Home Featured 6 पैकी 5 दरोडेखोरांना गोव्यात आणले

6 पैकी 5 दरोडेखोरांना गोव्यात आणले

0

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने दोनापावल आणि गणेशपुरी म्हापसा येथील दोन दरोडा प्रकरणांतील 6 पैकी 5 संशयित बांगलादेशी दरोडेखोरांना नवी दिल्लीतून काल गोव्यात आणले. दरम्यान, मेरशी येथील न्यायालयाने त्या पाच संशयित आरोपींना अकरा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने 14 एप्रिल रोजी मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत सहा बांगलादेशी दरोडेखोरांना अटक केली होती. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक संशयित बांगलादेशी दरोडेखोरांना ताब्यात घेण्यासाठी सोमवारी नवी दिल्ली येथे गेले होते. गोवा पोलिसांचे पथक 6 पैकी 5 संशयित बांगलादेशी दरोडेखोरांना घेऊन गुरुवारी सकाळी गोव्यात दाखल झाले. त्या पाच संशयितांना रेल्वेतून गोव्यात आणण्यात आले.

हे बांगलादेशी दरोडेखोर ‘हिट-रन-हाइड’ (हल्ला करून पळून जाणे आणि लपून बसणे) या रणनीतीचा वापर करून दरोडे आणि चोऱ्या करण्याचे काम करत असल्याचा आणि विविध राज्यांमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित आरोपींमध्ये सुमन हौलधर उर्फ पन्नू (35), सैफुल इस्लाम (31), सोहेल शेख (35), मोहम्मद नासिर (48), नूर इस्लाम उर्फ नदीम खान (56) आणि झाकीर (40) यांचा समावेश आहे. त्यापैकी 5 दरोडेखोरांना गोव्यात आणण्यात आले आहे.

6 पैकी 5 दरोडेखोरांनाच का आणले?
म्हापसा आणि दोनापावल येथील दरोडा प्रकरणातील दोघांना गोवा पोलिसांनी बंगळुरूतून अटक केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी हल्लीच आणखी 6 जणांना अटक केली. त्यापैकी 5 दरोडेखोरांनाच काल गोव्यात आणण्यात आले. एका दरोडेखोरांना का आणण्यात आले नाही, याचा उलगडा गोवा पोलिसांच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत होणार आहे.