5 दिवसांनंतर ‘तो’ ट्रकचालक अटकेत

0
5

पाच दिवसांपूर्वी धारगळ-सुकेकुळण ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा ‘लिंक रोड’ तयार करणाऱ्या कंत्राटदार अशोका कंपनीच्या ट्रकच्या धडकेत एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. या अपघातास कारणीभूत ट्रकचालक बसंत यादव हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ पेडणे पोलिसांनी गोव्यासह झारखंडमध्येही तपास केला होता. अखेर तो भुसावळ-जळगाव, महाराष्ट्र येथे पेडणे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला नंतर पेडणे पोलीस स्थानकात आणून रितसर अटक करण्यात आली.

16 जूनला झालेल्या अपघातात दुचाकीचालक नामदेव नारायण कांबळी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातास कारणीभूत ट्रकचालकाला त्वरित अटकेची मागणी केली होती. या घटनेनंतर फरार ट्रकचालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला होता; मात्र गेले 5 दिवस त्याचा थांगपत्ता लागू शकला नव्हता. ट्रकचालक बसंत यादव हा झारखंड येथे पळाल्याचा सुगावा लागताच पेडणे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला होता; मात्र तो सापडला नाही. अखेर तो भुसावळ येथे पेडणे पोलिसांच्या जाळ्यात सापडला.