– बबन भगत
इफ्फीत सिनेमा बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जगभरातील सगळ्या प्रकारचे चित्रपट या महोत्सवात असतात. शिवाय सुंदर असे वेगळ्या विषयावरील लघुपटही याच महोत्सवात पहायला मिळतात. तुमचं अनुभवविश्व तर ते वाढवतातच शिवाय तुमच्या ज्ञानातही भर घालतात. तुम्हाला समृद्ध बनवतात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विचार करायलाही लावतात.
असाच एक जीवन समृद्ध करून टाकणारा लघुपट म्हणजे ‘फेथ कनेक्शन्स’. (या लघुपटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटासारख्या काही व्यक्तीरेखाही त्यात आहेत.)
गंगा, जमुना आणि सरस्वती (सरस्वती आता अस्तित्वात नाही) यांच्या संगमावर होणारा कुंभमेळा हा या लघुपटाचा विषय आहे. त्या अर्थाने स्वत: कुंभमेळा हाच या लघुपटाचा नायक. चित्रपटगृहाचा संपूर्ण पडदाच हा कुंभमेळा अशाप्रकारे व्यापून टाकतो की सांगायची सोय नाही. कुंभमेळ्याला येणारे साधू-संत तेथील त्यांचा एकूण व्यवहार, त्यांचे वागणे, त्यांचे विचार, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचे तेथील दैनंदिन जीवन, तसेच कुंभमेळ्याला जाणारे लाखो लोक, त्यांची मनोवृत्ती, ईश्वराप्रती असलेली त्यांची श्रद्धा-अंधश्रद्धा, श्रद्धे व अंधश्रद्धेपोटी त्यांचं गंगा किनार्यावरील माती खाणं. तीर्थ म्हणून घाणेरडं पाणी पिणं, पाण्यात डुबकी घेऊन शाही स्नान करणं हे पाहताना कुंभमेळ्यातच असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
कुंभमेळ्यात दिसणार्या भाविकांपैकी सुमारे ८० टक्के भाविक असतात ते समाजातील सर्वात खालच्या स्तरातील लोक, अशिक्षित, अर्धशिक्षित, देवभोळे, अंधश्रद्धाळू. देव आपणावर प्रसन्न व्हावा, आपली सगळी पापं धुतली जावी अशी भोळी आशा बाळगणारे व त्यासाठी कुंभमेळ्यात कितीही त्रास काढायची त्यांची तयारी असते. त्याचा परिणाम असा होतो की कुणाचा मुलगा हरवतो, कुणाचा भाऊ, कुणाची बहिण तर कुणाचा पती. मात्र डोळ्यांत आसवं आणत त्यांचा शोध घेणं सुरू होतं. हरवलेल्या माणसांची तक्रार नोंद करण्यासाठी खास केंद्रही तेथे असतं.
कित्येक दिवस चालणार्या या कुंभमेळ्याला सुमारे २ कोटी लोक हजेरी लावतात. तेथे शाही स्नान घेतात. ढोंगी, गांजा ओढणार्या साधू-संतांबरोबर राहतात. घाणेरड्या वातावरणात शिजलेले अन्न खातात. ‘फेथ कनेक्शन्स’ या सर्व गोष्टी तपशीलवारपणे दाखवतो. एखाद्या हिंदी चित्रपटाएवढीच लांबी असलेला हा लघुपट.
भव्य असा त्याचा कॅनव्हास असून चित्रिकरणापूर्वी केलेल्या रिसर्चमुळे त्याच्या सौंदर्यात तर भर पडलेली आहेच. शिवाय तो परिपूर्णही झालेला आहे. त्याचं आणखी एक मोठं यश म्हणजे त्यातील व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखांमुळे हा लघुपट पाहताना एखादा अप्रतिम असा चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळतो.
घरी कुणालाही न सांगता कुंभमेळ्यात पळून आलेला व तेथील वातावरणात पूर्णपणे समरस झालेला १० वर्षांचा मुलगा ही या लघुपटातील मुख्य व्यक्तिरेखा. एक हटयोगी बाबा व त्याला मिळालेला एक छोटा मुलगा, अन्य कित्येक साधू-बाबा, संपूर्ण नग्नपणे शाही स्नानासाठी आलेले साधू व त्यांचा धिंगाणा, गंगा किनारी मुंग्यासारखे जमलेले भाविक यांचा मागोवा घेत-घेत हा लघुपट पुढे जातो.
आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार कुंभमेळ्याला जाऊन तेथील गंगेचं तीर्थ आणायला गेलेल्या पुत्राच्या प्रवासातून प्रेक्षकांना ‘फेथ कनेक्शन’ पहायला मिळतो.
फेथ…मध्ये काही दृष्ये अशी चित्रित करण्यात आलेली आहेत की, त्याला तोड नाही. कुंभमेळ्यातील जनसागर जो वेगवेगळ्यावेळी वेगळ्या पद्धतीने व वेगळ्या कोनातून चित्रित करण्यात आलेला आहे. तो बघताना कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा मेळा आहे याबद्दल मनात कोणतीही शंका राहत नाही.
फेथ…ची स्क्रिप्ट जबरदस्त तर आहेच पण त्याहीपेक्षा जबरदस्त आहे ते त्याचे सादरीकरण. फेथचा कॅमेरा ज्यापद्धतीने कुंभमेळ्याच्या गर्दीचं चक्रव्यूह भेदून आत शिरतो तो महाभारतातील अभिमन्यूसारखाच. त्यामुळे कुंभमेळयात लाखो लोक असतानाही उगाच नको तेथे गर्दी उसळी मारून कॅमेर्यावर येत नाही. पण गरज आहे त्या दृष्यांतून ती झोंबून अंगावरही आल्याशिवाय राहत नाही.
फेथमधील कठीण आसने घालणार्या, अत्यंत कठीण समजलं जाणारं गर्भासन घालणार्या आसन घातलेल्या अवस्थेतच उंटासारखा चालणार्या, झाडाच्या फांदीवर लटकन आसन घालणार्या हटयोगी बाबाला पाहताना वेगळंच काही तरी पाहिल्याचा भास होतो.
फेथमध्ये घरून पळून आलेला १० वर्षांच्या मुलाचं जे व्यक्तीमत्त्व आहे ते तर अगदी भन्नाटच. त्या मुलानं केलेल्या अभिनयाला तोड नाही. त्याला मोठं झाल्यावर डॉन व्हायचंय. मर्डर करायचेत. तो कुंभमेळ्यात सुरक्षेचं काम पहायला आलेल्या पोलिसांना ते उघडपणे सांगतो. मोठा झाल्यावर खरोखरच डॉन होणार अशी त्याची देहबोली. आणि कुठल्याही जाणत्या माणसाला हेवा वाटेल एवढी त्याची मॅच्युअरिटी. त्याचा बाप त्याला शोधत कुंभमेळ्यात येतो. तेथे त्याला तो सुदैवाने भेटतो. आणि बापाबरोबर त्याला गावी जावं लागतं. पण आता डॉन बनण्याचा त्याचा विचार बदललेला असतो. आता त्यालाही कुंभमेळ्यातील साधूसारखा साधू व्हायचं असतं. मोठा झाल्यावर साधू बनून कुंभमेळ्याला जाणार असं तो म्हणतो.
लघुपट संपतो तो एक वृद्ध माणूस कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी आपल्या आंघोळीच्चया पाण्यात मिसळून आंघोळ करतो त्या दृष्याने. त्याच्या मुलानं कुंभमेळ्यातून ते त्याला आणलेलं असतं.
हिंदू धर्म, कुंभमेळा, साधू संत, भोळे भाबडे भाविक यांच्याविषयी कोणतंही भाष्य न करता हा लघुपट खूप काही सांगून जातो.
उद्या याच ठिकाणी भेटू. आणखी एका कथेसह.