राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही आरोप
बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात रक्ततपासणीसाठी जाणार्या रुग्णांची तेथे तपासणी केली जात नसल्याने त्यांना त्यासाठी खासगी रक्ततपासणी प्रयोग शाळांमध्ये जावे लागत असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसने पत्रकार परिषदेत केला.
यासंबंधी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, की गोमेकॉत एजंट बसत असून ते रक्त तापसणीस येणार्या रुग्णांकडून पैसे घेऊन त्यांना रक्त तपासणीसाठी खासगी इस्पितळात घेऊन जातात. काही वेळा रक्त तपासणीची गरज नसतानाही रुग्णांना ती करण्याचा सल्ला देऊन खासगी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये पाठवले जाते. काही एजंट रुग्णांना तेथे घेऊन जातात व त्या बदली त्यांच्याकडून पैसे उकळतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, नीट प्रवेश (वैद्यकीय) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गोवा सराकरवर ताशेरे ओढले होते काय, असा प्रश्न नुकताच झालेल्या गोवा विधानसभेत विचारण्यात आला होता. मात्र, त्या प्रकरणी सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले असताना नाही असे उत्तर सरकारने विधानसभेत दिल्याचे डिमेलो म्हणाले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष निळकंठ हळर्णकर हेही उपस्थित होते.