्गाच्या साहाय्यानं गंधर्व नाटक मंडळी दीडदोन लाखांच्या कर्जातून सहज मुक्त होऊ शकली. पुण्या-मुंबईकडील प्रेक्षकांची तर गोष्टच नको. नाटकाच्या जाहिराती थिएटरवर लागल्या रे लागल्या- तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांची झुंबड उडू लागली. हे वेड मराठी माणसालाच लागलं होतं असं नाही. गजांत लक्ष्मीत लोळणारे गुजराथी, भाटिये, खोजे, मुलतानी, नामांकित उद्योगपती, डॉक्टर्स, वकील, षौकीन मुसाफिर आणि मुंबई विश्वविद्यालयात शिकणारे परप्रांतीय विद्यार्थी यांच्यासोबत चोखंदळ स्त्री-प्रेक्षकांचीही गर्दी बालगंधर्वांच्या भूमिका पाहण्यासाठी थिएटरवर उसळू लागली. बालगंधर्वांची लोकप्रियता थेट आंध्र प्रांतापर्यंत पसरली होती. आंध्रातली वडीलधारी मंडळी बालगंधर्वांचं नाटक पाहायला मिळावं म्हणून पुण्या-मुंबईचे दौरे करत. नाटक कंपन्या बालगंधर्वांच्या रिकॉर्डस् विकत घेत. बालगंधर्वांच्या रिकॉर्डस् संग्रही असणं ही त्याकाळी महाराष्ट्रात खरोखर प्रतिष्ठेची बाब मानली जात असे.
बालगंधर्वांना जी असामान्य कीर्ती व लोकप्रियता अत्यंत थोड्या अवकाशात लाभली त्याचे कारण त्यांच्या अंगी असलेले असामान्य नैसर्गिक गुण हे तर आहेच; परंतु या गुणसमुच्चयाव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे बालगंधर्वांचे सांगीतिक बलस्थान. सर्वसाधारणपणे दृष्टिक्षेप टाकला तर सहज लक्षात येते की गद्य नाटकांपेक्षा संगीत नाटके अधिक लोकप्रिय झाली. आणि गद्य भूमिका करणार्या नटांपेक्षा संगीत भूमिका करणारे नट प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले. संगीताचं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर एवढं झालं की गाता येणं हेच नटाचं सर्वाधिक महत्त्वाचं ‘क्वालिफिकेशन’ बनून राहिलं. त्यांच्या गाण्यातील कुवतीवरून त्याची नाट्यकुशलता अजमावण्यात येऊ लागली. एवढंच नाही तर गायक म्हणजेच नट व नट म्हणजेच गायक असं मानण्याची प्रवृत्ती त्या काळी वाढत गेली. बालगंधर्वांचे सुंदर दर्शन, गोड अभिनय आणि स्वर्गीय गायन या अपूर्व अशा त्रिवेणी संगमामुळे एका मोहमयी नगरीत संचार केल्याचा भास रसिकांना सतत होत राहिला.
बालगंधर्वांची लोकप्रियता शिगेला पोचण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांना थोर थोर व्यक्तींचं पाठबळ मिळालं. १९०५ साली, अत्यंत लहान वयात ते कोल्हापुरात अपय्याबुवांकडे गाणे शिकायला आले तेव्हा करवीर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या गाण्यावर खूश होऊन त्यांना आपल्या मर्जीतील किर्लोस्कर नाटक मंडळीकडं पाठवून दिलं. शाहूमहाराजांसारख्या छत्रपतींनी मुद्दाम किर्लोस्कर कंपनीकडं पाठवलेला मुलगा म्हणून त्यांच्याभोवती कुतूहलाचं वलय निर्माण झालं. शाहूमहाराजांप्रमाणेच लोकमान्यांकडेही बालगंधवांच्या लोकप्रियतेचं श्रेय जातं. नारायण राजहंस या बालकलाकाराला ‘बालगंधर्व’ करण्याचं काम टिळकांनी केलं. ही पदवी त्यांना कायमची चिकटली ती एवढी की ‘नारायणराव’ हे मूळ नाव विस्मृतीत गेलं. पुढं गंधर्व मंडळी स्थापन करण्यापासून शेवटपर्यंत काकासाहेब खाडिलकरांनी त्यांना अनेक प्रकारचं साहाय्य केलं.
बालगंधर्वांच्या आजूबाजूला उभा असणारा नटवर्गही अव्वल दर्जाचा असायचा. नटश्रेष्ठ गणपतराव बोडस, पंढरपूरकरबुवा, विनायकबुवा पटवर्धन, मास्तर कृष्णराव, रघुवीर सावकार, शंकरराव सरनाईक, माधवराव वालावलकर, गंगाधरपंत लोंढे, श्रीपादराव नेवरेकर, सदुभाऊ रानडे, देवधर आणि भांडारकर अशा मौल्यवान नटरत्नांच्या वेळोवेळी झालेल्या संचाला गंधर्व कंपनीचे कोंदण अगदी शोभून दिसे. मखमलीचा पडदा, रंगमंचावर अंथरलेला भला मोठा भरजरी मखमली गालिचा, उंची भरजरी वस्त्रे, शेले, शालू, अलंकार, सोन्याचांदीचे मुकुट, शस्त्रास्त्रे आणि कलापूर्ण देखावे- कलामहर्षी बाबूराव पेंटरांच्या कुंचल्यातून खाली पृथ्वीवर उतरलेली गंधर्वनगरी! केशवराव कांबळे आणि कादर बक्ष यांची ऑर्गन-सारंगीची साथ आणि तबल्यावर अहमद जान तिरखवॉं! विनायकबुवा पटवर्धन आणि कृष्णामास्तरांचा साथवाल्यांबरोबर लढला जाणारा श्रवणीय अटीतटीचा सामना तर बालगंधर्वांचे साथीशी एकजीव झालेले अमृतमय गायन- सारे कलाधुंद वातावरण! गानमहर्षी अलादियाखॉंसाहेब म्हणत की मला गाणे ऐकण्याची इच्छा झाली तर मी गंधर्व कंपनीच्या नाटकाला जातो आणि बालगंधर्वांचे गाणे ऐकतो! तर मग साधासुधा संसारी गानलुब्ध रसिक मग तो- मराठी असो, गुजराती असो वा मद्रासी असो- बालगंधर्वांच्या गायनाने वेडापिसा व्हावा यात नवल ते काय?
महाराष्ट्राची संगीतातील रसिकता सिद्ध झाली आहे. अनेक खानदानी मुसलमानी गवई उत्तरेकडून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झाले. मराठी रसिकांची मनपसंत दाद मिळते म्हणून त्यांनी राजाश्रयदेखील झुगारून दिला होता. महाराष्ट्रातील संगीतकलेच्या सर्वांगीण उत्कर्षाला अनेक थोर नामवंतांचे परिश्रम कारणीभूत झाले. परंतु महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताची आवड किर्लोस्कर कंपनीने रुजविली हे मान्य करावयास हवे. नानासाहेब जोगळेकरांच्या प्रेरणेने गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाखाली भारत गायन समाजाची स्थापना झाली. गंधर्व कंपनीच्या कारकिर्दीत विद्यालयाच्या मदतीकरिता नाटके, जलसे करण्याचा प्रघात होता. गु. बखलेबुवा, मास्तर कृष्णराव आणि बालगंधर्वांची खास बैठकीची गाणी घडवून आणण्याची नित्य आणि नैमित्तिक कामगिरी वेगवेगळ्या गावी अनेक गायन क्लास करून दाखवीत होते. पुढे पुढे मास्तर कृष्णरावांचा जलसा ही एक अवीट अशी मेजवानी ठरली. बालगंधर्व मोठ्या संतोषाने त्यांना हव्या त्या सवलती देत असत आणि आपल्या गुरूचे गाणे पुढे चालवीत आहेत म्हणून धन्यता मानीत. पंढरपूरकरबुवा, मास्तर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन अशा गुणी संगीत कुशल नटांचा संग्रह करून गंधर्व कंपनीचा नाट्यप्रपंच बालगंधर्वांनी मोठ्या अभिमानाने चालविला.
आपल्याबरोबर काम करणारी मंडळी नीटनेटकी दिसावी याबद्दल बालगंधर्व फार दक्ष असत. जरीचे किंवा रेशमी कपडे आपणच वापरत असे नाही तर आपल्याबरोबरीच्या सर्वांना चांगला कपडा घेऊन त्यांना कोणत्याही तर्हेची न्यूनता ते कधीच ठेवत नसत. आपण तेवढे चांगले कपडे वापरायचे व इतर मंडळींना कसले तरी कामचलाऊ कपडे द्यायचे हे त्यांना माहीतच नव्हते. द्रौपदी नाटकातल्या विदुराला किंवा मयासुरालासुद्धा त्यांनी जरीच्या कपड्यांनी सजवून टाकले होते.
त्यांच्या कंपनीतील भोजनाची व्यवस्था तर फारच वाखाणण्यासारखी होती. कंपनीत जेवण इतके चांगले असायचे की मोठमोठ्या सरदार-दरकदारांनासुद्धा ते पाहून आश्चर्य वाटायचे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना सारखे भोजन असे. पंक्तिप्रपंच केलेला बालगंधर्वांना खपत नसे.
बालगंधर्वांच्या लोकोत्तर गुणांवर लुब्ध होऊन जनताजनार्दनाने त्यांच्यावर सतत पैशांचा पाऊस पाडला. कंजूषी करून द्रव्यसंचय न करता रंगभूमीच्या सेवेत तो त्यांनी सारा पैसा उदार हाताने खर्च केला. रंगभूमीचे वैभव वाढविले आणि बरोबरीच्या कलावंतांच्या प्रपंचाची नीटनेटकी काळजी घेतली.
बालगंधर्वांचे महाराष्ट्रावर फार मोठे ऋण आहे. मराठी रंगभूमीच्या उज्ज्वल कीर्तीचा झेंडा त्यांनी भारतामध्ये उंच फडकवत ठेवला हे तर खरेच, परंतु बालगंधर्वांनी महाराष्ट्रातील स्त्रीला कुलीन स्त्रीने शृंगार कसा करावा याचे धडे दिले. पुरुषांना रसिकता आणि सौंदर्यदृष्टी देऊन कायमचे उपकृत केले. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील वैभवशाली गंधर्वयुगाने महाराष्ट्राचा चेहरामोहरा तरतरीत, टवटवीत केला आणि त्यांच्या कलाविषयक आवडीनिवडी उच्च पातळीवर नेऊन सोडल्या.
असा लोकोत्तर अभिनेता शतकाशतकांतून एखादाच निर्माण होतो असे म्हटले जाते. कला प्रांतातील एवढा नावलौकिक मिळविण्याआधी बालगंधर्वांनी आयुष्यभर किती अपार कष्ट घेतले असतील हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
किर्लोस्कर कंपनीत येऊन दाखल झाल्यानंतर पहिल्या भूमिकेचा गाजावाजा होण्यात त्यांच्या आयुष्यातील पाचसहा वर्षे खर्ची पडली होती. उमेदवारीच्या काळातील तळमळीने परिश्रम करीत राहण्याच्या वृत्तीमध्ये त्यांनी पुढेही कधी बदल होऊ दिला नाही. आपल्या ऐन वैभवाच्या काळातही रंगभूमीवर कधी चुकारपणा केला नाही. आपल्या भूमिकेशी एकरूप, एकजीव होऊन ते रंगभूमीवर वावरले म्हणून त्यांनी केलेल्या भूमिका अमर ठरल्या. त्यांची कलोपासना अमर झाली.
(क्रमशः)