27 राज्यांतील 554 स्थानकांचा होणार कायापालट

0
3

>> 19 हजार कोटी रुपयांचा खर्च; गोव्यातील सावर्डे व वास्को रेल्वे स्थानकांचा समावेश

भारतीय रेल्वे खात्यासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल 41 हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. दोन हजारांहून जास्त प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकट्या रेल्वे खात्यासाठी जाहीर केले. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत 554 स्थानकांची पुनर्बांधणी केली जाणार आहे, त्यासाठी 19 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे देशातल्या 27 राज्यांतील 554 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. या 553 रेल्वे स्थानकांमध्ये गोव्यातील 2 स्थानकांचाही समावेश असून, सावर्डे आणि वास्को रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री हे देखील उपस्थित होते. यावेळी 1500 ओव्हरब्रिज, अंडरपास यांचेही भूमिपूजन करण्यात आले. त्यात उत्तर प्रदेशात 252, महाराष्ट्रात 175, मध्यप्रदेशात 133, गुजरात 128, तामिळनाडूत 115, राजस्थानात 106, छत्तीसगड 90 आणि झारखंडमधील 83 प्रकल्पांचा समावेश आहे.

आपण पहिल्यांदाच 2 हजार योजना एकाचवेळी सुरू करत आहोत. रेल्वेच्या पायाभूत बदलांमध्ये महत्त्वाच्या बदलांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आतापासून ज्या गतीने काम सुरू आहे, ते सर्वांना चकित करणारे आहे. गेल्या अनेक दशकांपासून रेल्वेला स्वार्थी राजकारणाचे बळी व्हावे लागले. आज रेल्वे हा प्रवास सुलभतेचा एक भाग बनला आहे. आज रेल्वे मोठ्या बदलाच्या काळातून जात आहे, असेही मोदी म्हणाले.