2,208 सरकारी जागांसाठी लवकरच जाहिरात येणार

0
3

गोवा कर्मचारी निवड आयोगाकडून सरकारच्या विविध खात्यांतील आणखी 2,208 जागा भरण्यासाठी लवकर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य सरकारने 2019 मध्ये सरकारी खात्यातील क वर्गातील नोकरभरतीसाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाची स्थापना केली होती. सुरुवातीची 3 वर्षे गोवा कर्मचारी निवड आयोग केवळ नाममात्र होता. सरकारच्या विविध खात्यांकडून नोकरभरतीसाठी थेट जाहिराती प्रसिद्ध करून पदे भरली जात होती. राज्य सरकारने 2023 पासून गोवा कर्मचारी निवड आयोगाला सक्रिय केले आहे. आयोग सक्रिय झाल्यानंतर सुध्दा सरकारी खात्यांना पदांच्या थेट भरतीसाठी कायद्यात दुरुस्ती करून मुदतवाढ दिली जात होती.

यानंतर आयोगाने सर्व खात्यांच्या प्रमुखांना पत्र पाठवून पदाच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. 2023 मध्ये सरकारच्या 22 खात्यांनी 922 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केले. 2024 मध्ये 30 खात्यांनी 1082 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केले, तर 2025 मध्ये 41 खात्यांनी 1425 पदे भरण्यासाठी आयोगाकडे प्रस्ताव सादर केले.

आयोगाकडे विविध सरकारी खात्यांतील एकूण 3429 जागा भरण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आयोगाने आत्तापर्यंत 2023 मध्ये नोकरभरतीची एक, 2024 मध्ये नोकरभरतीच्या दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या, तर 2025 मध्ये आत्तापर्यंत दोन जाहिराती प्रसिद्ध करून विविध खात्यातील 1,221 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत आयोगाच्या शिफारशीनुसार 48 पदे भरण्यात आली आहेत, तर शिल्लक 2208 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आयोगाकडून सरकारी खात्यांतील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जातात. त्यानंतर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची सीबीटी परीक्षा घेऊन सरकारी खात्यांतील पदांसाठी उमेदवारांची निवड करून पदे भरण्यासाठी शिफारस केली जाते. आयोगाकडे सीबीटी परीक्षेचा निकाल सुध्दा ताबडतोब जाहीर केला जातो.

राज्य सरकारच्या तुरुंग महानिरीक्षक, कौशल्य विकास, वाहतूक, वजन व माप खाते, पोलीस दल, ग्रामीण विकास, उच्च शिक्षण, शिक्षण खाते, तांत्रिक शिक्षण, मुद्रणालय, कृषी खाते, संग्रहालय, समाज कल्याण, जलस्रोत खाते, माहिती खाते, बंदर कप्तान खाते, आदिवासी कल्याण, अभियोक्ता, पशुवैद्यकीय खाते, सेटलमेंट, पुराभिलेख, दंत महाविद्यालय, वीज खाते, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, विज्ञान-तंत्रज्ञान खाते, मुख्य निवडणूक अधिकारी, सहकार खाते, कारखाने व बॉयलर, मच्छिमारी, पर्यटन, व्यावसायिक कर, नोटरी सेवा, उद्योग संचालनालय, नियोजन व सांख्यिकी, सार्वजनिक तक्रार निवारण, क्रीडा खाते, गोवा सदन, नागरी पुरवठा खाते, माहिती तंत्रज्ञान, लेखा संचालनालय, लॉटरी, राजभवन, रोजगार व कामगार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, खाण संचालनालय, गृहरक्षक, पंचायत, कला-संस्कृती, सार्वजनिक बांधकाम, नदी परिवहन, सर्वसामान्य प्रशासन, सैनिक कल्याण, नगर विकास, महिला व बाल कल्याण, कामगार व रोजगार आयुक्तालय आदी खात्यात पदांची भरती केली जाणार आहे.