Home बातम्या थकलेल्या माणसाची दमदार कहाणी

थकलेल्या माणसाची दमदार कहाणी

0

‘इफ्फी’ मध्ये काल ‘साला बुढा’ चित्रपटाने रसिकांची मने जिंकली. त्याचे दिग्दर्शक सभ्यसाची मोहापात्रा यांची घेतलेली मुलाखत.

मुलाखत : अंतरा भिडे

 आपल्या चित्रपटाच्या नावातच ’साला’ आहे. ह्या संदर्भात त्या शब्दाचा काही वेगळा अर्थ आहे का?

सभ्यसाचीजी : चित्रपटाच्या संदर्भातच नव्हे, तर ओडीसामध्ये सगळीकडे या शब्दाचा निराळा अर्थ आहे. भारतभर साला हा शब्द एखादी शिवी म्हणून वा बायकोचा भाऊ या नात्याला संबोधण्यास वापरतात. पण आमच्या गावी हा शब्द प्रेमाने संबोधण्यास वापरतात! 

 ह्या सिनेमाच्या कहाणीविषयी थोडंस?

सभ्यासचीजी : ही कथा माझे वडील कपिलेश्वर सभ्यसाची यांनी १०० वर्षांपूर्वीच्या पृष्ठभागावर लिहिली होती. या पुस्तकासाठी त्यांना गेल्या वर्षीच साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला. एका अशा म्हातार्‍या माणसाची ही कहाणी आहे, जो गावातील सगळ्यांसाठी आपला जीवही त्यागायला तयार असतो. गावातील माणसांना हवी तेव्हा हवी तेवढी मदत करतो, योग्य सल्ले देतो, देवावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करतो आणि गावाला मोठ्या संकटातून वाचवतो. पण त्याच्या सल्ले देण्याच्या आणि खूप बोलण्याच्या स्वभावामुळे तो गावात प्रेम मिळवू शकत नाही,
सगळे त्याला टाळतात, त्याच्याशी बोलायला येत नाहीत. हीच दशा आपल्या संपूर्ण जुन्या पिढीची झालेली दिसते आहे. म्हातार्‍यांना कुणी किंमत देत नाही, त्यांना हिणवतात, कमी लेखतात. खरं तर २०३५ पर्यंत, प्रत्येक चौथा माणूस म्हातारा असणार आहे. शेवटी जुन्या माणसांनाच जास्त अनुभव असतो, म्हणून त्यासाठी तरी निदान त्यांना जपायचं, ही शिकवण चित्रपट देतो. 

 या सिनेमाच्या एक नाही, तीन खासियती आहेत, त्या आम्हांला सांगा?

सभ्यसाचीजी : पहिली खासियत म्हणजे या सिनेमात भरपूर लोकनृत्य आहे. लोककला आहे. दुसरं म्हणजे हा सिनेमा संपूर्ण कृष्णधवल आहे. जुन्या  गोष्टीला कृष्णधवल रूप दिल्यावर ती गोष्ट वास्तववादी वाटते म्हणून, आणि ती कथेची गरज आहे म्हणूनही. आणि तिसरी खासियत म्हणजे, आपल्या सिनेमाचे जे नायक आहेत, अटलबिहारी पांडा ते ८३ वर्षांचे आहेत! आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सिनेमातील संवाद त्यांनी लिहिलेले आहेत, ते एक नाटककार आहेत. 

 सिनेमात तुमच्या परिवाराचा खूप हातभार लागला आहे?

सभ्यसाचीजी : हो, चित्रपटात माझ्या भावांनी खूप हातभार लावला. एक भाऊ निर्माता आहे, दुसरा उप-निर्माता, तिसरा एडिटर, चौथा कला-निर्देशक, पाचवा कॅमेरामन,  मुलगा निर्देशक आहे, भाची उप-निर्देशक, आणि भाचा असिस्टंट कॅमेरामन.

 चित्रपटात नव्या कलाकारांनी काम केले का?

सभ्यसाचीजी : हो, चित्रपटातील सगळेच कलाकार नवीन आहेत. फक्त दोन कलाकारांनी पृथ्वीराज नायक आणि रतन मिहिर यांनी पूर्वी ओडिया चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. 

 चित्रपटातील संगीताबद्दल थोडेसे सांगा 

सभ्यसाचीजी : हे संगीत म्हणजे शुद्ध लोकगीते आहेत. चित्रपटात घुडका नृत्य, हुलीया नृत्य आणि संबलपुरी नृत्यासारखी अनेक लोकनृत्ये पहायला मिळतात. ज्यातील अनेक फार जुनी आहेत, आणि आज कुणी करत नाही. चित्रपटाच्या द्वारे जुन्या लोकगीतांना नवजीवन देण्याचा विचार केला आहे. संगीत निर्देशन घाशीराम मिश्र आणि पंकज जाल या मूळ लोककलाकारांनी दिलेले आहे.  

 हा चित्रपट संबलपुरी उपभाषेत आहे. अशा प्रकारचे उडिया चित्रपट यापूर्वी आपण केलेत का? आपले आणखी कोणते चित्रपट लोकप्रियतेनुसार समाधानकारक ठरले?

सभ्यसाचीजी : हो. २५  वर्षांपूर्वी मी ह्याच उपभाषेत एक चित्रपट केला होता. त्याला स्पेन आणि फ्रान्सच्या चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये स्थान मिळाले होते. मी आजपर्यंत फक्त दहात फिल्म्स केल्या आहेत. त्या सर्व लोकप्रिय आहेत. बाकी सगळ्या लघुचित्रफिती आहेत. माझा यापूर्वीचा एक चित्रपट जय जगन्नाथ फार लोकप्रिय ठरला. तो १५ भाषांमध्ये भाषांतरित झाला होता.

 साला बुढा हा चित्रपट या विभागातील इतर चित्रपटांमध्ये उठून दिसतो आहे, याचे कारण काय? आणि आपल्या प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहेत?

सभ्यसाचीजी : चित्रपटातील अतिशय साधी – सरळ गोष्ट, त्यातील आकर्षक संगीत आणि त्याचा सांस्कृतिक अंदाजच चित्रपटाला जय मिळवून देतो आहे असे मला वाटते. गेल्याच आठवड्यात आम्ही कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेतला होता. तिथे प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रचंड होता. इथेही बराच प्रतिसाद प्रेक्षक देतील, अशी आशा आहे. 

 आपण म्हणालात चित्रपटातले सगळे कलाकार नवीन आहेत. मग चित्रपट बनवताना त्यांना प्रशिक्षण देण्यात कोणते अडथळे आले?

सभ्यसाचीजी : नव्या कलाकारांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही भरपूर कार्यशाळा घेतल्या. संगीत आणि नृत्यातून त्यांना मजा करत शिकवण्यात आले. खरे तर हे सारे मुळातच कलाकार आहेत. कला त्यांच्या अंगात भिनलेली आहे. सगळे लोककला जाणणार्‍या कुटुंबातून आलेले आहेत. इथेही यंदाच्या इफ्फिमध्ये त्यांनी कितीतरी वेळा लोकनृत्य सादर केली. 

 आपल्या पुढच्या चित्रपटाबद्दल थोडेसे सांगाल?

सभ्यसाचीजी : पुढचा चित्रपटही माझ्या वडिलांनी लिहिलेल्या ’आदिमो विचार’ ह्या कथेवर आधारित आहे. ही कथा जुन्या माणसाच्या नैतिक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर भाष्य करते. 

 पुढच्या इफ्फिकडून आपल्या फिल्मसाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत?

सभ्यसाचीजी  : इफ्फिमध्ये प्रादेशिक चित्रपटांची संख्या अजून वाढली पहिजे. असे चित्रपट प्रत्येक प्रदेशात आवर्जून बनवले गेले पहिजेत. आणि लोककलांना चित्रपटांद्वारे जगासमोर आपण आणले पाहिजे. अशा चित्रपटांना इफ्फिकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळावे एवढीच अपेक्षा आहे.