विविध तालुक्यांत रॅबिजमुक्त गोवा मोहिम
रॅबिजमुक्त गोवा मोहिमेतंर्गत राबविण्यात आलेल्या लसीकरणासाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात एका महिन्यात 5000 पेक्षा जास्त कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील 14 आमदार आणि 4 मंत्र्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले.
गोवा सरकारच्या पशू संवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खाते आणि मिशन रॅबिज यांच्या संयुक्त विद्यमाने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गोव्याच्या अंतर्गत भागात सहा तालुक्यांतील 110 ठिकाणी विशेषतः पंचायत आणि पशुवैद्यकीय दवाखाने येथे ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी या मोहिमेत सक्रियपणे भाग घेतला.
गत 2022 तुलनेत यावर्षी विविध तालुक्यांमध्ये ही लसीकरण मोहीम यशस्वी ठरली आहे. वर्ष 2023 मध्ये महिनाभरात 5209 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात सासष्टी – 2699, मुरगाव – 663, केपे – 367, सांगे – 326, फोंडा – 464, तिसवाडी 690 लसीकरणाचा समावेश आहे. या लसीकरण मोहिमेत रॅबिजवर कसे नियंत्रण ठेवावे याविषयी जनतेमध्ये जागृती करण्यात आली. पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करणे विशेषतः अन्य भागांतून आणलेल्या कुत्र्यांचे लसीकरण आवश्यक आहे, हे आम्ही पटवून दिले आहे, असे मिशन रॅबिज, गोवाचे शिक्षण संचालक डॉ. मुरूगन अप्पुपिल्लई यांनी सांगितले.
कुत्र्यांच्या मालकांनी पुढील वर्षी पुन्हा एकदा कुत्र्यांचे लसीकरण करून घेतले पाहिजे. त्यांना आपल्या कुत्र्यांना लसीकरण स्थळी आणण्यात वाहतुकीची व हाताळण्याची समस्या येऊ शकते. एका वर्षात मित्र, कुटुंब आणि शेजारी यांच्या मदतीने कुत्र्यांना वाहतुकीची सवय करण्यासाठी प्रशिक्षण देता येईल. कुत्र्यांना वाहनातून प्रवास करण्याची सवय झाल्यास त्यांना लसीकरणासाठी ठरलेल्या ठिकाणी आणणे शक्य होणार आहे, असे प्रकल्प व्यवस्थापक ज्युली कोरफमट यांनी सांगितले.