3 पतसंस्थांच्या थकित कर्जाच्या वसुलीवर भर

0
0

>> सहकारमंत्र्यांची माहिती; डिसेंबर अखेरपर्यंत अधिकाधिक रक्कम वसूल

व्हिजनरी पतसंस्था, अष्टगंध पतसंस्था आणि माशेल महिला पतसंस्थेतील थकित कर्जाच्या वसुलीवर दिला जात असून, डिसेंबर 2024 पर्यंत कर्जदारांकडून जास्तीत जास्त रक्कम वसूल केली जाईल. या पतसंस्थांत काही जणांनी बनावट नावाने कर्ज घेतलेली असून, अशी कर्जे घेणाऱ्यांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

या तीन पतसंस्थांतील थकित कर्ज वसुलीवर भर दिला जात आहे. कर्जाची थकित रक्कम वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वर्ष 2022-23 च्या पूर्वी या पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार झालेले असून, या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या कर्जदारांची 1 ते 5 लाखांपर्यंतची कर्जे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडून कर्ज वसुली करून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

म्हापसा अर्बन ही संस्था पुन्हा सुरू करण्यावर विचारविनिमय केला जात आहे. आरबीआयने कर्ज वसुलीमुळे संकटात सापडलेल्या म्हापसा अर्बनवर आर्थिक निर्बंध लादून ती बंद केली आहे. सरकारकडून म्हापसा अर्बनच्या कर्जदारांकडून कर्जाची वसुली करून गुंतवणुकदारांच्या ठेवी परत केल्या जात आहेत. म्हापसा अर्बन पुन्हा सुरू करण्याबाबत अजूनपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. तथापि, म्हापसा अर्बनला पतसंस्थेचा दर्जा देण्यावर विचार केला जाऊ शकतो, असेही शिरोडकर यांनी सांगितले.