अलक्ष लागले दिवे

0
1150

(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध)

 • डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री)

दिवे लागले रे दिवे लागले |
तमाच्या तळाशी दिवे लागले!
.. हे एवढेच रामाणी आपल्याला माहीत आहेत. याचा अर्थ आपल्याला फक्त ‘तम’ माहीत आहे, त्याचा ‘तळ’ माहीत नाही! कारण हा ‘तम’ शंकर रामाणी या ‘मराठी काव्यप्रभू’चा आहे व त्या तमाला ‘अमित’ अशा परिमाणांच्या ‘मिती’ आहेत. रामाणींच्या ‘तमा’ला प्रातिभ उंची आहे. आशयाचा पैस आहे आणि गहनाची खोली आहे. हा तम म्हणजे अंध:कार नव्हे. गूढाच्या तळाशी रामाणींनी आत्मसाक्षात्काराचे दिवे उजळले, त्याचा तो ‘उजाळा’ आहे, ‘उजवाड’ आहे…!
वर्षे लोटली.. रामाणी लिहीत असताना फक्त लिहीतच राहिले. लौकिक जगापासून सगळ्या बाबतीत दूरस्थ राहिले. तशी पुढे त्यांची कविताही आपल्यापासून थोडीशी दूरदूरच राहिली. रामाणी असताना त्यांनी स्वत: तिचा फार गाजावाजा केला नाही. सभा – संमेलनं, पुरस्कार, प्रसिद्धी या सगळ्या साहित्य व्यावहारिक गोष्टींपासून तिला त्यांनी कटाक्षाने दूर ठेवले आणि ते गेल्यानंतर त्यांच्या कवितेनेही तोच अलिप्तमार्ग धरला. म्हणून आपल्यापासून खूप दूर जाऊन बसलेल्या रामाणींच्या आत्ममग्न कवितेला त्यांच्या तमाच्या तळाशी असलेला हाच ‘उजाळा’- ओंजळीत येईल तितका- द्यायचा हा प्रयत्न आहे.
बाकीबाब बोरकरांनंतर गोव्यात मराठी कवितेचा मेणा शंकर रामाणींनी आपल्या ऋतुबहराच्या खांद्यावरुन वाहिला. खरं तर, बोरकर काय, रामाणी काय, दोन्ही ‘उटंगार पावसात’ भिजणारी लखलखती पाचूची बेटं! पण ‘पोएट बोरकरां’ना मिळाला तसा नक्षत्रांकित भाग्ययोग रामाणींना लाभला नाही. याची कारणं अनेक. पण त्यातलं महत्त्वाचं एक म्हणजे खुद्द रामाणींनीच कवितेचं हठयोगीपण स्वीकारलेलं. ते दु:खाच्या निबीड तळाशीच सदान्‌कदा ‘आषाढतंद्री’ लावून बसलेले. सर्वकाळ एकलेपणाची ‘वैशाखव्यथा’ पांघरून आपल्याच निमग्नकोशात असलेले. साहजिकच किंचित तुसडा, शिष्ट असा शिक्काही अवतीभवतीच्या माणसांनी कधीमधी त्यांच्यावर मारला, पण रामाणींना त्याचं काही लागून राहिलेलं नसे. त्यांनी स्वत:भोवतीचा कवितेचा कोश इतका घटमुट विणलेला की त्याच्याबाहेरच या सर्व गोष्टी राहत. अर्थात लौकिक जगाने, नात्यागोत्यांनी, माणसांनी दिलेले अनुभव, दु:ख, कटुता, हर्ष, प्रेरणा हे सारं काही त्या कोशातून दिव्याच्या उजेडाप्रमाणे आत झिरपे. कोशाच्या तळीची त्यांच्या काळजाची भिजमाती त्याचं पोषण करी. सृजनाच्या आसेची ऊब त्याला मिळे. वेदनेला लुसलुस मुळं फुटत. शब्दांची ‘चैत्रविभोर पालवी’ डोकावू लागे आणि ‘सलीलसुंदर सुवर्णी पंख पालवीत’ हे व्यथेचं झाड सर्वांगाने बहरू लागे..
मग ते कोणत्याही परिस्थितीत, वातावरणात असले तरी त्यांना (त्यांच्या भाषेत) ‘कविता येई!’ जशी पावसाची सर येते तशी! कविता सुचणे, कविता लिहिणे हे शब्दच त्यांना मान्य नव्हते. ती जेव्हा ज्या क्षणी येईल तेव्हा असतील तिथे, असतील तशा परिस्थितीत ती ते लिहून काढत. हे किस्से वाचताना अचंबित व्हायला होतं. ती अनेकदा पणजीत त्या काळी मांडवीच्या तीरावर असलेल्या नदी परिवहन खात्याच्या कार्यालयातल्या एका कारकुनाचं रुक्ष टेबल शोधीत येई. तशातच ते ड्राफ्ट बनवणे व अन्य कारकुनी कामेही निगुतीने करीत. पण मग त्यात प्रचंड कुतरओढ होई. काही गंमतीचे किस्सेही आहेत. रामाणींचे फुटबॉलच्या खेळावर अतिशय प्रेम. १९६० ची गोष्ट. ‘‘गोव्यातील पोलीस ग्राउंडवर फुटबॉलचा सामना बघत होतो. आणि सामना बघताना मला कविता आली. मग मॅच बघायचे सोडून ग्राउंड ओलांडून जवळच्या हॉटेलमधे आलो. एक पेन्सिल आणि सिगारेटच्या पाकिटावर भराभर कविता उतरवली-
अंधारात विराट विश्व विरते
नि:स्तब्धता लेवुनी
शून्याकार मनात मात्र अजुनी जागे
मुके वादळ (आभाळवाटा)
या कवितेपासून माझ्या कवितेचे रूप बदलले.’’
किंवा ‘‘डिसेंबर १९६२ मधे आळंदीला कार्तिकी जत्रेला ज्ञानेश्वरांच्या समाधीवर डोकं ठेवून आल्यानंतर चक्क दोन वर्षांनी –
पाप्यालाही भिडे आळंदीची वाट
मृदुंगते साथ वैष्णवांची
अबोलाचा बोल वाळवंटी रुजे
वांझ ऊर माझे परब्रह्म
ही ‘श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी’ (आभाळवाटा) कविता आली. आपले शब्द घेऊन आपोआप आली. ‘जी शब्दांच्या पलीकडे जाते तीच उत्कृष्ट कविता’असे मी मानतो.’’
‘‘एके दिवशी पाऊस सारखा कोसळत होता. बोचरी थंडीही होती. मला ही थंडी सहन होत नाही. अगदी त्रास होत होता. तरी बसलो होतो. दारातून चर्चवरचा क्रूस दिसला. ख्रिस्त आठवला. त्याची क्रूसिफिकेशनची वेदना, बोचर्‌या थंडीची वेदना- पाऊस- नंतर हळूहळू काळोखलेले वातावरण- काळेभोर होत गेलेले.. हे सगळे मनात रुजले. खूप दिवसांनी मनात कविता फोफावून आली- ‘काळीभोर हार्मनी!’ (गर्भागार)’’
हे असं सगळं होतं! तत्क्षणीच्या परिस्थितीचेच किंवा अनुभवांचेच पडसाद त्या कवितेत असतील, नसतील किंवा खूप जुनं काही त्यावेळी उसळून वर आलेलं असेल, कसंही असेल. जे काही येई, त्याला काही नियम नसे. तो फक्त एक अवसर किंवा एक भार असे. तो कधीही येऊन त्यांची परीक्षा घेई. ते वरून काहीही करत असले तरी सतत आतून कवितेशीच जोडलेले असत. सतत काव्यसमाधिस्त असत. व्यवहाराला तर अशा कलंदर कहाण्या सर्वथैव नापसंत! जगाला वाटणार्‌या या लहरी, एककल्ली स्वभावामुळे रक्ताची नातीही त्यांना दुरावलेली. पैसा-अडका, सुखासीनता ऐषाराम, चैन, मौजमजा या गोष्टी अर्थातच दूर सरकत गेलेल्या. खूप सोसावं, झिजावं लागलेलं. आणि अर्थातच यामुळे पायात ‘मोरवार्‌याचे घुंगुर बांधलेली’ त्यांची कविता दैवदुर्विलासाच्या तीक्ष्ण सुळाच्या टोकावरच कायम उभी राहिली! खोल वेदना, गाढ व्यथा व करकरीत एकटेपण यांची तुटल्या काचेच्या धारेसारखी ‘तिखट तार’ त्यांच्या कवितेत सर्वत्र दिसते, ती बहुधा याचमुळे असावी. पत्नीच्या गंभीर आजारपणात रात्री अगदी तातडीच्या वेळी यांना कविता येते.. कुठला तरी वेगळाच मूड घेऊन ‘दिवे लागले रे’ म्हणत येते..
दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे? कुणी जागले?
रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
तिथे मोकळा मी मला हुंगिताना
उरी गंध कल्लोळुनी फाकले…
उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्
उष:सूक्त ओठात ओथंबले…(पालाण)

‘‘१५ जुलै १९७० हा तो दिवस. माझी(प्रथम) पत्नी खूप आजारी होती. तिला हार्टडिसीज तर होताच, पण काही नवीनच आजार उद्भवला होता. तिला खूपच त्रास होऊ लागला. ताबडतोब हॉस्पीटलमधे घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युुलन्स् आणायला आमचा शेजारी गेला. तेव्हा मी त्यांची वाटच पाहत बसलो होतो. आत बायको अक्षरश: तळमळत होती. वेदनांनी ओरडत होती. अत्यंत निराशेचा असा तो क्षण होता. आणि.. आणि मला कविता आली! आपोआप आली. त्याचा या घटनेशी संबंध असेल किंवा नसेलही. कुणाला ठाऊक? त्या ओळी मनातून निसटून जाऊ नयेत म्हणून हातात मिळालं त्या कागदाच्या चिरोट्यावर खरडली.’’
पद्मजा फेणाणी यांनी आपल्या अमृतस्वरात अजरामर केलेल्या या कवितेतील ‘देहयात्रा’,‘तमाचा तळ’, ‘रित्या ओंजळी’, ‘दाटली पुष्पवृष्टी’, ‘आरक्त त्याच्या कृपेच्या कडा’ या सार्‌याची संगती हा संदर्भ वाचल्यानंतर आपल्याला थोडी फार लावता येऊ शकते.. आणि मनात आल्यावाचून रहात नाही की, अत्यंत निराशेच्या क्षणी ओठावर ‘उष:सूक्त’ आणणारं हे कोणतं पेटतं फुलांचं प्राक्तन? हा कुठला जलजाळ? हे कोणते निबीड तमाच्या तळीचे दीप..?
शंकर रामाणी यांची कविता समजून घेण्यासाठीची, आपल्या मनाची ओली भूमी तयार होण्यासाठी त्यांच्या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेच्या संदर्भातले हे काही मुद्दे त्यांच्याच शब्दांत सांगावेसे वाटले. रामाणींचा काव्यप्रवास फार देखणा आहे-
१) कातरवेळ ः
शंकर रामाणी यांच्या ‘कातरवेळ’या पहिल्या संग्रहाला पु. शि. रेगे यांची मर्मग्राही प्रस्तावना आहे. पु.शि.रेगे गोव्यात पणजीच्या कॉमर्स कॉलेजमधे व नंतर दोन वर्षे मडगावच्या चौगुले कॉलेजमधे प्राचार्यपदी होते. त्यांचे व रामाणींचे खूप स्नेहाचे संबंध होते. अर्थातच रामाणींच्या पहिल्या संग्रहाचं त्यांनी मनापासून स्वागत केलं. प्रस्तावनेत गुण दोष व मर्यादाही दाखवून दिल्या आहेत. खुद्द रामाणींना पहिल्या संग्रहापर्यंत स्वत:चा सूर सापडला नव्हता असं त्यांनीच एकेठिकाणी म्हटलं आहे. अनेक ज्येष्ठांचा प्रभाव त्या कवितेवर होता. हळव्या प्रीतीभावाच्या त्यातील कवितांमधे थोडासा एकसुरीपणाही जाणवतो, पण अर्थातच त्यात उत्कटता आहे. ‘स्पार्क’तर चटकन लक्षात येतोच, पण रामाणींना आयुष्यभर सतत जाणवणारे एकलेपण आणि आंतरिक व्यथेची गाथा या पहिल्या संग्रहापासूनच हळूहळू सुरू झालेली जाणवते व अदृष्टाची ओढही!
आली वादळाची रात
अंधारले आसपास
मन माझे आतुरले —
तुझ्या दर्शनास
माझा संपेना प्रवास!
कशासाठी लागला हा
तुझ्या भेटीचा हव्यास
माझे मलाच कळेना
चाललो कशास —
माझा संपेना प्रवास!
असं म्हणणारा कवी पुढे स्वत:चा मार्ग स्वत:च शोधू लागतो. या वाटेवर त्याला फक्त कविता सोबत हवी असते. सारखी तिचीच आस, सारखा तिचाच शोध..
माझ्या भोवताली नाही
कवणाची जाग
घेत एकला चाललो
मीच माझा माग
हले भीतीने सारखे
काळजाचे पान
कवणाच्या सांगाताचे
नाही समाधान
असा कवितेला शोधत प्रवास सुरू राहतो. आणि एकदा ती सोबतीण म्हणून मिळाल्यानंतर दिवस, रात्री, ऋतू, काळ, प्रेम, मोह इ. गोष्टींचं संवेदन कवितेमधे तरलपणे उमटू लागतं.
रात्र करी जागरण नक्षत्रांच्या नयनांनी
काळोखाच्या उशीवर जागी अजून अवनी
कौलांचिया शेजेवरी वारा पेंगतो खुशाल
त्याला घालतो आपुल्या माड मायेची पाखर
‘अमे’च्या रात्रीचं इतकं टिपूर वर्णन रामाणींनी केलं आहे. पहिला-वहिला अन् तरल प्रीतीभावही या संग्रहात जिथे तिथे उमटला आहे.
तुझ्या माझ्यामधे आहे उभा धुक्याचा हा पूल
रंग रंग पहाटेचे तेथे घेतात चाहूल
क्षण हसल्या, क्षण फुलल्या, खुलल्या तुझ्या
अधरपाकळ्या
नयनाच्या डोहात चमकल्या चपल जरा
मासळ्या
या लाटांचे कुंतल कुरळे,
फेनफुले वर शुभ्र माळिली
जवळपणाची, अनुरागाची,
रोजचीच अन् भाषा अधरी
अशा या कोमलकंठी कवितेत रमणीयशा निसर्गप्रतिमा येतात आणि साहजिकच बाकीबाबांची आठवण येते. ‘माझ्या गोव्यात भूमीत गड्या नारळ मधाचे’ आठवावी, अशी ही रामाणींची सुंदरशी ‘स्वैर भटकावे’ ही कविता. यातल्या पाटाच्या पाण्यात कडेकडेने खेळणार्‌या तांबड्याचुटुक पिटकुळीच्या फुलांच्या झाळी, न्हातीधुती अबोली, तुष्ट मशींग (शेवगा), जाईजुई, पानवेली, पोफळी हे सारं गोमंतकीय मनाचंच हिरवं जगणं-वाढणं- फुलणं आहे.
कधी स्वैर भटकावे कुळागरांत
शीतल गर्द मख्मली छायांची
घ्यावी अंगावर शाल
डोळे भरुन पहावे धुंद हिरवे वैभव
खुळ्या पाटाच्या पाण्याशी पिटकुळीचे लाघव
कशी छळते केळींना शीळ उनाड वार्‌याची
कानगूज मोगर्‌याचे न्हात्याधुत्या अबोलीशी
तुष्ट मशींग; पोपटी– पानवेलीचा विळखा;
तळी जुईचा कोमल भाव दर्वळला मुका
चिंच उभी तळ्याकाठी चाफा रुतला मनात..
वेड्या पोफळी उगाच तिला पाहती पाण्यात
मला घे, मला घे म्हणत ही झाडकळ, रानं, फुलं नि चांदणं जसं बोरकरांच्या कवितेत येत होतं, तसं ते रामाणींच्या कवितेलाही वेंगत येत असावं असं उगीचच मला इथल्या कुळागरांमधून फिरताना वाटतं आणि माझ्या कवितेलाही इथल्या पाचूरानाची अशीच ओली साद यावी अशी प्यास मनाला लागून राहते. एखाद्या संवेदनशील मनाला सृजनाची चाहूल लावण्याचं सुरेख सर्जन ही कविता करते.
बाकीबाबांच्या प्रतिमा आनंदमार्गी आणि यांच्या व्यथामार्गी, एवढा फरक मात्र! त्यामुळे रामाणींची कविता गाता गाता अवचित विराणीचे सूर लावते. बोलता बोलता मौन पांघरते. आणि पुन्हा अंधाराला मोहर फुटल्याची किमयाही करते. ही भाव-आंदोलनं आपल्याला विस्मयात बुडवणारी..
वेदनेच्या डहाळीला
माझी व्यथा झाली फूल
गर्द अंधाराला फुटे
जसा नक्षत्रमोहर
अवेळी अशी सांज ही दाटलेली
अवेळी कुणाची तृषा पावली
कळा अंतरीच्या कुणाला कळाव्या
थरारे इथे ज्योत ही एकली
‘कातरवेळ’ या पहिल्या संग्रहातून अशी एकल्या वाटेच्या तिमिरातून अंतर्मनातल्या तेजाकडे जाण्याची वाट कवीला दिसते.
काळरात्र झाली मीरा
पितां काळोखाचे विष
नक्षत्रांच्या आसवांनी
चिंब भिजले आकाश
काळोखाचं, एकलेपणाचं, वेदनेचं विष प्यायला ही काळरात्रीची मीरा दाट सावळ्या‘कातरवेळी’ सज्ज होते आणि कवीचं अंतरंग पहाटून येतं एवढं मात्र खरं..
२) आभाळवाटा ः
रामाणी व श्री. पु. भागवत यांचा फार स्नेह. आणि तो तेव्हापासूनच सर्वांना माहीत असलेला.. श्रीपुंनी कवितेला दिलेलं प्रमाणपत्र रामाणींना अंतिम महत्वाचं वाटे. ‘‘कविता म्हणजे अंगात बळेबळे अवसर आल्याप्रमाणे बडबडण्याचा प्रकार नव्हे. श्रीपुं ना विचारा’’ असं रामाणींनी डॉ. प्रल्हाद वडेरांना बेळगावहून लिहिलेल्या एका पत्रात सांगितलं होतं. (श्रीपुंचा फोटोही त्यांच्या घरात लावलेला होता. जयवंत दळवी मिस्कीलपणे त्या फोटोला नमस्कार करीत आणि पुढे जी.ए. असे अनेक किस्से डॉ. वडेर यांनी ‘आठवणीतले रामाणी’या लेखात सांगितले आहेत. तो लेख रामाणींची स्वभाववैशिष्ट्‌यं समजून घेण्यासाठी मुळातून वाचण्यासारखा आहे.) श्रीपुंचा म्हणजेच पर्यायाने सत्यकथेचा, किर्लोस्कर इ. नियतकालिकांचा त्यांच्या सर्जनप्रक्रियेमधे खूप महत्वाचा वाटा होता.‘सत्यकथे’चा अस्त ही त्यांच्यासाठी खूप धक्कादायक घटना होती. त्यांना ती एक ‘महान साहित्यिक दुर्घटना’ वाटली होती.सुरुवातीला रामाणी सातत्याने सत्यकथेकडे कविता पाठवित, पण श्रीपु त्या साभार परत करीत व त्याबरोबर त्यांचे पत्रही असे. ‘तुमच्या कविता केवळ उत्कटतेचा आभास निर्माण करतात. भिडत नाहीत’ असं श्रीपुंनी एकदा पत्रात लिहिलं होतं. अखेर ३१ ऑक्टोबर १९६० रोजी ‘अंधारात विराट विश्व विरते’ या कवितेने मला स्वत:चा सूर सापडला- माझी अस्सल कविता मला तेव्हा सापडली असं रामाणींनीच एका मुलाखतीत सांगितलं आहे. पुढे श्रीपुंच्या ‘मौजे’नेच ‘आभाळवाटा’हा संग्रह प्रकाशित केला आणि तिथूनच रामाणींची कविता स्वत:चा ठसा उमटवत लक्षणीय ठरू लागली.
अंधारात विराट विश्व विरते नि:स्तब्धता लेवुनी
शून्याकार मनांत मात्र अजुनी जागे मुके वादळ
कोठे गूढ तळी विचित्र हलती छाया खुज्या भेसूर
माझ्यांतील कुणी अशब्द तिथली हुंगी उदासीनता
निद्रेच्या थडग्यात जीव निजले. मृत्यूच मारी मिठी
प्रेतांना उबवीत जागत बसे आत्मा स्मशानांत या
मोहाचे घट फोडिले कितिक हे. वैय्यर्थ सारे पटे
दृष्टीला न दिसे असे अतुल मी काहीतरी पाहतो
मृत्यूची दुनिया कुठे विसरलो?ते सत्य आहे कुठे?
मेंदीहून सुरक्त नाजुक असा हाती तुझा हात गे!
अतिशय भेसूर असं अंधारचित्र (किंबहुना जगण्याचंच चित्र) संपूर्ण कविताभर रंगवताना ‘निद्रेच्या थडग्यात’, ’मोहाचे घट फोडिले कितीक हे’ अशा चपखल प्रतिमांमधून त्या जीवनचित्रातली वैय्यर्थताही तितक्याच ठळकपणे अधोरेखित होत जाते. आणि शेवटच्या दोन ओळींत चित्र एकदम बदलतं. जेव्हा ‘मेंदीहून सुरक्त नाजूक असा हात’ हाती येतो, तेव्हा खरी मृत्यूची दुनिया ती वर वर्णन केलेली नसून, मेंदीहून सुरक्त असणारी आरक्त मोहदुनिया ही खरी मृत्यूदुनिया असल्याची जाणीव कवीला होते.
‘कातरवेळ’ मधे एकदा प्रेमात, एकदा उदासीत, एकदा कातर, एकदा आतुर, कधी भग्न, कधी मग्न अशी इथे-तिथे विहरत आता रामाणींची कविता ‘स्व’चा शोध लागलेल्या ‘आभाळवाटां’वरून जाऊ लागलेली. स्वत:च्या क्षमता, शक्यता, पात्रता, मर्यादा, गुणवत्ता, स्वत:ची आस, प्यास या सगळ्याचं आकलन कवीला होतं आहे. कविता गवसली म्हणजे नवे नेत्र, अबलख पंख,अघटित विश्व असं खूप काही गवसल्याचं आकळतं आहे. ‘मला जन्मांधाला’ या कवितेमधे ही आत्मपरीक्षणाची नजर कवीला मिळाली आहे.
मला जन्मांधाला अवचित नवे नेत्र फुटले
मृगाच्या मातीचे नवल हिरवे खोल रुजले
मनाच्या मेघांचे धन पिकुनिया कुंभ झरती
अनंगाच्या रानी अवखळ फिरे जीण गरती
कविता गवसण्यापूर्वीच्या जिण्याला कवीने चक्क ‘जन्मांध’ म्हटलं आहे. मृगात खोलातून रुजू आलेलं हिरवं नवल, बरसणारे मनमेघांचे कुंभ, पंख फुटलेला अबलख घोडा, जरेच्या भोगांचं ढळणारं भगवं जीर्ण वस्र, तेजाचं सोनेरी वलय, नवीन वाटेने उडू लागलेले पक्षी अशा विविध विलक्षण प्रतिमा या कवितेत येतात. आणि त्यावरुन कवितेचे, प्रतिभेचे चक्षू कवीला किती दिव्य, सर्वदर्शी, सर्वस्पर्शी जाणवले आहेत याची कल्पना येते. कवीला पुढे असंही जाणवतं की, कुणाची तरी प्रकाशपावलं उरी उजळली आहेत. धुक्याची धूसर वाट, स्वप्नांचा अवघड घाट, व्यथेचा गाढ तिमीर त्या उजेडाने उजळला आहे. तो कसला उजेड आहे? सोहिरोबानाथांचा ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ इथे आठवतो. तेज तेच! ज्ञानदिव्याचं, भक्तीदिव्याचं; पण इथे रामाणींचे दिवे अलक्ष आणि तेही त्यांच्या ‘व्यथालयात’ लागलेले,ज्या व्यथालयात दु:ख कवीच्या कुशीत झोपलं आहे! ज्यांची लक्ष वगैरे मोजमापामधे गणती होऊ शकत नाही- असे हे- ‘‘अलक्ष लागले दिवे!’’— असं व्यथेच्या काळोखाच्या आरपार होणारं भरभरुन तेजाळलेलं संवेदन..
कुशीत दु:ख झोपले पिकून झोंबली निशा
विवस्त्र सावल्यांसवे नसांत वाहते नशा
अवेळ हुंगते कुणी मनात गंध माळुनी
धुक्यात वाट धुंडिते घरात वात लावुनी
तमात जीव गुंफिता सुदूर विश्व जागले
तुला न पाहिले; उरी तुझी प्रकाशपाऊले
नशेत स्वप्न वाहते उडून भागले थवे
व्यथालयांत माझिया अलक्ष लागले दिवे
(अलक्ष लागले दिवे)
अशा साक्षात्काराने आता ‘आभाळवाटा’ उधळल्या आहेत..‘चाफ्याहून तीव्र उन्हाचा वैशाखी घमघमाट अंतर्बाह्य’ आणि ‘विखारलेल्या तंद्रीची कर्पूरशुभ्र लय’ (उन्हाळा) असं रंग गंध स्पर्श संवेदन एकमेकांत मिसळून घेऊन या वाटा चालू लागल्या आहेत.. चैत्रपालवीचे रसरशीत झुंबर झाडांझाडांवर लागलेले बघत जावेत तसा प्रत्यय या कविता वाचताना येतो.
रात्र, ऊन, ऋतू, पाऊस, माती, तळे, झाड, अंधार, उजेड असे सृष्टीचे अनेक घटक या जणू एकेक भाववृत्ती झालेल्या या कवितेत आढळतात. या सर्व गोष्टी अनुभवण्याची एक विलक्षण परिसीमा अनेक ठिकाणी दिसते. आणि सुख, दु:ख, विरह, वेदना, तंद्री, आस, प्यास अशा भाव-भावना- संवेदना-कल्पना निसर्गघटकांची-घटितांची रुपं घेऊन येताना दिसतात. याचाच अर्थ रामाणींनी आशयाच्या गरजेनुसार अशा विविध प्रतिमाच वेगळ्या स्वरुपात कवितेत आणलेल्या दिसतात. ही त्यांची खास प्रतिमांकित शैली हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभवा’चा खोलवर प्रभाव रामाणींच्या प्रतिमाविश्वावर जाणवतो. त्या दिव्य प्रभावाचे अंश स्वत:मधे खोल मुरवून, मंथन केल्यागत आणि स्वत:चं वेगळेपण जपत ’स्व-सार’ काढावं तसे हे प्रतिमेचे दिवे लागल्याचं दिसून येतं.
ओसाड नसांत उन्हाचाच कोप
लावियेले रोप अव्यक्ताचे
सोसवेना खोल नि:शब्दाची झळ
काळोखाचा पीळ काळजाला (नहाण)
आज गंधून वेदना फुले, फळे तसूतसू
बावलेल्या ओंजळीत थोडे हसू..थोडे आसू..
(मेंदीरंगल्या मातीत)
गर्द उमाळा ओलावा रुजू घातलेले रोप
गात्रागात्रात तुडुंब ग्रीष्मगर्भ अनुताप
(दारी सादते कोकिळा)
याचाच अजून विचार करताना उदाहरणादाखल असं म्हणता येईल की, रामाणींच्या कवितेत अंधाराचं संपृक्त द्रावण करुन तो प्राशन केलेला दिसतो. ऊन्हाची काच झगझगीत तापून अंग अंग लासून टाकते. वेदना घट्ट घट्ट साकळण्याचा संदर्भ येतो. जीव चांदणं हुंगतो.
परि कुठुन तरी भिडलेला, नजरेला हिरवा सूर
प्राणात विजेचे वळसे, अन् दु:ख हसे भरपूर
(नजरेला हिरवा सूर)
हे खूप तरलपणे अनुभवावं लागतं. एक वेगळी अलंकारिक दृष्टी व संवेदनशीलता इथे आवश्यक ठरते.
चैत्र-लावण्याचा धूप, उजळले रुप रुप
रंध्रारंध्रातून ओले, सुख सांडले अमूप
(ऐशा सुकृताचा थेंब)
कळ नावरुन झोंबे, काळेसावळे काहूर
साकळल्या वेदनेला, फुटे प्राजक्ताचा सूर
पंचसंवेदनांची एकमेकांत झालेली अशी सरमिसळ फार मार्दवाने समजून घ्यावी लागते. हे करताना, समग्र कविता वाचताना आज जागतिकीकरणाच्या कोलाहलाच्या, वर्तमान अस्वस्थतेच्या ठोकळा-कविता लिहिणारे आपण किती बोथटलो आहोत याची बोचरी जाणीव पुन:पुन्हा होत राहते.
कविता शब्दांतून बोलत नाहीच, बोलू नयेच. ती तर शब्दांच्या भोवती असणार्‌या अवकाशातून बोलते, बोलली पाहिजे. विशुद्ध कवितेचा हा महत्वाचा गुण आहे. आणि आपण तर आज समोर दिसणार्‌या वास्तवाचं कवितिक भाषेत शब्दांकन करण्यात गुंतलो आहोत आणि त्याला ‘कविता’ म्हणतो आहोत. इतकंच नव्हे तर वर्तमानच इतका रुक्ष म्हणून आमची समकालाशी एकरूप झालेली कविता आपसूकच कोरडी बनत गेलेली अशी आपल्या गद्य कवितेची समर्थनंही आपण करतो! (रामाणी शैलीत सांगायचं तर) अशा या ‘वैशाखरुक्ष’ पार्श्वभूमीवर संवेदनशील मनाच्या जाणीव-नेणिवेत एखादी अळंग व्यथा-वेदना- संवेदना जशीच्या तशी पाझरणं हे सोपं काम नव्हे..पण रामाणींची कविता ते करते.. यासाठी ती समरसून वाचायला हवी.
रुजू आले खोल वैशाखाचे बीज
आषाढक्षितीज वाकलेले (आसवांची ओवी)
यासारख्या जाणिवा ‘मन मवाळे करून’
(किंबहुना ‘मन मधाळे’ करुनच), केले तरच उमजू शकतात आणि समग्र कवितेत रामाणींना मिळालेलं हे प्रतिमांचं पाथेय आकळून या कवितांचा अमृतानुभव पदरी बांधता येतो. अशाप्रकारचा अभ्यास हा निर्मिक मनाची जणू मृगनक्षत्राने केलेली मशागतच ठरू शकेल.
ही कविता टोकाची आत्ममग्न असली तरी शेवटी व्यष्टीवेदना समष्टीतच विसर्जित होत असते या अर्थी तिचं पटल खूप व्यापक ठरतं. त्यांची दु:खव्याकुळ हळवी कविता जशी आत्मरमण, तेवढा तेवढा तिचा पैस विस्तारत गेलेला.. मोअर अँड मोअर पर्सनल इज मोअर अँड मोअर सोशल असं म्हटलं गेलं आहेच. म्हणून पराकोटीची भावकोमल असणारी रामाणींची व्यष्टीव्यथापूजक कविता समष्टीच्या पंखांना आकाशभरारीची कळ देऊ करते, हे महत्वाचं.
लक्ष वेदनांच्या पुण्याईचे बळ
पंखातून कळ आकाशाची
ओथंबले डोळां काळोखाचे रडे
फुटले तांबडे व्यथेपार (वेगळ्या नभाची)
बुजलेली तमी डोळ्यांची कवाडे
कोसळले रडे प्रकाशाचे (कोसळले रडे)
कुणी सादलेले त्वचेच्या तमाला
दिठी वेगळे ओज ओथंबले
पिक्या वेदनांच्या नभातून खाली
झरे सारखे चांदणे कोवळे (कळेना कुठे वाट)
इथे हृदय ओविते अतुट आसवांच्या सरी
व्यथा पिकुन वाकते विफल विश्व माझ्यावरी
नशा नसनसांतुनि, जहर जांभळे लोचनी
निळी नवलगोपुरे जळत दिव्य भासांबरी
(इथे हृदय ओविते)
या रचनेत कवीची वेदना ‘पिकून’ पक्व होते.. व्यथा पिकुन सुखाचा रस पाझरू लागल्याचे दिव्य भास नजरेच्या नवलगोपुरांना होऊ लागतात.. तिमिरडोळ्याला ‘प्रकाशाचे रडे’ येते. पिक्या वेदनांच्या नभातून चांदणं सांडू लागतं.. व्यथेचा असा पक्व व रसगळता उत्सव रामाणींनी ‘आभाळवाटा’मधे केला आहे. व्यथा इतकी आटीव दुधासारखी इथे भोगता येते. इथे कुठेही ती आक्रस्त त्रागा करीत नाही. आरडाओरड, उरबडव करीत नाही. उद्वेगाच्या लाटा तिला दग्ध करीत नाहीत. उलट ती विदग्धाच्या आचेवर मंद आटते न् तिचं संवेदन इथे क्षीरमधुर होऊन जातं..ही रामाणींची किमया.
ऐन तापत्रयी, भर्जरली काया
अत्तरला फाया, वेदनेचा (भेट)
अशी एक समग्र कष्टांची साखळीच कवी अनुभवतो. आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या तापाला/कष्टाला/दु:खाला ‘तापत्रय’ म्हणतात. (व्याधींचेही हेच तीन प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत.) हे क्रमश: शारिरीक, मानसिक व अज्ञात कारणांनी होणारे असे ताप आहेत. या तापत्रयाने शरीर भरजरी होऊन गेलं आहे असा (उपरोधिक) अनुभव कवीला त्याच्या आयुष्यात एकसारखा आला आहे. आता तो त्या भरजरी वसनाला जे अत्तर लावून सुगंधित करु बघतो आहे, तो अत्तराचा फाया त्याच्या वेदनेत भिजलेला आहे. वेदनेला सोसण्याचा सुगंध आहे. तापत्रयी भर्जरी झालेली काया आता त्या वेदनेने सुगंधी होणार आहे! हीच वेदनेची, सोसण्याची गंधसंवेदना आता आणखी पुढे, चकित करणारे रूप व रससंवेदनेचे आयाम धारण करते –
तीन उन्हाचे दगड ठेविले
आणि रांधले जिणे
माध्यान्हीचा सूर्य ढाळतो
माथ्यावर चांदणे
(तीन उन्हाचे दगड ठेविले)
‘उन्हाच्या तीन दगडांची चूल मांडणारी’ ही एकच कविता हा रामाणींच्या समग्र कवितेचा लसावि म्हणता येऊ शकेल अशी आहे. सुमारे ५० वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता आजच्या तंत्रयुगाच्या वर्तमानातही तितक्याच चपखलपणे लागू पडते.
ऊन सोसण्याची आणि त्या धगीवर ‘जिणे रांधण्याची’ ही रटमटती असोशी नवी-जुनी वगैरे असू-होऊ शकत नाही. चुलीचे दगड असोत किंवा गॅसशेगडीचे खूर असोत, रटमटणं तेच आहे. तेच होतं. तेच राहील. तीन उन्हाचे दगड यांसारखी त्रिकालाबाधित प्रदिप्त राहणारी प्रतिमा ही खास रामाणीशैली. या जिण्यामधे पदराखाली झाकलेल्या बाळासारखी जखम झाकलेली आहे. मुकी आणि भुक्या स्पंदनांची अंगाई म्हटली आहे. वेदना, व्रण, भूक, सोसणं, जळणं हे सारं एकत्र शिजणारं हे जिणं आहे.‘दो दिवसांच्या मुशाफरीचं’हे सारसत्व आहे. ‘घनगर्द तमाची घमघमली कानने’ अशी स्थिती आहे. उन्हाला चव व अंधाराला गंध आला आहे. सूर्य चांदणे ढाळणारा, पालवी दग्ध फुटलेली, स्पंदने अंगाईचे शब्द गाणारी असा विरुद्ध विलास या जिण्यामधे आहे. कवीच्या खडतर व्यक्तिगत आयुष्याचे पडसादही या कवितेत आहेत. व्यष्टीच्या जिण्याबद्दल बोलता बोलता समष्टीलाही कवीने सहज सहज कवेत घेतलं आहे, म्हणून ही कविता रामाणींच्या स्वत:च्या व एकूणच मानवी जीवनाच्या धगधगत्या वास्तवाचं रुपचित्र ठरते.
‘तीन उन्हाचे दगड’प्रमाणेच-
सांज दाटली विटकररंगी; वत्स उन्हाचे अंग चाटते
श्रांत धरेचे, आणि पाहते, जग विसरु दिवसाचे नाते..
(सांज दाटता)
काळोखाच्या कावळ्यांना येते अवेळीच जाग
खोल हुंकाराच्या तळी धुमसते काळी आग
(काळोखाच्या कावळ्यांना)
माझ्या मुखी आली अंधाराची स्तने
ओठात चांदणे फोफावले (एक अभंग)
अशा विचक्षण प्रतिमांच्या पदन्यासाला ‘आभाळवाटा’मधे सुरुवात झाली आहे.‘पालाण’, ’दर्पणीचे दीप’, ‘गर्भागार’मधे उत्तरोत्तर त्यांचा कळस झालेला दिसतो. प्रतिमा हा लिहिणार्‌याच्या हृदयासमोर ठेवलेला दर्पण असतो. आणि त्यातून एक महत्वाचं वैशिष्ट्‌य म्हणजे रामाणींच्या या प्रतिमादर्पणात ठायी ठायी आध्यात्मिकतेची दिव्य आभा फाकलेली दिसत राहते. आत्मरूपाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा कवितेचा प्रयत्न असतो. स्वच्छ एकटेच तळे | सुखावले चांदण्यात (तळें) हा त्याचा परमोच्च बिंदू आहे. ही एवढीच, पाच शब्दांची एका ओळीची कविता. अल्पाक्षर रमणीयत्वाचा उत्तम नमुना आणि ही रामाणींची ओळख आहे. हे आत्मतृप्तीचं तळं कैवल्याच्या चांदण्यात सुखावलं आहे. ते स्वच्छ नितळ शांत आहे. आत्ममग्न आहे. दिवसभराच्या कोलाहलानंतर आता कोणतीही खळबळ, कोणतेही तरंग त्यात नाहीत. हे तळं त्यांच्या गाढ काव्यतंद्रीचंही रूप असू शकतं. असं तरल न् नितळ असणारं आतून असंख्य झरे पाझरत असलेलं तळं रात्रीच्या चांदणकाळोखात निवांत पहुडलं आहे. तुडुंब भरल्या समाधानात ते सृजनाचं चांदणं अंगभर माखून घेत आहे.. रामाणींनी कवितेची ही तल्लीन तंद्री आयुष्यभर जपली. त्यांची संन्यस्त कविता अध्यात्माचं असं विलोभनीय दर्शनही घडवते हे विशेष लक्षणीय ठरतं. आळंदीला ’श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी’ नतमस्तक होताना कवीला
अबोलाचा बोल वाळवंटी रुजे
वांझ ऊर माझे शब्दब्रह्म अशी जाणीव होते.तो त्या अंतिम ब्रह्मानंदाच्या शोधातच राहतो.
पोळलेले पुण्य गळां मिठी घाली
पुंडलिका भेटी परब्रह्म (भेट)
पैलाड भिडले प्राणाचे पाखरु
नादले घुंगरु अव्यक्ताचे(एक अभंग)
वेगळ्या नभाची मला सोनभूल
अदृष्टाचे फूल गर्भवास (वेगळ्या नभाची)
तळाहून खोल झेपावे जाणीव
अथांगाचे हींव अर्थालागी (अश्रूंचा अभंग)
अशा आध्यात्मिक चिंतनाच्या उंचीवर ही कविता नेऊन सोडते. जिथे पुन्हा-
काठ काठ हुंगित मी रात्र रात्र भग्न फिरे
आसवांत मुरलेले लोचनांत गीत झुरे
रात्र रात्र पोशित मी गहन तमाच्या गर्भी
पुनवेला अर्थ आज अवसेच्या संदर्भी
(पुनवेला अर्थ आज)
या साक्षात्काराचा दीप उजळलेला दिसतो. ‘अज्ञेयाच्या माळावरुन उधळलेल्या ‘आभाळवाटां’वरची पुनव अवसेचा अंधार पिऊन आली आहे. आता कोणतंही पुनवचांदणं अवसेच्या संदर्भाशिवाय पुरं होऊ शकत नाहीए म्हणून या वाटा जळ-जाळ, तम-उजेड, अवस- पुनव सगळ्यांसवे पुढे सरकू लागतात.
३) पालाण ः
‘पालाण’ हा रामाणींचा महत्त्वाचा, गाजलेला व वेगळा ठसा असलेला तिसरा संग्रह.‘पालाण’ व ’दर्पणीचे दीप’ हे मराठी कवितेतले मानदंडच मानले जातात. नावापासूनच वेगळेपण जपत, स्वच्छ एकटेपणाच्या हिमतीवर खूप मोठा पैस कवेत घेण्याची कवीची तयारी पहिल्याच पानावरील भूमिकेत दिसते-
एकल्याने गावे एकट्याचे गाणे
परक्याचे नाणे खरे-खोटे
खरी आहे फक्त नागवली काया
हंबरते माया एकट्याची
एकट्याच्या तेथे उधळल्या वाटा
चढणीच्या घाटा अंत नाही
स्व-ला स्व-ची सोबत असल्यामुळे कवी भकास एकाकीपण अनुभवत नाही, तर एकलेपण अनुभवतो. स्व-स्थित असणं म्हणजेच स्व-स्थ असणं अनुभवतो. त्यामधे कोणताही उद्वेग नाही, निराशा नाही. उलट कवीला त्याच्या एकटेपणाला मोहर फुटल्यासारखं वाटतं आहे.
‘पालाण’ मधली कविता बरीचशी अध्यात्माची डूब असलेली, गहनगूढ, थोडी संदिग्ध, अवघड वळणाची वाटते. एखादं ऍबस्ट्रॅक्ट चित्र असावं तशी ती अनेक अर्थवलयांचं तरंगचित्र डोळ्यासमोर उभं करते. गूढ असं बरंच काही डोळ्यासमोर तरळत राहतं.. रामाणींच्या कवितेला यामुळे साहजिकच ग्रेसांसारखं दुर्बोध म्हटलं गेलं. पण इथे एक फरक असल्याचं लक्षात येतं. (अर्थात हा फक्त मला जाणवलेला फरक आहे. तो तसा असेलच असं नाही आणि ही अर्थातच तुलनाही नाही.) तो फरक म्हणजे उदा. ग्रेसांची कविता चार ओळींत दोन वेगवेगळे, परस्परांशी संबंध नसलेले, न उलगडणारे संदर्भ दाखवेल किंवा बरेचदा खूपच दूरान्वये संगती शोधत जावं लागेल, तसं रामाणींच्या कवितेच्या बाबतीत होत नाही किंवा अगदी क्वचित होतं.(खुद्द रामाणींना ग्रेसांची कविता फार दुर्बोध व असंगतीयुक्त वाटे. त्यांच्या ओळी वर खाली करुन कशाही वाचल्या तरी काही फरक पडत नाही असं रामाणींचं मत होतं, जे ते स्पष्टपणे सांगत. पण असं असलं तरी ग्रेसांच्या ‘संध्याकाळच्या कविता’ मात्र त्यांना आवडल्या होत्या) रामाणींची कविता पहिल्या वाचनात कदाचित कळणार नाही, पण पुन्हा बारकाईने वाचल्यानंतर पहिल्या ओळीला धरुन धरुन पुढे जात आशयाचं टोक म्हणजे उंचीवर गेलेला शेवट- बरेचदा नीट गाठता येतो. त्यामुळे नुसतेच आशयाभोवती गोल घुमत न राहता गूढाच्या तळाशी जाऊन कविता आकळण्याचा आनंदही मिळतो. तर असा हा फक्त दोन गूढ कवितांचा वेगवेगळा पोत स्पर्श करुन बघण्याचा, समजून घेण्याचा भाग!
या प्रकारच्या अभिव्यक्तीचा तो एक वेगळा स्तर असतो आणि वैखरीत आलेल्या शब्दांतून व्यक्त झालेले परा, पश्यन्ती, मध्यमेतले अव्यक्त भाव जाणून घेण्यासाठी वाचकाची भावतंद्रीही तेवढीच समरसून लागणं महत्वाचं ठरतं. वाचकाच्या आकलन क्षमतेचा कस लावणारं रामाणींचं हे ‘पालाण’आहे !
नको म्हटले तरीही मोर नाचले दारात
लख्ख अवकाश तरी मेघ मोहरले आंत
कोण झेपावते कोठे काळे कोवळे कातर
घन होऊन दाटला डोळां दिशांचा हुंबर
रान-अस्कडीच वाट हले काळजाचा मेणा
दु:ख माळून ओठात खोल फळलेल्या वेणा
चिंब शब्दांहुन माती तिचे अवकाळी न्हाण
नेणिवेच्या निरभ्राला सात रंगांची कमान
कसे पाऊल ठरेना गाव निसटले ऐल
मोर नाचले नाचले अर्थ आशयाच्या पैल
(नको म्हटले तरीही)
इथे कवीने स्वत:च्याच जाणिवांना ओलांडलं आहे. अनुभवांच्या अवघड, अरुंद दगडधोंड्यांच्या ‘अस्कडशा’वाटेवरुन चालत जाऊन पालाणलेलं हे विश्व आहे. नेणिवेच्या निरभ्राला आलेली ही सात रंगांची कमान, शब्दांहून चिंब भिजलेल्या धारणांच्या मातीला अवकाळी आलेलं न्हाण, डोळ्यांना लगडलेला भवतालाचा आर्त हुंबर हे सारंच कवीला स्वत:चं स्वत:ला अचंबित करणारं आहे. लौकिकाचं गाव अल्याडीला राहून सृजनाचे हे मोर अर्थांना घेऊन पल्याडीला पोचले आहेत. ‘पालाण’ मधे हे मोर आणखीही काही ठिकाणी अर्थांचे वेगवेगळे विभ्रम घेऊन येतात, पण कवीला ते स्वत:चे स्वत:ला काही वेळा उमजतात न् काहीवेळा नुमजतातही!
ठायीठायी निथळण अर्थसावळा ओलावा
कुठे रानात पिकला मोरपावलांचा पावा
(ऐन आंधळ्या उन्हात)
श्वासांत चांदण्याच्या फुटल्या मयूर-वाटा
पायात का सखीच्या खुपतो अजून काटा
(वारा इथे भरारा)
गाव तुडुंब तंद्रीचे दग्ध धारांचा पाऊस
उष्ण रक्तातला मोर रानी भिजतो उदास
(गाव तुडुंब तंद्रीचे)
हाकेहाकेवर आता आले प्राणांचे मयूर
रान झेलते,माळते मुक्त मोतिया चाहूल
(पैस नांगरण केली)
मोर दूरच्या वनातले
अवचित दाराशी आले नी नाचून गेले.
गेले, तेव्हा माझे उन्हाळी अस्तित्व
एक उदात्त वर्षाकाळ ल्याले
‘बरखा बहार आयी..’
मोर माझ्याच मनातले
मला उमजलेले, नुमजलेलेही. (मोर)
रामाणींची व्यक्तीगत आयुष्याची वाट फार खडतर होती. त्याचे पडसाद ‘आतल्या वाटे झोंबती काटे’,‘आतल्या वाटे काळोख फाटे’,‘माझे मूढ अनंगविश्व’, ‘अंतरंगाची अखंड आर्त ओसाडी’, ‘ज्येष्ठ जाळुनिया गेला देह; भस्मले सर्वस्व’ अशा शब्दांतून जिथे तिथे उमटलेले दिसतात.
गर्द नि:शब्दाचे हीव घेतले पांघरु
अव्यक्ताची खेव तरी येईना सावरु
हुंदड वासरु, तसा निसटे आशय
पात्र आले भरु पिता अथांगाची लय
कोठले कोठले श्रेय आकाशाएवढे
आतले आतले आता कवाड नागडे
(आतले आतले)
अव्यक्ताचा अवसर सावरता येत नाही अशी स्वतःची असहायता व आतला कंद सोलून काढण्याची गरज कवीला जाणवते आहे. या पार्श्वभूमीवर,वास्तवाची लक्तरं झाल्यानंतरही आणि ती जळून राख झाल्यानंतरही त्या राखेतून अंगारा ‘मेटल्याचा’ एक अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक अनुभव एका – फक्त तीन कडव्यांच्या कवितेत येतो.
राखेतून माझ्या मेटिला अंगारा
पाचोळले पुण्य हुंगिते गाभारा
निष्पर्णशा वेळे झांजरल्या राती
राऊळल्या शून्यी काकड-आरती
होऊन गेल्याची लक्तरली लाज
मरण कालचे आरक्तले आज
(होऊन गेल्याची)
कपड्यांचे तुकडे/ठिगळं मांडून, ते जोडून, बेतून म्हणजेच मेटून-पूर्वी बायका चोळी शिवत. कवीची ‘होऊन गेल्याची’ लाज वास्तवात अशी लक्तरली आहे! त्याहीपुढे जाऊन ती तशीच्या तशी जळून राख झाली आहे. आणि आता ‘त्या’ राखेतून अंगारा मेटायचा आहे, असा थरार या कल्पनेत आहे. गूढाच्या खोल तळाशी तो घेऊन जातो. अंगारा ही नुसती राख नव्हे; तर ते जळण्याचं सार्थक आहे. तो पावक आहे आणि हे जळणं म्हणजे वणवा किंवा भस्मस्मात होणं नव्हे, तर राऊळातल्या झांजा नि काकड- आरत्यांचं शांत सत्वतेज या जळण्याला आहे. आणि म्हणून ते लक्तरी जळणं,ते मरणं आज पुन्हा आरक्त नि जीववंत झालं आहे. ‘पाचोळले पुण्य हुंगिते गाभारा’ ही केवळ एखादं फूल हुंगावं इतकी तरल व दिव्य अनुभूती आहे.
भारतीय आध्यात्मिक परंपरांना रामाणींनी खूप खोलवर मुरवून घेतलं होतं. ज्ञानदेवांच्या ‘अमृतानुभवा’ची आठवण येईल अशी –
परम तिमिराचा स्वयंप्रकाशु|
झोंबता उजळले हृदयाकाशु|
चित्सुखाचा अविनाशु| प्राप्त होये॥
ही कविता त्याचीच साक्ष देते. यात शेवटी
अटळ दिष्टाव्याची लागणी|
गगन अर्थाची गवसणी|
देदीप्य दीप्तीची कामिनी|भोगिली म्यां!॥
(परम तिमिराचा स्वयंप्रकाशु)
इतकं समरसणं येतं. एकरुपत्व येतं.
रामाणींच्या अध्यात्म व संतवाङ्‌मय प्रेमाची खूण पटवणारा, पण एक गंमतीचा संदर्भ इथे सांगावासा वाटतो. डॉ. प्रल्हाद वडेर, डॉ. रमा मराठे यांच्या लेखांमधून हे किस्से वाचायला मिळाले. ‘तुकाराम महाराज’ हे एक काल्पनिक पात्र रामाणींच्या आयुष्यात होतं. ते कधीतरी कवितेत येई, तर कधी स्वप्नात दृष्टांत देई, सल्ले देई, बर्‌याचवेळा ते व्यवहारात अटीतटीच्या अडचणीच्या वेळी, एखाद्या धर्मसंकटात त्यांना मदत करी. काहीवेळा स्फुट स्वरुपाच्या मिश्कील अभंगरचनेत ते स्वत:लाच ‘तुक्या’म्हणत. त्यांचे हे ‘तुकाराम महाराज’ अवतीभवती घडणार्‌या गोष्टींवर, कुणाकुणाला लिहिलेल्या पत्रांतून मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करीत.
नरेंद्र बोडके यांनी एकदा बोरकरांच्या कवितेचे आता फक्त सोनेरी सांगाडे उरले आहेत असं लिहिल्यावर रामाणी भडकले होते. आणि ‘हे वाचल्यावर महाराज तर त्वेषाने पायाची वहाण काढू काय?’ असे जोरजोराने म्हणाले असं रामाणींनी एका पत्रात मित्राला लिहिलं होतं. संतसाहित्याच्या व त्यातल्या त्यात जरा जास्त-तुकारामांच्या प्रेमामुळे अनुभवांची त्यांची रीतच बदललेली दिसते-
सांजावता झाले
सावल्यांचे सूळ
काळोखाचे कूळ कळो आले
तेथे कैशी माझी
आंधळली दिठी
प्रकाशाची मिठी सोसवेना
(प्रकाशाची मिठी सोसवेना)
काळोखाच्या नियतीला पालाण घातल्यानंतर ‘प्रकाशाची मिठी सोसवेना’अशी झालेली स्थिती ‘पालाण’च्या शेवटच्या भागात आली आहे. पण हे सारे उराशी जखम सांभाळतच. एक निरंतर व्रणवेदना या कवितेच्या भाळावर भळभळत राहते. त्यातून कवीची सुटका नाही. कवितेचा ऊर धपापत राहतो.
माझी वनवासी हाडे रुजू घातली घातली
पोळलेल्या पहार्‌यात उभ्या बंबाळ बाभळी
थोडी राठलेली राख तीच वैकुंठाची खूण
पाप पिकून राहिले पुन्हा गर्भार मरण
सूर्य साकळेल आता उष्ण उदास रिकामा
काळी काळोखाची माती हाडे घालती हमामा
(हमामा)
‘भणंग आयुष्याची हाडं रुजून उगवलेल्या रक्तबंबाळ बाभळी’, ‘या जन्मातलं पाप पिकून पुन्हा गर्भार राहणारं मरण’ ‘वणव्यात जळून झालेली राठ राख’ साकळलेला उष्ण उदास सूर्य’ ‘काळोखाची काळी माती’ अशा मरणयातना-अशी ही ‘धुमश्चक्री’ आहे.हंगामा आहे.’ हाडांची काडं करणं’ म्हणतात तो हा ‘हमामा’ आहे! हे एक खूप वेगळं, सैरभैर, भणंग संवेदन आहे.
तुकारामांच्या गाथेत ‘हमामा’आला आहे.
हमामा रे पोरा हमामा रे| हमामा घालितां ठकले पोर| करी येरझार चौर्यांशीची॥ असा पुढे आयुष्याचा-चार प्रहरांचा घातलेला हमामा आहे. तुकाराम महाराजांना असा हमामा घालून पावन वैकुंठप्राप्ती तरी झाली, पण कवीची वैकुंठाची खूण म्हणून फक्त राठ अशी राख शिल्लक राहिली आहे असं कमालीच्या निरर्थक जगण्याचं चित्र कवीला दिसतं आहे.
आपल्या अनुभवांना खूप तीक्ष्ण अशी धार काढून ते भोगण्याची, सोसण्याची अशी एक वेगळा कळा रामाणींच्या कवितेत दिसते.
कुणाच्या व्यथेला जुईगंध ओला
जळी लख्ख सारे पुन्हा आरसे
निळा स्पर्श रंध्रांतुनी गोंदताना
उरी शुभ्र दाटून आले पिसे
इथे राऊळी अंध अंधार आता
पिसाटापरी अन् फिरे काजवा
निघाल्या जिथे ना तुझ्या लांब वाटा
तिथे लाव तू काळजाचा दिवा
(लाव तू काळजाचा दिवा)
पुन्हा तेच टोक, तीच धार,पण आता ती अजून थोडी अंगात भिनलेली- सृजनाचा निळा स्पर्श रंध्रांतून गोंदून घेताना असंख्य सुया टोचून घेण्याची नशाच जडलेली- हे‘शुभ्र पिसे’- हे वेड- शेवटी ‘गर्भागार’मध्ये आलेले ‘माझे दैवजात देवदत्त खूळ’ पदरी घेऊन ‘पालाण’च्या शेवटी ही ‘ओसाड बागेची कविता’येते. आरंभी एकलेपणात सुरू झालेली कविता – मी माझ्या वाटेने एकटाच, निरहंकार जाईन
ओसाड बागेची शपथ घेऊन सांगतोय:
माझ्या उदासीची आता एक
निखळ कविता झाली आहे
(ओसाड बागेची कविता)
असं ओसाडीतही स्वयंप्रकाशी विधान करते, व्यथा-वेदना-एकटेपणाच्या भणंग विश्वालाच ’पालाण’घालते.
४) दर्पणीचे दीप ः
‘..चढणीच्या घाटा अंत नाही’ ही ‘पालाण’च्या भूमिकेच्या कवितेची शेवटची ओळ ही ‘दर्पणीचे दीप’ मधे कवीची भूमिका आहे. अदृष्टाला ‘पालाण’ घालतानाची ही दमछाक आहे. आता त्यानंतर ‘आभाळवाटे’ने पाखरं उतरावीत तशी कविता उतरते आहे.
मग एकेक पाखरु उतरते आभाळवाटेने
नि शब्दांपलीकडचा ओंजळलेला आशय
अज्ञेयाच्या आडोशाला जपत
निथळत राहते कविता ओळीओळींतून.
नंतर मी कुठेच नसतो
पाखरेही उडून जातात सैरभैर.
केवळ उरते ती कविता.
अदृष्टाच्या झुला बांधून
उंचच उंच झोके घेणारी निमूटपणे
(कविता)
लिहून झाल्या‘नंतर मी कुठेच नसतो/पाखरंही उडून जातात सैरभैर/केवळ उरते ती कविता’ हे हरवणं, अलिप्त होणं खूप मोलाचं. कलाकृतीला जन्म मिळाल्यानंतर ती स्वायत्त असते. तिच्यावर कुणाचाच; अगदी निर्मिकाचाही हक्क उरत नाही.याच निर्विकार अलोभी भावनेमुळे रामाणींनी कवितेचे सोहळे केले नाहीत. तिला चकचकाटात नेलं नाही. तिच्या प्रांजळाच्या दर्पणात ते व्रतसातत्याने आपला भक्तीदिवा उजळवत राहिले. वयाच्या ७६ व्या वर्षीही मला अजून चांगली कविता लिहिता यायला हवी, असं रामाणींनी म्हटलं होतं. ‘दर्पणीचे दीप’ मधील कविता नितळ मनाचा हाच पारदर्शी तळ दाखवणारी आहे. पंचसंवेदनांचा परमोत्कर्ष यात बघायला मिळतो.
उन्हाचे आरसे झाले, देखिले रुप नेटके
उन्हाळी तल्खुरी तंद्री, निराळे विश्व जागले
(उन्हाचे आरसे झाले)
असे ‘उन्हाचे आरसे’ झालेलं हे शब्दांचं तेज- बघून हरखून जायला होतं. आज इतक्या वर्षांनंतरही हा ऐवज, ही देणगी आपल्याला नित्यनूतन वाटावी ही तिची विशुद्धता! या संग्रहाच्या सुरुवातीलाच एक वेगळं रंगसंवेदन येतं. वेगळं अशासाठी की, इथे प्रत्यक्षात रंग दिसत नाहीत. अगदी प्रतिमांच्या आडोशालाही दिसत नाहीत. मग ते कुठे आहेत? कसे आहेत?
सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावल्यांत हरवून वाट विसरल्या.
वाट विसरल्या आणि विसरल्या घाट
सातजणींच्या सावल्या झाल्या घनदाट.
खोल सावळल्या तरी सावरल्या काय?
मनमोरांना फुटले इथे तिथे पाय…(सातजणी)
सांजवेळी अंगाशी दाट होत जाणार्‌या काळोखात, काळोख्या डोहात विसर्जित झालेले हे सप्तरंग आहेत, जे कवितेच्या शेवटी आकळतात. दिवसाच्या सप्तरंगी जिण्याचं सावळ्या,काळ्या अंधारात क्रमश: होत जाणारं हे विसर्जन व विसर्जनानंतर मनमोरांना फुटणार्‌या पायांतून सुरू होणारं नवसर्जन विलोभनीय आहे. रामाणींच्या कवितेच्या डोळ्यांना दाट काळोख असा सप्तरंगी पिसार्‌यागत दिसत असावा बहुधा! शिवाय आणखी एक मोठीच गंमत म्हणजे जगण्याचे हे रंग इथे नुसते ‘ते सातजण’नाहीत, तर ते ‘त्या सातजणी’आहेत! म्हणजे हे अजून काही वेगळं आहे. कदाचित असंही असू शकतं की, दिवसाच्या ढळण्याबरोबर अपरिहार्यपणे अटळ काळोख ज्यांनी स्वीकारला आहे, अशा त्या ‘इच्छा’ आहेत. आणि त्याहीपुढे जाऊन असं वाटलं की, सांजवेळी पाणियाला गेलेल्या आणि पुन्हा परतून काठावर न येता, तिथे डोहातच खोल खोल सावळलेल्या अशा त्या ‘अपूर्ण इच्छा’ असाव्यात का??
‘अपूर्ण इच्छां’च्या पार्श्वभूमीवर इथे लगोलग गोवा व कोकणात सांगितली जाणारी ‘साती आसरां’ची लोककथा व ‘सातबाया/सात मातृकां’च्या पूजनाची प्रथा आठवते. या मिथकाचा संदर्भ ‘सातजणीं’या कवितेत लक्षात घेण्यासारखा आहे. गोमंतकीय लोकजीवनात आणखी एक ‘कुंडे-कुस्कुराची गोष्ट’ही सांगितली जाते. वरील दोन्ही मिथकांच्या सूक्ष्म छटा ‘सातजणी’ या कवितेत आहेत असं मला वाटलं.. काहीही असो, आशयाच्या अधिकाधिक जवळ जाण्याच्या या प्रयत्नात ‘अपूर्ण इच्छांच्या मनमोरांना इथे तिथे फुटलेले पाय’ जेव्हा कवितेच्या शेवटी येतात तेव्हा रामाणींच्या प्रतिभानेत्राचा उन्नत बिंदू तेजस्वी तार्‌यासारखा ठसठशीत जाणवतो हे मात्र खरं.
शापित अप्सरांनी- सातजणींनी-अपूर्ण इच्छांनी- दुर्दैवाच्या खोल सावळ्या जळातच सावरुन- सवरुन राहणं म्हणजे शाप भोगणं. अटळाला शरण जाणं. पण कवीच्या इच्छा हा बुडण्याचा शाप नाकारतात. त्याला त्याची ‘कविता’ ही उ:शापासारखी लाभलेली असल्यामुळे त्याच्या इच्छांचे मनमोर पाय फुटून इथे – तिथे नर्तन करु लागतात! अगदी असं म्हणता येईल की, रामाणींचे हे ‘दर्पणीचे दीप’ मधले मोर आणखीनच हुन्नरवाले आणि जिगरबाज; ’मोर नाचले नाचले अर्थ आशयाच्या पैल’ मधल्या – ‘पालाण’मधल्या मोरांच्या पुढच्या पिढीतले! कारण-
डोळिया डोळस दीप्तीची लागण
आरक्तसे खोल उजेडले भान
जेथे जातो तेथे पान्हावते भुई
रक्तातला मोर नाचे थुईथुई (मोर)
वर म्हटल्याची निश्चितीच जणू पुढे या ‘मोर’नावाच्या कवितेत होते. डोळियांना डोळस दिप्तीची लागण आणि उजेडाचं भान देणार्‌या कवितेने शापित जगण्याला आधार दिल्याचं इथे स्पष्ट होतं.
रामाणींचा जन्म २६ जून १९२३ गोव्याच्या बार्देश तालुक्यातल्या वेरे गावचा. पाळण्यातलं नाव ‘आनंद’पण नंतर आजोबांचं ‘शंकर’ हे नाव लावण्यात आलं.सकाळी आई जात्यावर दळणाला बसली की तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिचं गाणं ऐकत ऐकत बालपण घडलं. मावशीनेही खूप प्रेम दिलेलं. ही भावंडं चार.परिस्थितीचे भोग व खडतरपणा पाचवीला पूजलेला.वडील नदीपरिवहन खात्यात अधिकारी, पण स्वभावाने फार कर्मठ, तापट व खूप शिस्तीचे होते.’ कविता लिहिणे म्हणजे भिकार लक्षण’असं त्यांचं मत होतं.. आणि यांना तर कवितेचं मोरपीस सापडलेलं! शिक्षणातलं अपयश, व्यवहारशून्यपणा अशा गोष्टींमुळे खूप परवड वाट्याला येऊनही यांनी आपलं तारु कसबसं वाचवलेलं. ‘मुदलीच अभ्यासाशी न जुळलेले नाते’,‘मुदलीच नापीक माती’ हे त्यांनी अन्य संग्रहात स्वत:साठी वापरलेले शब्द आहेत..
या सर्व कारणांमुळे कसेतरी मॅट्रीक झाल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी नाईलाजास्तव नोकरी धरली.वडिलांच्या इच्छेप्रमाणे व वडिलांनी ठरवल्याप्रमाणे लग्न. प्रथम पत्नीचं गंभीर आजारपण, मग निधन, त्यामुळे साहजिकच पूर्वी कवितेच्या आचेने आतून भोगलेला एकटेपणा आता बाहेरही पसरलेला. तीव्र उदासीची छाया. कौटुंबिक ताणे-बाणे- कलह. उर्वरित वाटेवर सोबतीसाठी दुसरा विवाह. रामाणींची नोकरी साधी कारकुनाची. पणजीत फेरीबोटींच्या वाहतूक व्यवहाराचं हे कळकट ऑफीस. मराठीशी ओ का ठो संबंध नसणारे ख्रिश्चनबहुल सहकारी, पैशाचे हिशेबाचे बेसुमार रुक्ष कागद समोर आणि.. या सगळ्यात मधेमधे डोकावणारे यांचे ‘अद्वैताचे कमळण कळे’ आणि ’अलक्ष लागणारे दिवे!’..सारेच अगम्य न् विस्मयकारक! या’अस्कडशा वाटेवर’ कविता त्यांना उ:शापासारखी लाभली होती.. हेच खरं.
आईचा प्रदीर्घ सहवास त्यांना मिळाला. नव्वदी ओलांडलेल्या आईचं निधन झाल्यानंतर लिहिलेल्या १० कविता (तुकडे) या संग्रहात आहेत. पण त्यात तिच्या मृत्यूने विदीर्ण झालेलं कवीमन नुसते रडून भेकून आक्रोश करत नाही. भेलकांडून जात नाही. उलट कवी ‘जननी’च्या म्हणजेच आपल्या मूळ सर्जनस्रोताच्या मृत्यूला शांतपणे सामोरा जातो. आतून गदगदतो, हलतो, व्यथित होतो, पण संयतपणे समोरचं सत्य स्वीकारतो
मातीला माती मिळाली.
एकही फुटू आला नाही अश्रू!
पण आकाश मेघाळून येऊन तिला पोचवताना
पाऊस किंचित फवारला होता माझ्यावर (आई)
असं कवी म्हणतो.
तिच्या श्वास-उच्छ्वासांचे
परिवर्तन झालेय रक्तात
माझ्या गात्रागात्रांतून घुमणार्‌या
बकुळफुलांचा सुगंध लेवून (आई)
अशी प्रचीती कवीला येते. याठिकाणी ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ही ग्रेसांची कविता अर्थातच आठवते. पण इथे कवी आई जाण्याच्या दु:खभाराने घनव्याकुळ रडत नाही. उलट –
आई गेली तेव्हा
(आश्चर्यच म्हणायला हवं)
तसूभरही मी आतून ओलावलो नाही
पालावलो. (आई)
असा आश्चर्यकारक, अश्रूविरहित उद्गार रामाणींची कविता काढते. अर्थात हा तीव्र दु:खाच्या अभिव्यक्तीचा हा उपरोधात्मक सर्जनशील सूर आहे. आईच्या मृत्यूनंतर पुन्हा नवसर्जनाचं सृष्टीचक्रच जणू आपल्या आत फिरू लागल्याचं व ती तिचं सत्व कवीला देऊन गेल्याचं कवीला जाणवतं..
आई विशाल झालीय
आणि आकाश तिला आपल्या अलक्ष हातांनी
वेंगून राहिलेय.. (आई)
असा दु:खाचा- जडशीळ झालेल्या अंतःकरणाचा एक वेगळा अ-विव्हल आविष्कार या कवितेमधे दिसतो. आईच्या अंतिम प्रवासाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं करणारा कवी आईचा तिच्या माहेरचा प्रवासही तेवढ्याच हळवेपणाने व ‘आईचे माहेर’या कवितेत आठवतो-
आजोळली आठवण तिला अंगाईचा वास
अर्ध्या झोपेत आईचा पान्हा चोरल्याचा भास
माहेरले रोम रोम आई शब्दांच्या पल्याड
तिच्या चंद्रचाहुलीचा उतू गेला उजवाड
(आईचे माहेर)
शेवटी ‘रोम रोम माहेरलेली (मोहरलेली नव्हे) आई शब्दांच्या पल्याड’ गेल्याचं जाणवलेल्या त्याच आईच्या निधनाने दु:ख-व्याकुळ न होता कवीला ते ‘तिचं आकाश होणं’ आहे असं वाटतं, ही त्या ममत्वाची थोरी आहे. अशा दु:ख-सुख-प्रेम-विराग-व्याकुळता- निराशा यांच्या विविध छटा या कवितेच्या दर्पणात दिसतात. नितळ निर्मळपणे उमटतात. ‘दर्पणीच्या दीपां’ची तरल प्रेमभावनेची वाट तर फार मोहक आहे. इथे पुन्हा ‘कातरवेळ’ मधली हळवी प्रेमकविता आठवते. पु. शि. रेगे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ती निसर्गाच्या रंगरेषांवर, क्वचित लहरींवर पोसलेली आहे. तिच्यातील भावुकपणा जाणवतो, परंतु ती बिल्वरांची किणकिण आणि कुंतलांची भुरभुर यांच्या फारशी पलीकडे जात नाही. गाढ मिठीचे तिला वावडेच आहे. अधूनमधून कुठली तरी व्यथा, वेदना तिला घाबरी करते. ज्या मर्यादांमधे ही कविता वावरते, त्या तिला जाचक झाल्या आहेत असेही नाही. त्यांचे मुख्य यश या मर्यादशीलतेतच आहे. त्या कक्षांच्या पलीकडे जाऊन तिचे मोजमाप करणे आज कदाचित योग्य ठरणार नाही. पण या प्रीतीची आर्त- कोमल हाक पुष्कळांना सुखद ठरेल हे निश्चित असे भाकित रेगेंनी केले आहे.
‘कातरवेळ’नंतर ‘दर्पणीचे दीप’पर्यंत रामाणींची प्रेमकविता आमूलाग्र बदलत गेलेली दिसते. केवळ शारीरभावामधे अडकून न पडता त्या प्रेमाला आंतरिक भक्तीची ओढ लागलेली दिसते. ‘मधुरा भक्ती’म्हणता येईल असं देहापल्याडी पोचलेलं संवेदन तिच्यात जाणवतं. आसक्तमिठी मीलनामधे परिवर्तित झालेली व ‘प्रेम’ एका आध्यात्मिक उंचीला पोचलेलं दिसतं.
मध्यान्हीचे मरण मिटता खोल आरक्त वेणा
ठायी ठायी नभ निथळले;नावरे चंद्रपान्हा
(संग)
राघूंचे हे कळप कुठुनी स्वप्न डंखून गेले (संग)
रानोरानी नकळत कुणी वेध घे सावजाचा
प्रारब्धाच्या कुशीत जळतो संग आता सखीचा
(संग)
अदृष्टाचे दहिवर;कुठे अंत-आरंभ आहे?
कासारी या कवण रतिचे स्वप्न डुंबुन राहे?
कौमार्याच्या नवलदिठीला कोंभ आले तळाशी
अद्वैताचे कमळण-कळे कोण कोठून पाहे?
(आषाढसूक्त)
‘संग’व ’आषाढसूक्त’ या मंदाक्रांता वृत्तातल्या रचनांमधे अशी अनिवार भिजण्याची ओढ- अशी चिंब निथळण आहे. (हे सारं मृगजळ आहे याचं भान जागं असतानाच) कवीच्या आयुष्याला गोड कलाटणी देणारं एक सुरेख ‘केळपान’ही या दर्पणात डोकावतं –
माझे-तुझे नाते, केळपान न्हातेधुते..
केळपानावर ओली, पौष उन्हाची तिरीप
तशी येतेस समीप
खुळ-
खुळा चैत्रवारा, केळपानात कापरा…
तुझा गरतीचा ऊर, घरघाईने घाबरा
बोलू नका,सांगू नका, कसे एवढ्यात आले
कुण्या नवेलीला न्हाण, किती हिर्वे केळपान!
(कविता: केळपानाच्या)
अशी ही ‘हिरव्या मधाची कट्यार’आहे! ‘हिवाळा’ ‘सावल्यांचे ऊन्ह’,‘बिंब’ अशा हळव्या कविता, तसंच ही एक देखणी कविता–
अशी सजवीन तुला | स्पर्श सुगंध माळीन
हिर्व्या नजरेचा चुडा | तुझ्या हातात घालीन
चंद्र निथळले डोळा | निळे तंद्रीचे उखाणे
रोमरोमात वेचती | किती चकोर चांदणे
असे अनावर आता | झाले काळजाचे काठ
कोण चुंबित निघाले | खोल भरतीची वाट
मोरवार्‌याचे घुंगरु | तुझ्या पायांत बांधीन
दिठी-मिठीचा उत्सव | भाळी अदृष्य रेखीन
तुला सजवीन त्याच्या | उरी-पोटी सोनकळा
मधे झुलतोच आहे | आहे-नाहीचा हिंदोळा
(अशी सजवीन तुला)
अशी आहे – नाहीच्या मधे हिंदोळत, ‘काळजाचे अनावर काठ’ ‘खोल भरतीची वाट चुंबित’ पुन्हा पुन्हा तुडुंब भरुन येत असल्याचा हा सात्विक श्रृंगाररस आहे. रामाणींच्या प्रेमकवितांचं ते एक वेगळं वैशिष्टयच आहे.
‘माझा वृत्तांचा वगैरे अभ्यास नाही, पण वाचलेले मीटर मनात पक्के ठसलेले असतात. मग कविता वाचल्यावर ही अमक्या वृत्तातली असं कुणी-कुणी सांगतात तेव्हा मला ते कळतं,’ असं रामाणींनी एके ठिकाणी सांगितलं आहे.
मनाच्या ‘दर्पणीचे दीप’तरलपणे न्याहाळणारा कवी जेव्हा नोकरी चाकरीच्या रुक्ष कामात गुरफटतो, तेव्हा ती सारी कुतरओढही कवितेत- मुक्तछंदात सफाईदारपणे उतरते. टाईपरायटरवर त्याची सराईत बोटं फिरु लागल्यानंतर खोल कुठेतरी आत पियानोचे सूर उमटल्याचा त्याला भास होतो.तो तसाच वाहत जातो.. तंद्रीच्या अस्ताला मात्र साहेबाचं मुर्दाड मुस्कट त्याला नवलकथेतल्या विराट राक्षसासारखं दिसतं असं कवी ‘कवी’ या कवितेत व्याकुळ होऊन सांगतो. ‘पेन्शनर’ कवितेत पुन्हा हेच दारुण वास्तव पचवणं येतं…
केशवसुत, बाकीबाब बोरकर, जी.ए. कुलकर्णी, व्हिन्सेंट वॅन गॉग यांना उद्देशून लिहिलेल्या कविता फार नेमक्या व त्या त्या व्यक्तींबद्दल असणार्‌या हार्दिक भावबंधांचं दर्शन घडवणार्‌या आहेत. ‘दर्पणीचे दीप’चा प्रवास अशा संमिश्र भावनांमधून वाट काढत पुन्हा हळूहळू निराकाराच्या दिशेने जाऊ लागतो.
काल पहाटे जागृतीच्या स्वप्नात
एकाएकी मीच माझे त्वचेचे डोळे
खुडून घेतले आणि दृष्टीगंगा निर्मळ केली
तेव्हा समोर मोकळ्या अंगणात प्रथमच
पाहिले ते काकडतंद्रीत दिगंत हुंगीत.
भरारणार्‍या पक्ष्यांना उरी-पोटी
कवटाळलेले एक निराकाराचे झाड..
(निराकाराचे झाड)
परी अवचित येते कुणी काळजाचे भेटी
दीप लागतात काठी, काळोखाच्या
श्वासाश्वासात कोवळे शेज करी परब्रम्ह
राती उजेडाचे मर्म आकळले (मर्म)
अशी सजग जाणीव होते, जागृती येते. ‘राती उजेडाचे मर्म आकळले’ सारखा तलम समजुतीचा पोत असलेल्या सुभाषित ठरू शकणार्‍या ओळी रामाणींच्या कवितेत सर्वत्र येतात. ही त्यांच्या कवितेचं ठामपण व ताकद आहे. अस्तित्वाचं भान इतकं लख्ख उजेडल्यानंतर साहजिकच ‘झाडांनी विणिल्या विवस्त्र कविता वैराण माळावरी’ किंवा ‘एक अर्थशून्य कविता’ यासारखी निरर्थकतेची जाणीव होणं स्वाभाविक ठरतं. आणि पूर्ण भानावरचा व ‘डोळिया डोळस दृष्टीचा’ पुढचा प्रवास सुकर होतो.
मोरांचे अजुनी न कंठ शिणले
ओल्या दिशा देखता
शब्दांच्या हृदयी निनादत परी
अज्ञातसे राऊळ (आले कुठून मोर)
दारात पालखी भुके भुके भोई
का ही पोरघाई निरोपाची (पालखी)
असं म्हणणारी ‘दर्पणीचे दीप’ पर्यंतची ही काव्यपालखी आता घाईघाईने ‘पेणे’ करते आहे.एकाच्या खांद्याला पालखी जड झाली की ती एका लाकडी दंडावर टेकवून किंवा नुसतीच दुसर्‌याकडे देऊन खांदेपालट केली जाते, याला कोकणीत ‘पेणे’ म्हणतात. कवी आता ‘दर्पणीचे दीप’नंतर त्याच्या व्यथेच्या पालखीचे पेणे करू बघतो आहे.
इथे-तिथे ओला हिरवा आरंभ
दिठीलाही कोंभ फुटू आले
व्यथेची आगळी आषाढ-लक्षणे
पालखीचे पेणे घाईघाई (पेणे)
ओला हिरवा आरंभ-पहिल्या पावसातली, दिठी हिरवी झाल्यागत गच्च हिरवाई. यात आपली वैराण ग्रीष्मव्यथाही हिरवी झालेली कवीला जाणवते.‘आगळी आषाढ-लक्षणे’ तिच्यात दिसू लागतात, पण ही व्यथाही आजवर कवीने त्रासत, वैतागत सोसलेली नाही, तर ती त्याने पालखीसारखी, सात्विकभावाने व समरसून वाहून नेली आहे. इथवर आणली आहे. आता रखरख व्यथेचा खांदा फक्त कवी बदलणार आहे. तिचे पेणे करुन तिला तो ओल्या हिरव्या ऋजू खांद्यावरुन वाहून नेणार आहे. हीच सूक्ष्म जाणीव, सूक्ष्मतर नेणीव आणि सूक्ष्मतम अर्थवलयांची अचूक व प्रतिमांकित अभिव्यक्ती हे ‘दर्पणीचे दीप’चं वैशिष्टय आहे. पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हे सारं तरलपण गडद हिरव्या काळ्या रंगामधे सुरेख उमटवलं आहे. नितळ पारदर्शी मनाचे दर्पण, त्यात पडलेली काळोखाची बिंबं आणि तो दर्पणातला काळोख उजळवणारे त्याच्या तळीचे दीप हे एका वेगळ्याप्रकारच्या उत्कट संवेदनशीलतेने समजून घेता येतं. कवी खांद्यावरच्या पालखीचे पेणे करुन व्यथेची वाट नव्याने चालू लागतो.
राऊळात सारे अंधाराचे दीप
वेंगून राहिले मला माझे पाप
डहुळले डोळां काळोखाचे जळ
अंतरंगी शुभ्र उजेडाची कळ (पाप)
पाप वेंगून राहिलेलं आणि डोळ्यात काळोखजळ डहुळतंय अशा अवस्थेत खोल अंतरंगात मात्र कवीला ‘शुभ्र उजेडाची कळ’ जाणवते. मनोदर्पणात आत्मज्ञान उजळलेलं दिसतं..
५) गर्भागार ः
पोएट्री कम्स आऊट ऑफ द इनर क्वारल हे प्रसिद्ध विधान व ‘कसे पाऊल ठरेना गाव निसटले ऐल/मोर नाचले नाचले अर्थ आशयाच्या पैल ’ या ‘पालाण’ मधल्या कवितेच्या ओळी ही रामाणींच्या ‘गर्भागार’या शेवटच्या संग्रहाची भूमिका आहे. दु:ख व एकाकीपणाची वेदना या संग्रहात परिसीमा गाठते. एकटेपणाचे,सोसण्याचे, दु:खाचे, कधी अवेळ झुगारुन वणवणण्याचे, कधी स्वत:शीच पुटपुटण्याचे, कधी प्रसन्नपणे गुणगुणण्याचे, कधी अनाहूत अश्रू नावरणारे ‘हे माझे दैवजात देवदत्त खूळ’ शहराच्या मोकाट रस्त्यांवरुन फिरतानाही त्यांच्यासोबत असते. गर्दीतही ते इतके एकाकीपण अनुभवतात.
एकटेपणाचे हे अगम्य अजोड वरदान आता
मला जपायला जोगवायला हवे आजन्म
(वरदान)
गर्भागारातल्या शांत आत्मप्रकाशात कवी जाऊन बसतो.
कोण मी कोठला, एकट्या वाटेचा
ओठावर ऋचा, परब्रह्म (शब्दब्रह्म)
अशी ब्रह्मानंदी टाळी एकटेपणातच तो अनुभवतो. ‘सारे सलील विरूप,त्यात अरूपाचे रूप’(दान) असंही त्याला दिसतं.
रात्रीच्या कुसव्यात कोण रतले?
मध्यान्ह झाली रती| सारे स्तब्ध तरी कुणास्तव कुणी प्राणांतुनी मोहरे (कविता)
रात्रीच्या कुशीत अशी कविता फुलण्याचा अनुभव ‘कविता’नावाच्या कवितेत या शेवटच्या संग्रहात म्हणजे अगदी अखेरपर्यंत नित्यनूतनपणे कवी घेतो. या टप्प्यावर कवीला दिवंगतांच्या यादी येतात. आजी, वडील, एक दिवंगत कवयित्रीच्या स्मरणांच्या कविता यात आहेत.
‘वस्तरा’ ही कविता त्यांचे वडिलांशी असलेले नातं पारदर्शीपणे समोर आणते. यात कविताभर आलेली ‘वस्तरा’ ही प्रतिमा रामाणींच्या सर्वोत्कृष्ट प्रतिमांपैकी एक आहे. दिवंगत वडिलांचा वस्तरा आठवणींचं गाठोडं उसकवू लागतो. कवीच्या मनात पहिली आठवण ‘उमळून’ येते ती कटुत्वाची! क्षणभर मन चरकतं, पण पुढच्याच क्षणी , ते आता कवीने ‘खूप वर्षे जिवापाड जपून’ व ‘अतिशय जीर्ण-शीर्ण झालेल्या सानुल्या पेपरबॉक्समध्ये ठेवलेलं आहे’ हे पाहून वस्तर्‌याच्या रूपात वावरणारं कर्तव्यकठोर पालकत्व दिसू लागतं.
आजीच्या स्मरणांची कविता मात्र याहून पूर्ण वेगळी आहे. ‘वारा आणि आजी’अशा एक लांबलचक कवितेतली कवीची स्थिती ‘एक कुक्कुलं बाळ होता तेव्हाची’ आहे. ती ‘भयाण भिंगुळ स्थिती’त्यातल्या ‘परसदारी अचानक प्रकटणार्‌या सुलतानशा वार्‌यासोबत’, त्यातल्या ‘तैमूर लंगड्या युगात’जाऊन अनुभवावी अशी आहे.
दर्पणीचे दीप दर्पणी निमाले
काय काळोखले अंतरात (भान)
असं ‘भान’ गर्भागार मधे आहे. त्यामुळे अर्थातच वेगवेगळी खोल काळजातली, स्व-ला बिलगलेली विविध भावपूर्ण अवतरणं या संग्रहात दिसतात. एकटेपणाचं परिवर्तन एकतानतेत होऊन गेल्याचं दिसतं. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘काळीभोर हार्मनी’ही कविता. ‘ख्रिस्ताचं बर्फगार असहाय क्रूसिफिक्शन’ वेगळ्या रुपात दाखवणारी जिवंत रंग, रूप, सूर, स्पर्श संवेदन देणारी ही कविता हे कवीच्या अनुभवाचं ‘निकें’पण आहे. नितळ काळोखाच्या तळाच्या सुराशी कवीने इथे आपला सूर जुळवला आहे. ही काळोखातल्या सुरांसारखी संथ वाहणारी तादात्म्य कविता- हा ‘केवल अनुभव’ मुळातूनच घ्यायला हवा! रामाणींच्या कवितेत असे थरार जागोजागी येतात.. मनात गहिवर दाटतो..हा गहिवर कसला असतो? पत्ता लागत नाही..या ख्रिस्तवेदनेची आणखी एक सह-अनुभूती कवीने आपल्या आयुष्यात घेतलेली पुढे येते.
नियतीने तब्बल बाहत्तर वर्षे माझ्या कठोर
ललाटी अमानुष अविश्रान्त खिळेठोक
करुनदेखील मी जगतोय माझे
अपरिहार्य आयुष्य…(आव्हे मारीया)
अशी ‘आव्हे मारीया’नावाची दोन पानी आत्मचरित्रात्मक कविता आहे. ‘आव्हे मारीया’ ही येशू ख्रिस्ताची आई मेरी मदर मारीया- हिचं गुणगान करणारी प्रार्थना आहे. एका संध्याकाळी ‘घरालगतच्या एका बगळाशुभ्र चर्च’ मधून ही ‘आव्हे मारीया’ प्रार्थना आणि ख्रिस्तघंटांचा नाद कवीच्या कानावर पडतो, तेव्हा कवीला नेमका आपला सारा जीवनप्रवास, त्यातले खाचगळगे, काटे, धग, मोहर, बहर, पानगळ,ऊन-पावसासकट आठवू लागतो. हळूहळू मावळणारी वेळ काळवंडणार्‌या काळोखाशी एकरुप होते. एकात्म होते.. मेरी मदर व ख्रिस्ताच्या वेदनेशी कवीला आपण एकात्म झाल्याचा अनुभव यावेळी येतो.
…या नि:संग अवधूत अंधारातून मी एकटाच
चालत जाईन काळोखाच्या दुसर्‌या
टोकापर्यंत…
फक्त सोबतीला माझी कविता असेल
(आव्हे मारीया)
कवीला आता आयुष्याच्या उतरणीवर ‘आव्हे मारीया’ प्रार्थनेतला सार्थकभाव कळतो आहे. म्हणून या आत्मचरित्रात्मक कवितेला ‘आव्हे मारीया’ असे समर्पक शीर्षक दिले आहे. आयुष्याच्या उतरणीवरची अजून काही विलक्षण संवेदने ’गर्भागार’मधे येतात. त्यातलीच एक ‘नाग’–
घर जुनाट, जडली त्याला वाळवीची व्याधी
वळचणीत घुमते वटवाघुळांची नांदी
भान निखळून आली फूल-उमलली जाग
दूर कात टाकलेला कोठे निसटला नाग?
‘कात टाकलेला नाग’ या वळणावर निसटून गेला आहे.रसशीत भूतकाळ खूप मागे सांडून आपण बरेच पुढे आणि आता उतरणीला लागलो आहोत ही काळीज चरकवणारी भावना नेमक्या प्रतिमेत समोर येते.आणि लगेच हातात उरल्या-सुरल्या ‘चमचाभर जिण्याची’ आठवण होते.
वास उडून गेलले चमचाभर जिणे
तुझ्या-माझ्या खोलीभर खंबीर संसाराच्या
घरकुलातला कडवट, घुस्मटगार
अनाथ अंधार, घायाळलेल्या पाखरासारखा
निपचित..(चमचाभर जिणे जगताना)
असे दिसत असताना ‘अपंगाला लाडकी लेक तशी उत्तरेला एक छोटी खिडकी’ आणि तीतून दिसणारा ’दूरात झिरमिळणारा धुतल्या आभाळचा पांढराफेक तुकडा’ आणि त्यामुळे ती ‘चमचाभर जीण’चविष्ट झालेली कवीला जाणवते.
उतला उन्हाळा, सूर्य शीतळले डोळा
दुर्वासला दाह; वाट: गंगेचा प्रवाह (पांघुरली उन्हे)
पुन्हा चढण; वाकुडे वळत पंथ पाटांगडे
समोर सुलतानसे अमित पर्वतांचे कडे
किती अटळ चालणे,शिणुन फाटली पाउले
अळंग मन नादते: सजग सुंदरीचे चुडे (चुडे)
असं एकसारखं आधण-विसावण, सूर-बदसूर,
कुरुप- सुरुप करीत निघालेलं हे कवीचं आयुष्याशी असलेलं ’हिरवं हिरवंगार हुरमुजी नातं!’ या नात्याचा परिमळ आसमंतात दरवळणारा आणि या परिमळाचं पुण्य कवी जोडतो ही केवढी तरल कल्पना आहे. उर्वरित वाटेवर साथ करणारा सार्थकाचा परिमळ ही त्याची अखेरीची जोड आहे.
शिशिरबहर येथे, गंध प्राणांत न्हाले
सहज परिमळाचे पुण्य दारात आले
प्रहर गळुन उठली साद ओली दिशांची
गहन गगन नेत्री कोण पेरुन गेले?
(शिशिरबहर)
या गंधवती कवितेचा परिमळ पुन्हा, संग्रहाच्या अखेरीच्या कवितांमधल्या एका कवितेत येतो.
दिवे गेले तेव्हा तिमिरतिरळे नेत्र हलले
अजापाचे ओले निखळ नखुटे विश्व स्फुरले
अबोलाचे पाणी चढुन भवती दाट भरती
उन्हेरी काठाने सहज फिरती सोनबगळे
दिवे गेले तेव्हा अटळ दुनिया स्वप्नरमणी
तिला वेंगू जाता हृदयहिरवी ताठ तरणी
मनामाजी जेव्हा भ्रमर भुलले पद्म फुलता
खुळ्या वार्‌याच्या या मदनउतल्या स्वैर हरिणी
दिवे गेले तेव्हा गगनभगवे भाग्य फुटले
उरी काळोखाचे कुहर:तिथुनी पंथ दिसले
नव्या भूपाळीचे स्वर भिडुन मी कोण कुठला
दिवे आले तेव्हा परिमळ तसे भास भिनले
(दिवे गेले तेव्हा)
ही कविता मनात वेगवेगळी अर्थवलयं निर्माण करते. त्यातलं एक मला हळवं, काहीसं श्रृंगारमय वाटलं. दिवे गेल्यानंतर डोळ्यासमोर झालेल्या काळोखात क्षणभर काही चमचम चमकल्यासारखे वाटते तसे कवीला दिवे गेल्यानंतर ‘तिमिरतिरळे नेत्र हलल्याचा’- चंचल झिरमिळता भास होतो. काळोखात काही रंगीबेरंगी चमचमतं नजरेसमोर येऊ लागतं. कदाचित काही प्रेयस आठव जागे होत असावेत. मग दिवे गेल्यानंतरच्या या रम्य काळोखात कवी सहजच (जप तप न करता- विनासायास समोर आलेल्या) अजापाच्या निखळ ओल्याचिंब नखुट्या-खोडकर-अल्लड विश्वात जातो. अबोल भावनांना मनभरती येते. इथे खरे बघू जाता जिथे बगळे फिरतात ती ही (मायेची/विकारांची) दलदल वगैरेच, पण कवीच्या निरागस तरल भावनांच्या या तुडुंब पाण्याला सोज्वळ उन्हेरी काठ आहेत. पण आता गंमत अशी की याच्या काठाकाठाने (पायातल्या मासोळीवर डोळा ठेवून) ‘सोनबगळे’ फिरू लागले आहेत. काळोखात डोळ्यासमोरची ही हृदय हिरवी-ताठ तरणी- स्वप्नरमणी दुनिया आणि तींत कवी पुरता हरवून गेला आहे. ही धुंदी काही काळ अनुभवल्यानंतर कवी पुन्हा वास्तवात उतरतो तेव्हा ही स्वप्नदुनिया अंतर्धान पावलेली असते. आणि मनातल्या जलाशयात फुललेली आरक्ताची कमळं, त्यांना भुललेले चित्तभ्रमर या सगळ्याच ‘खुळ्या वार्‌याच्या मदन उतल्या स्वैर हरिणी’ असल्याचं आकलन त्याला होतं आणि.. ‘उरीच्या काळोखाच्या कुहरांतून नवे पंख’ फुटलेले त्याला दिसतात. निरामय प्रेमाची, मधुराभक्तीची ही वाट ‘गगनभगवे भाग्य’ लेऊन नव्या दिशेने जात असते..प्रांजळ आसक्तीकडून पावन विरक्तीकडे- मुक्तीकडे! एव्हाना काळोख संपून भूपाळीच्या सुरांचे ‘दिवे पुन्हा आलेले’.. नव्या प्रभातीला एक वेगळा परिमळ आणि निर्गुण प्रेमाच्या त्या दिव्य परिमळाने कवी अंतर्बाह्य गंधाळून गेलेला..
पाण्यावरची अनेक तरंगवलयं एकात एक गुरफटलेली, तशीच हळूहळू काठाला भिडतात व डहुळत डहुळत पाणी हळूहळू शांत होत जातं, तशी ही कविता मनाचा तळ ढवळून काढते, तिथल्या जाणिवांना घेऊन पुन्हा हळूहळू निवळ काठावर आणून सोडते..
अप्रूप रंगांचे अस्ताचे आकाश
आतून वेगळा ओहळे आभास
…देखिला देखणा कोवळा उत्सव
कोठून कळेना उठती आरव
दूरात उडाले अनोखे पाखरु
पाहते कवेत क्षितीज सावरु
शिटुक डोळुले पर्मळे पहाट
माणिक मोलाची घटिका आरक्त
संभ्रम-झांजरी नारिंगी नवाई
अलक्ष कळांची पारज पुण्याई
(पुण्याई)
रंगीत आकाश, पण अस्ताचं- आणि त्याचं अप्रूप वाटतंय इतकं मन निर्मळ शांत विकाररहित झालं आहे.आतून आभास ओघळत नव्हे- ओहळत आहेत- पाझरत आहेत. शरीर जीर्ण झालं तरी प्राणांच्या आसेचं शिटुक-नाजूक -इवलंसं उत्सुक पाखरु अजून थकलेलं नाही. ते दूरात झेप घेतंच. तेव्हा पहाट परिमळून जाते. माणिक मोलाची आरक्त घटिका समोर आलेली दिसते. अस्ताचं रंगीत आकाश खरं की हे प्राजक्ताच्या पुण्याईच्या अलक्ष कळांचं आरक्त आकाश खरं या संभ्रमात असताना नवी नारिंगी झांजरवेळ विरागीभावात समोर येते. अस्ताचं आकाश अज्ञेयाच्या पहाटदिशेने चालू लागतं.
वर्षानुवर्षे उलटलीत
मी पाहतोय माझी एकट्याचीच वाट
….अगदीच निकटल्यासारख्या दुधाळ
क्षितिजाने आपल्या अदृष्य हातांनी
माझे अंग कळत नकळत कुर्वाळल्याचा
बैरागी भास
हां, तूर्त इतकेच.. (तूर्त इतकेच)
सगळी तगमग विरत जाते… आणि कवितेच्या ‘गर्भागारा’त सार्थकाचा दिवा शांतपणे तेवत राहतो…!


प्रत्येक कवितासंग्रहाच्या स्वतंत्र वाचनानंतर समग्र कवितेचा विचार करताना आणखी काही महत्वाचे मुद्दे लक्षात येतात. गायक जसा गाताना गाण्यामधे,चालीमधे काही सुरेख ’जागा घेतो’ तसं समग्र कवितेत रामाणींची खास शैली म्हणावी अशा कितीतरी ’जागा’ जागोजाग येतात.त्यांचा अभ्यासही फार रोचक आहे–
१)प्रादेशिकता
२)खास प्रतिमाविश्व
३)नवीन शब्दप्रयोग-शब्दांच्या नवीन घडणावळी व वेगळे आकृतीबंध असणारी शब्दकळा
४)नवीन नामरूपी क्रियापदं किंवा क्रियावाचक शब्द
५)एखाद्या शब्द किंवा कल्पनेची वेगवेगळी पुनरावृत्ती
६) वैशिष्ट्‌यपूर्ण ऋतूसंवेदन अशी सगळी ’शब्दश्रीमंती’ विविध ठिकाणी लोभस रुपात समोर येते. या सगळ्याबरोबरच-
७) जाणवलेले दोष/मर्यादा- हाही महत्वाचा मुद्दा विचारात घेतला पाहिजे.
हे सर्व मुद्दे काही अवतरणांमधून स्पष्ट होऊ शकतील–

१) प्रादेशिकता- जसे बोरकरांच्या कवितेत गोमन्तकीय प्रादेशिक शब्द येतात तसे रामाणींच्या कवितेतही कोकणी व मराठीतले,बोलीतले अनेक शब्द व संदर्भ येतात. किंबहुना रामाणींच्या कवितेत ते थोडे अधिक प्रमाणात येतात.गोव्याचं लोकजीवन संस्कृती व बोलीभाषेचे संस्कार यावरच हा कवीपिंड पोसलेला असल्यामुळे ती प्रतिबिंबं साहजिकच कवितेत दिसतात.
*’स्वैर भटकावे’(कातरवेळ)या कवितेत कुळागर,पाटाचं पाणी,पिटकुळी,मशींग,पोफळी तसेच अन्यत्रही चाफा मोगरी जाईजुई मोर पारवा राघू साळुंकी आंबराई असे फुलांचे पक्ष्यांचे वृक्षांचे अनेक प्रादेशिक संदर्भ आले आहेत.
*हुर्मुजी लाज सावरीत,हुर्मुजी नाते,पुळण
*माणकुले मंद चाहुलीचे गाव
*मरणमेरेवरुन चालताना,वेंगून,वेंगू जाता
*रान-अस्कडीच वाट,अस्कडशा वाटे
*उटंगार पावसात,पिकाळ भांगर भुई
*माझ्या पायातळीची माती मधुर होत चाल्लीय
*स्मरणातल्या व्यथेचा फिरतो अळंग स्वामी
*आकुळ-पिकुळ डोळ्यांची भाषा मला बोलताच येणार नाही
*नभाला भि-यांचे निनावी पिसे
*मी ही अशी आलगट,माझी पारजाची वाट
*आमोरी(सायंकाळ)ची ओल काळजाला
*बघता बघता पंखूट पालवीत अदृश्य झाला
*तेव्हाच देखली बोंदरी ओंजळ
*ओखट्या वेळ अवेळाच्या सरी
*झळंबतो दाह अर्थातीत
*पाझरतो प्रसन्न चांपेगर्द दर्वळ
अत्यंत प्रेमाने केलेली कोकणी-मराठी शब्दांची अशी बेमालूम सरमिसळ कवितेच्या आशयाला अजून समृद्ध करते.फार विलोभस प्रादेशिक शब्दांची अशी पखरण रामाणींनी समग्र कवितेत केली आहे.

२)वेगळी प्रतिमासृष्टी- (वरील लेखनामधे आलेल्या प्रतिमा यात पुन्हा घेतलेल्या नाहीत) ही तर रामाणींच्या स्वतंत्र प्रज्ञेची ओळख आहे.काहीवेळा कवितेत सुट्या सुट्या प्रतिमा येतात,तर काहीवेळा संपूर्ण कवितेत एकच प्रतिमा असते.इंदिरा संत, विंदा,आरती प्रभू,पाडगांवकर,अरुणा ढेरे यांच्या प्रतिमांचा ठसा जसा मनावर चिरकाल टिकून राहतो,तसाच रामाणींचाही —
*वेदनेच्या डहाळीला माझी व्यथा झाली फूल
*वत्स उन्हाचे अंग चाटते श्रांत धरेचे
*माझिया दारात चिमण्या आल्या
*रात्र पेरते तमात शुभ्र जाईचे हसू
*त्वचेला लुळेफाटके लक्ष डोळे
*कुशीत दु:ख झोपले पिकून झोंबली नशा
*काळोखाच्या कावळ्यांना येते अवेळीच जाग
*माझ्या मुखी आली अंधाराची स्तने
*ऐन शैशवातच मी गं लाविल्या उन्हाच्या लखलखत्या बागा
*अवेळाच्या रानी गोंधळल्या धेनू
*दु:ख दावणीला जसे रित्या गोठ्यात वासरु
*उन्हाचे आरसे झाले
*ठिगळले ठायी ठायी आभाळाचे पांघरुण
*डोळ्यांनी फेडिला कावळा काळोख
*उन्मळला खोल काळोखाचा क्रूस
*निसटल्या नावा नि:शब्दाच्या पैल
*पांघुरली दाट अवस-गोधडी
*ऐन शिशिरातली एक म्हातारी संध्याकाळ
*आले अवसेच्या काठी काळोखाचे काळवीट
*रोज भुंकणारी रात्र दूर कोठे कोल्हकुई
*निर्गुणी केशरी दिवे
खोल मुरलेल्या जाणिवांचं चपखल शब्दचित्र म्हणजे प्रतिमा- हे तंत्र बहुतांश कवी आत्मसात करतातच. पण तरीही त्यापलीकडे बरंच काही उरतं जो प्रतिमेतला ’मंत्र’असतो.एखादी देखणी प्रतिमा हा कवीमनाला होणारा ’ईश्वरी स्पर्श’ असतो! रामाणींच्या प्रतिमांमधे हे संचित जागोजागी दिसतं.

३)वैशिष्टयपूर्ण शब्दप्रयोग/वेगळ्या शब्दरचना- काही नवीनच विशेषणं,शब्दांची वेगळी रूपं व पंचसंवेदनांची सरमिसळ होऊन रामाणींची स्वत:ची कवितेची भाषा तयार झाली होती. व्यथालय,कोयळ रान,अफीमी हात,तल्खुरी तंद्री,अलक्ष दिवे यासारखे अनेक नवे सुंदर शब्द कवितेत जिथे तिथे सापडतात.
*विखारलेल्या तंद्रीची कर्पूरशुभ्र लय
*जाईजुईची भोवळ
*अमेतून ओसंडते चांदणे,कुबेरली काया
*निलाज-या आरशात रूप ओखण्याची घाई
*अलिप्तगंगेच्या समृद्ध काठावर
*चिरगुटलेल्या दोन चिमण्या
*गाई पिळिल्या पहाटे
*डोळा दिक्कालाचा कोंभ
*उर्मट उन्हाचे उगाळले गंध
*ओंजळलेला आशय
*मला नावरलेले एकाएकी झेपावणारे रावे, नुमजे,नाठवे,नुमजलेला,नोळख,नोळखून
(यामधे’नोळख’ सारख्या ’न-जोड’ शब्दांची ओळख फारच भावणारी आहे)
*आपल्या अलक्ष हातांनी,अलक्ष कळांचे झाड, अलक्ष लागले दिवे
*वेगळे ओखता काही बिंबले शून्य दर्पणी, (ओखणे-न्याहाळणे)
*पहाटले आता पोखलेले वेड (पोखणं- निखा-यावरच्या राखेवर फुंकर घालून ती बाजूला करणं)
*कासारलेली कथा,कासारशा कहाणीला (तळ्यासारखी तुडुंबलेली)
*निजू-निजू डोळ्यांची काकड आरती, *काळे-कावळे मांजर,अभंड समुद्र
*तुझा गरतीचा ऊर घरघाईने घाबरा
*सुलतानसा वारा,सुलतानसे कडे
*बदामी वा-याच्या वनारी लहरींवर
*वेडे व्यंकट कोण खोल घुमते
अशा शब्दप्रयोगांची रेलचेल समग्र कवितेत आहे,जी शैली म्हणून त्यांची ओळख बनून राहते.

४)वेगळी तयार केलली क्रियापदे/क्रियाविशेषणे/क्रियावाचक शब्द–वरील वेगळ्या शब्दांप्रमाणे वेगळी क्रियापदं किंवा नामाने तयार झालेले वेगळे क्रियावाचक शब्द ही एक वेगळीच गोष्ट समग्र कवितेत लक्षणीय वाटते. ही कल्पना अनेक ठिकाणी प्रतिमांकित होऊन उभी राहिली आहे.

 • खोल दु:ख ठिणगावे, तू दुपारुनी उभी
 • ओहोळते अवसेची तेढ
 • किनारते अवसेला एक जीवघेणी हाक
 • दाटली दिगंतुनी दिठी-मिठीत राऊळे
 • काळजाच्या कर्पूरल्या पहाटे
 • देह देऊळला दूर, उजेडले उरी
 • केकावले रोमरोम काकडले बीज
 • ठिगळले ठायी ठायी, निकटले गाव
 • आजोळली आठवण तिला अंगाईचा वास *माहेरले रोमरोम आई शब्दांच्या पल्याड
 • डहाळल्या यातनांचा वस्त्रगाळ उजवाड
 • राऊळले अंग,पाचोळले पुण्य
 • कांबळले तम चौफेर कोंदाटे
 • अवघ्या उदासीचे कोकिळले रान
  असे ’क्रियाप्रयोग’ रामाणींनी केले आहेत.किंवा सुचलेल्या प्रतिमेचंच हे क्रियापदी रूप आहे असंही म्हणता येईल.एखादा कवी भाषेला किती वेगवेगळ्याप्रकारे स्वत:मधे मुरवून घेऊ शकतो याचा अभ्यास यामधून करता येतो.

५)विशिष्ट शब्दाचं पुन:पुन्हा वेगवेगळं अवतरण- काही ठराविक शब्द,विचार, कल्पना,भावना पुन्हापुन्हा वेगवेगळ्या स्वरुपात कविताभर आलेल्या दिसतात.कवीच्या त्या खूप आवडत्या/खूप भावलेल्या गोष्टी असाव्यात.वेगवेगळ्या वेळी कवीने त्यांचा वेगवगळा अनुभव घेतला असावा.
उदा.तंद्री, बिंब, गर्भ, तम, तळ, देह-विदेह, अदृष्ट, अज्ञेय, अवस, पाखरु झाड अशा काही गोष्टी वारंवार कवितेमधे येते.

पण प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे येतात.
उदा. १)’पिकणे’ हा शब्द-व्यथा पिकणे,विश्व पिकुन वाकणे,मनाच्या मेघांचे धन पिकणे,पिके चांदणे चोखले,या जांभळ्या दिशांचे आले पिकून कंठ,पिकलेली दीठ, उदासीचे पिकले पक्षी असे परिपक्व होण्याचे आयाम घेऊन हा शब्द किती किती व कुठे पोचतो हे खरंच बारकाईने पाहण्यासारखं आहे.
२) ’तंद्री’ हा शब्द-उन्हाळी तल्खुरी तंद्री,तंद्रीच्या तळाशी,तंद्रावलेल्या डोळ्यांनी,तंद्रीचा पूर नावरे,तंद्रीच्या अस्ताला मात्र त्याला समोर दिसले साहेबाचे मुर्दाड मुस्काट,तरारलेल्या तंद्रीत,चंद्र निथळले डोळा निळे तंद्रीचे उखाणे
अशा तंद्रीच्या वेगवेगळ्या रंगछटा दिसतात.
जाणिव-नेणिवांनाच अनेक आयाम असणं किंवा अनेकार्थता असणं हे चांगल्या कवितेचं महत्वाचं लक्षण आहे.त्याचा स्वाध्याय रामाणींची कविता खूप चांगल्याप्रकारे करुन घेऊ शकते.

६) ऋतूसंवेदन- ही एक वेगळ्याच प्रकारची जाणीव रामाणींच्या कवितेत पहिल्या संग्रहापासून प्रकटली आहे.हे ’ऋतूंचं शब्द व भावचित्रीकरण’ आहे असं म्हणता येईल.फक्त पहिल्या संग्रहात हे ऋतूसंवेदन थोडं वरवरचं वाटतं व उत्तरोत्तर ते ’पिकत’गेल्याचं दिसतं. सर्व ऋतू तसेच चैत्र वैशाखादि मराठी महिने वेगवेगळ्या मूडमधे इथे दिसतात. ’आषाढाची शिशिर रजनी गांजली गारठ्याने’ या ’आषाढसूक्त’ (दर्पणीचे दीप)कवितेतला ओला शृंगार हे याचं उत्तम उदाहरण आहे.
*चाफ्याहून तीव्र उन्हाचा वैशाखी घमघमाट
*ग्रीष्म झाले रोमरोम,ग्रीष्मगर्भ अनुताप
*चतुर चैत्रगंध उठे शिशिरधुंद मातीतुन
*चैत्रदुपारशा देही,पौषकांतीचा किनारा
*अश्विनी आकाशाचे अवजाळी रंग
*श्रावणखुळे कोण गं आले
*आषाढमिठीत अत्तरली माती
*घ्यावी वैशाख उन्हाची चव चाखून चोखून
*एका चैत्रचुंबी फांदीला
*ही हिवाळी विधवा वेळ, ज्येष्ठ जहाल झडीने
*तिथे चैत्रसे विश्व विस्तारलेले
*अर्थ-आशयाची कार्तिकी काकड
*पिंपळपानांवरती ऊन फाल्गुनी फुलते
*गांजल्या ग्रीष्मभाराच्या चाहुली चैत्रचोरट्या

असं एकूण विस्मयकारक ऋतूचित्र आहे.
७)मर्यादा/दोष- समग्र कविता वाचल्यानंतर काही ठिकाणी काही दोष जाणवतात.
उदा.व्यथा,वेदना,सोसणं,दु:खातिरेक आणि प्रत्येकवेळीच पराकोटीला गेलेल्या संवेदनेमधे नंतर नंतर थोडासा एकसूरीपणा जाणवू लागतो.गूढाचं कवितेला असणारं वेड काहीठिकाणी जरा जास्त ताणल्यागत वाटतं. काहीवेळा आध्यात्मिक अनुभूती थोड्या बोजड वाटतात किंवा प्रत्येक गोष्ट अध्यात्माकडेच वळवण्याचा अट्टहास काहीवेळा दिसतो.पण असे असले तरी अर्थातच या किरकोळ गोष्टी कवितेच्या मर्यादा किंवा अभिव्यक्तीचा एक वेगळा स्तर म्हणून समजून घेता येऊ शकतात. त्यात काही गैर नाही.संवेदनसातत्य ही काही चुकीची गोष्ट नव्हेच.तो तर एक तपाचरणासारखा भाग आहे..ती एकच एक ’कविता’ या सहित्यप्रकाराच्या एकनिष्ठेने केलेली साधना आहे.
आता यालाच जोडून रामाणींच्या व्यक्तिमत्वातला एक गंमतीशीर आश्चर्याचा भाग (त्यांच्यावरच्या लेखांमधून व त्यांच्या सहवासात आलेल्या काही व्यक्तींकडून समजलेला) शेवटी सांगावासा वाटतो. माझ्या लेखनातील हा शेवटचा मर्यादांचा भाग आत्ता रामाणी आपल्यामधे नाहीत म्हणून मी लिहू शकले. आत्ता ते असते तर हे मुद्दे लिहून मी त्यांचा रोष नक्कीच ओढवून घेतला नसता; ही ती गंमतीची गोष्ट आहे! त्यांच्या कवितेविषयी टीकात्मक बोललेलं त्यांना फार आवडायचं नाही.त्यांचे काहीजणांशी वादही झाले.त्यांचे मित्र व ज्येष्ठ समीक्षक कै.डॉ.प्रल्हाद वडेर यांनी ते सारे स्वभावविशेष अत्यंत ममत्वाने ’आठवणीतले रामाणी’ या लेखात लिहिले आहेत..२८नोव्हेंबर २००३ रोजी रामाणींचं निधन होऊन आज १७ वर्षे लोटल्यानंतर हे सारे आपल्यासाठी केवळ आठवणींचे किस्से ठरले आहेत.’एका प्रतिभावंत कवीचा अनेकार्थता असणारा भूतकाळ’ असं म्हणून हे किस्से वाचताना, ऐकताना आज त्याचं अप्रूपच वाटत राहतं..
अजून एक… रामाणींच्या बाबतीतल्या खडतर लौकिकाची गोष्ट आणि आपल्या दुर्दैवाची!ती अशी की,रामाणींच्या कवितेचं अनन्यसाधारणत्व गुणात्मकदृष्ट्‌या कितीही मान्य झालं तरी त्यांच्या कवितेचा म्हणावा तसा गवगवा मराठी साहित्यक्षेत्रात झाला नाही. कदाचित मराठी साहित्य व्यवहारातील साहित्यबाह्य गोष्टी याला कारणीभूत ठरल्या असाव्यात आणि चोख कवितेच्या बाबतीतही या अशा शापाची परंपरा आपल्याकडे आहेच त्यामुळे रामाणींची कविता यात सापडली हे संपूर्ण मराठीचंच अभाग्य म्हणावं लागेल!गूढाची सरलता असणारी,भारतीय ज्ञानपरंपरांची सर्वार्थाने पाईक असणारी,श्रेष्ठ आध्यात्मिक उंचीची आणि तरीही समष्टीला वेगळ्या पद्धतीने कवेत घेणारी ही ऋतूगर्द कविता मराठी साहित्यक्षेत्रात तुलनेने बरीच उपेक्षित राहिली ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे!याचसंदर्भात कै.डॉ.म.सु.पाटील यांनी रामाणींच्या कवितेवर लिहीलेल्या दीर्घ समीक्षालेखात शेवटी केलेलं एक स्पष्टविधान महत्वाचं ठरतं.डॉ.म.सु.म्हणतात-आजची बरीच लेखक समीक्षक मंडळी गट करुन राहणारी आहे. कोणाला गाजवायचे,कोणाला पाडायचे आणि कोणाबद्दल मौन पाळायचे हा आजच्या काळात डावपेचांचा भाग असतो. सत्तरीच्या दशकानंतर ही गटबाजी अतिशय ठळकपणे जाणवू लागलेली आहे.अशा सगळ्या वातावरणात सगळ्या गटांपासून अलिप्त राहून,केवळ कवितेशी निष्ठा बाळगून काव्यसाधना करणारा तिचा उपासक दुर्लक्षित राहिला,तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही
देशपातळीवर मराठीसाठी मिळणारा किंवा त्या दर्जाचा एखादा महत्वपूर्ण सन्मान विश्वकवितेचा दर्जा असणा-या कवितेला मिळू शकला नाही याचा आजन्म खेद केवळ गोमंतकाच्याच नव्हे तर समस्त मराठीच्याच भाळी भळभळत राहिला आहे…खुद्द रामाणींनाही या गोष्टीची एक बोचरी सल कायम होतीच.पण ते आपले ’मला अभाग्याला घडे अज्ञाताचा अभिषेक’ म्हणून मोकळे झाले आणि स्वत:च त्यापासून दूर राहिले त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्या काव्यसाधनेत कधीच अडथळा आणू शकल्या नाहीत हे खूप महत्वाचं!
रामाणींना अखेरीची काही वर्षे स्मृतिभ्रंशाची व्याधी जडली. निवृत्तीनंतर बेळगावला स्थायिक झालेल्या रामाणींना भेटायला त्यांच्याशी ३२ वर्षे मैत्री असलेले त्यांचे जवळचे मित्र ज्येष्ठ कोकणी साहित्यिक वेणीमाधव बोरकर गेले असता कविता लिहील्याच्या दोन-तीन गोष्टीच टेप रिवाईन्ड झाल्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा सांगत राहिले.. बोरकरांचा स्वर आजही हे सारं सांगताना दाटून येतो… रामाणींच्या पुतण्याने त्यांची चांगली सेवा केली.त्यांच्या पत्नी लीलाताई रामाणी त्यांच्यानंतर काही वर्षांनी गेल्या.शेवटचे काही महिने त्यांना पुतण्याने गोव्यात मूळ गावी व उपचारांकरता बांबोळीच्या गोवा मेडिकल कॉलेजला आणलं होतं व त्यांच्या प्रिय गोमन्तकभूमीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अगदी शेवटी काही दिवस कोमामधे आणि त्यापूर्वी पूर्ण स्मृतीभ्रंशात असल्यामुळे झाल्या- गेल्या सर्व लौकिक गोष्टींपासून हा संन्यस्त कवी असतानाच खूप दूर निघून गेला होता.इथे असतानाच त्याच्या प्रिय अज्ञाताच्या,अज्ञेयाच्या, अदृष्टाच्या प्रदेशात पोचला होता..त्यामुळे आताही जिथे कुठे असेल तिथे तो कवितेच्या साधनेतच मग्न असेल..सार्थकात असेल.. एखाद्या हिरव्यागार पानावर पाण्याचा थेंब होऊन लिहीत असेल!
आज त्यांच्यामागे त्यांचं समग्र साहित्य समोर येणं हा त्यांच्या कवितेचा खरा गौरव आहे.समकालीन लेखक-कवींसाठी ती महत्वाची गोष्ट आहे.एक-दोन गाजलेल्या कवितांच्या पलीकडचे रामाणी समकालीनांना माहित नाहीत,वाचलेले नाहीत अशी वस्तुस्थिती आहे.सोशल मिडीयाने फार उथळ करुन टाकलेली ’कविता’ नावाची गोष्ट नेमकी कशी असते?याचं भान देणारी,पूर्वसुरींच्या साहित्यातली एक खूप महत्वाची कविता म्हणून रामाणींच्या समग्र कवितेचं वाचन व चर्चा नव्याने व्हायला हवी आहे.
आधीच आपण जगतोय त्या धकाधकीच्या तांत्रिक युगात निव्वळ एका कवितेचं बोट धरुन आपण जगण्याची धडपड करीत आहोत.पण कविता अशी विलक्षण की ती क्वचितच कधीतरी हाती गवसणारी आणि बहुतांशवेळा हुलकावणीच देणारी..पण आजच्या होतकरु लिहित्या हातांना त्यातूनही शिकायचंय, वाचायचंय,लिहायचंय.. खूप चांगलं लिहायचंय. पण सभोवती तर सवंग पैसा प्रसिद्धी जाहिरातींचा व राजकारणाला लाजवील अशा ’साहित्यकारणां’चा इतका सुकाळ की त्या तीव्र झोतासारखा- ’त्या उजेडासारखा दिसणारा अंधारच’ आपल्याभोवती दाट पसरलाय हेही कळेनासं झालंय.. रामाणींनी म्हटलेली ’भयाण भिंगुळ स्थिती’ ती हीच असू शकते..त्यांच्या कवितेतला ’तम’ म्हणजे जाणिवांच्या भोवतीचा हाच अंधार असू शकतो आणि ’ओठात उष:सूक्त ओथंबलेली’ त्यांची कविता याच तमाच्या तळाशी ’अलक्ष दिवे लागण्याचा’ चमत्कार ठरु शकते!

         ************

*संदर्भग्रंथ-
१)डॉ.के.के.अहिरे,मराठी विभाग प्रमुख- कला,विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय,भुसावळ यांचे ’गोमंतकीय कवी शंकर रामाणी’ हे ’अथर्व पब्लिकेशन्स्’ने १जानेवारी २०१२रोजी प्रकाशित केलेले पुस्तक. या पुस्तकात रामाणींवरचे १२ लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.त्यात डॉ.म.सु.पाटील,डॉ.प्रल्हाद वडेर,डॉ.रमा मराठे, प्रा.रवींद्र घवी, सुभाष भेण्डे,ल.ग.जोग, डॉ.सोमनाथ कोमरपंत,डॉ.अरुणा ढेरे,अशोक जोशी,डॉ.नरेश कवडी,प्रा.म.द.हातकणंगलेकर व स्वत: डॉ.अहिरे यांचे लेख आहेत.
२)डॉ.के.के.अहिरे यांचं ’कविताव्रती शंकर रामाणी’हे प्रबंधाचं पुस्तक
(या लेखातील रामाणींच्या व्यक्तीगत जीवनाविषयीची माहिती वरील दोन पुस्तकांमधून तसेच रामाणींच्या काही स्नेहीजनांकडून मिळाली आहे.)

*संदर्भलेख व टिपण —
१)’आस्वाद भावलेल्या कवितांचा’(वर्णमुद्रा प्रकाशन) या डॉ.सुधीर रा.देवरे यांच्या पुस्तकातील ’स्वच्छ एकटेच तळे’कवितेवरचा रसग्रहणलेख
२)’एका तपातील निवडक गोमन्तकीय साहित्याचे मूल्यमापन’या डॉ.अशोक कृष्णाजी जोशी यांच्या समीक्षाग्रंथातील ’एका प्रगल्भ कवीची कविता- दर्पणीचे दीप’ हा समीक्षालेख
३)२०१४ सालच्या अभंग पुस्तकालय,नांदेड यांच्या ’अभंगडायरी’मधले हेमंत जोगळेकर यांचे ’दिवे लागले रे’ कवितेवरचे टिपण

*मार्गदर्शन व सहकार्य-
ज्येष्ठ कोकणी साहित्यिक वेणीमाधव बोरकर, गोव्याचे ज्येष्ठ मराठी समीक्षक डॉ.सोमनाथ कोमरपंत,डॉ.मृणालिनी कामत,बडोदा , कवयित्री आश्लेषा महाजन,’दै.नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू

        ****************