पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल माजगांवकर, करिअप्पा चंद्रप्पा नाईक (कर्नाटक) यांनी गोरखनाथ बराडे (५० महाराष्ट्र) यांचा चोर्ला घाटात नेऊन खून केल्याचे सांगण्यात आले.
गोरखनाथ बराडे हा इसम डिचोलीत एका आस्थापनात लोखंड भरण्यासाठी एमएच ०९ व्हीसी ५५६९ हा ट्रक घेऊन आला. दुसरा ट्रक घेऊन विशाल माजगांवकर व करिप्पा नाईक हे आले होते. गोरखनाथचा ट्रक भरल्यानंतर तो रत्नागिरीला कंपनीत माल घेऊन जायचा होता. त्याच्या समवेत त्याचा मुलगा होता. तो फोंड्याला गेल्याने तो येईपर्यंत गोरखनाथ गेटजवळ थांबला होता. याचवेळी विशाल व क्लीनर करिअप्पा आपला ट्रक केए २२ ए. ७७७४ घेऊन आले. यावेळी त्यांनी गोरखनाथशी मैत्री केली व त्याला दारुच्या दुकानात दारू पाजली व त्याचा विरोध असतानाही गोरखनाथचा भरलेला ट्रक घेऊन चोर्ला घाटात आले. दुपारी १.३० वा. हा ट्रक डिचोलीतून चोर्ला घाटात नेला. त्याठिकाणी दोघांनीही गोरखनाथचा खून करून त्याला अज्ञात स्थळी झुडपात फेकून दिले.
डिचोलीत गोरखनाथचा मुलगा आला असता त्याला ट्रक व वडिल न दिसल्याने त्याने शोधाशोध केली व पोलिसांना खबर दिली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेतली असता हा खूनाचा प्रकार लक्षात आला. नेसरी कर्नाटक येथे दोघेही आरोपी ट्रकसह पकडण्यात आले व त्यांनी चौकशी अंती गोरखनाथच्या खूनाची कबुली दिली. सदर ४ लाखांचे लोखंड भलत्याच कंपनीला विकून पैसे उकळण्याचा आरोपीचा डाव होता हे तपासात उघड झाले असून ३६३, ३९२, ३०२ व २०१ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपअधिक्षक गजानन प्रभुदेसाई, निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम वाळके, कालिदास पास्ते, सखाराम गावकर व बाबाजी आसगांवकर यानी ही कारवाई केली. पुढील तपास जारी आहे.