दरम्यान, सिमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज जम्मू काश्मीरला भेट देत आहेत. दुसरीकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी शस्त्रसंधीच्या वाढत्या उल्लंघनाचा निषेध व्यक्त करून हे प्रकार थांबत नसतील तर भारताने अन्य पर्यायांचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील आर. एस. पुरा, रामगढ, कंचक, अर्निया, चेकीनेक भागातील चौक्यांवर पाकिस्तानच्या बाजूने रविवारी संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता. यात एक सीमा सुरक्षा दलाचा जवान व विशेष पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. सीमाभागातील लोकांतही या घटनेमुळे घबराट निर्माण झाली.
दरम्यान, भारताच्याबाजूने सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले.
१४ ऑगस्टपासून पूंछ भागातील नियंत्रण रेषेच्या ठिकाणांबरोबरच जम्मू, सांबा आणि कथूआ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फैरी झाडण्याचे सत्र रोज सुरू आहे. यंदा आतापर्यंत १४० शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार नोंद करण्यात आले आहेत.
काश्मीरप्रश्नी अमेरिकेचा हस्तक्षेप नामंजूर
काश्मीरप्रश्नावर तोडग्यासाठी अमेरिकी हस्तक्षेपाची पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी काल भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळून लावली. काश्मीरचा प्रश्न दोन देशांचा असून त्यात तिसरा कोणीही सहभागी होऊच शकत नाही, असे ते म्हणाले. ही भारताची नवी भूमिका नसून जवाहरलाल नेहरुंच्या काळापासूनची ती भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.