Home बातम्या गोमेकॉतील रक्त तपासणी घोटाळ्यासंबंधी स्पष्टीकरण द्या

गोमेकॉतील रक्त तपासणी घोटाळ्यासंबंधी स्पष्टीकरण द्या

0

कॉंग्रेसचे आरोग्यमंत्र्यांना आव्हान

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचे रक्त तपासण्याची सुविधा असतानाही तेथील रुग्णांना गाठून खाजगी तत्वावर रक्त तपासण्याचे प्रकार चालले होते. या घोटाळ्याची सरकार चौकशी करीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारावा, असे आव्हान प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल पत्रकार परिषदेत दिले.

वरील प्रकरणी गोमेकॉच्या डीननी परिपत्रकही जारी केले होते. त्याची पर्वा न करताच वरील प्रकार चालू आहेत. गोमेकॉच्या इतिहासात प्रथमच असे प्रकार घडत आहेत व तेथे रुग्णांना औषधेही मिळत नसल्याचा आरोप लॉरेन्स यांनी केला. वृत्त वाहिन्यांनीही या प्रकाराविरुध्द आवाज उठविला होता, असे असतानाही सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण येत नाही. गेल्या विधानसभा अधिवेशनात आपण हा विषय उपस्थित केला होता, त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रेजिनाल्ड लॉरेन्सना वाटेल ते बोलण्याची सवय झाली आहे, असा मंत्री पार्सेकर यांनी टोमणा हाणला होता, असे लॉरेन्स यांनी सांगितले. वरील प्रकरणी आपण पुरावे सादर करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.