310 कोटींच्या सहा प्रकल्पांना मंजुरी

0
15

>> गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत प्रस्तावांना संमती

>> 6 कंपन्यांच्या प्रकल्पांमुळे 2500 जणांना प्राप्त होणार रोजगार

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) काल झालेल्या बैठकीत 310 कोटी रुपये एवढ्या प्रस्तावित गुंतवणुकीच्या एकूण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे 2500 जणांना रोजगार प्राप्त होऊ शकणार असल्याचा विश्वास गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एक प्रस्ताव सोडल्यास अन्य सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना नमूद केले. लॉजिस्टिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासंबंधीही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या धोरणाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत ज्या सहा प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला, त्यात ब्रह्माकॉर्प ही कंपनी असून ती मोप विमानतळाजवळ थिम पार्क उभारणार आहे. मदर ओशियन प्रा. लि. ही कंपनी समुद्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिंपल्यातील मोत्यांची पैदास करणार आहे. त्याशिवाय मंजुरी देण्यात आलेल्या अन्य कंपनीत हॉटमिक्सिंगचे काम करणाऱ्या बागकिया बांधकाम कंपनीचा समावेश आहे. त्याशिवाय विजेवर चालणाऱ्या मोटरगाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कराड प्रोजेक्टस्‌‍ अँड मोटर्स लिमिटेड या कंपनीचा समावेश आहे. तसेच राज्यात पंम्पस्‌‍ आणि मोटर्सच्या उत्पादनासाठी किर्लोस्कर समूहाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मंजुरी दिलेले सर्व प्रकल्प हे स्वच्छ व प्रदूषणमुक्त उद्योग असल्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत जारी झालेल्या आकडेवारीतून गोव्यातील बेरोजगारी दर हा देशाच्या बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त असल्याचे समोर आले होते. यावरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका होत होती. आता या नव्या 6 प्रकल्पांमुळे रोजगार वाढणार असल्याने सरकारसह बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.