2022 पूर्वीच्या नोकरभरतीसाठी राज्य सरकारकडून पुन्हा मुदतवाढ

0
2

विविध सरकारी खात्यांना 8 जानेवारी 2022 पूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमधील नोकरभरतीसाठी राज्य सरकारने येत्या 30 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात सरकारी खात्यांतील नोकरभरतीसाठी आता गोवा कर्मचारी निवड आयोगाची स्थापना केलेली आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने दुसऱ्या बाजूने निर्धारित मुदतीमध्ये विविध खात्यांतील नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या सरकारी खात्यांना नोकरभरतीसाठी मुदतवाढ देण्याचे सत्र आरंभले आहे.

राज्य सरकाराने गोवा कर्मचारी निवड आयोग कायदा 2019 मध्ये दुरुस्ती अधिसूचित केली आहे. गेल्या 31 ऑक्टोबर 2023 पासून ही दुरुस्ती लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने सरकारी खात्यातील क आणि ड श्रेणींतील नोकरभरतीसाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाची स्थापना केली आहे. तथापि, या आयोगाच्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी 8 जानेवारी 2022 पूर्वी विविध सरकारी खात्यांनी नोकरभरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या होत्या. या नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आत्तापर्यंत अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, अजूनपर्यंत अनेक खात्यांची जुनी नोकरभरतीची प्रक्रिया अपूर्णावस्थेत आहेत. राज्य सरकारने आता ही जुनी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जुलै 2024 पर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत पूर्ण होण्यापूर्वी संबंधित सरकारी खात्यांनी उमेदवारांच्या परीक्षा, मुलाखती घेऊन नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, गोवा कर्मचारी नोकरभरती आयोगाने आत्तापर्यंत अनेक सरकारी खात्यातील विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या आयोगाने काही सरकारी खात्यांतील नोकरभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल सुध्दा जाहीर केला आहे.