2004 ते 2014 हे देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट दशक

0
5

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका; मात्र अदानींच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेतील आपल्या भाषणात काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या 2004 ते 2014 या काळात देशात कशाप्रकारे घोटाळे झाले, देशाची कशी अधोगती झाली, याचा पाढा मोदींनी वाचला. 2004 ते 2014 या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. 2004 ते 2014 हे भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट दशक होते, अशी टीकाही मोदींनी केली.
जवळपास दीड तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षावर अपेक्षेप्रमाणे टीका केली; पण काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अदानींच्या मुद्द्यावरुन उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाबाबत नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले नाही. किंबहुना नरेंद्र मोदी यांनी सभागृहात अदानी समूह किंवा गौतम अदानी यांच्याबाबत चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण नेहमीप्रमाणे जोरदार झाले असले तरी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरितच राहिल्याची चर्चा आता रंगली आहे.
2004 ते 2014 या काळात भारताची अर्थव्यवस्था ढासळली. महागाई दोन अंकी राहिली. यूपीएच्या याच 10 वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत राहिले. त्यांच्या काळात देश सुरक्षित नव्हता. 2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही. 10 वर्षे देशभर रक्त वाहत होते, असेही मोदी म्हणाले.
त्या 10 वर्षांत भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की कोणीही ऐकायला तयार नव्हते. प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर करणे ही यूपीएची ओळख बनली होती. जेव्हा तंत्रज्ञानाचे युग खूप वेगाने वाढत होते, त्याच वेळी ते 2जी मध्ये अडकून राहिले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील घोटाळ्याने संपूर्ण देश जगात बदनाम झाला, असेही मोदी म्हणाले. 2004 ते 2014 हे दशक ‘द लॉस्ट डिकेड’ म्हणून ओळखले जाईल, तर आताचे 2030 हे दशक भारताचे आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या पतनाबाबत मोदींची खोचक टीका
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात हार्वर्ड विद्यापीठातील एका रिसर्चचा दाखला दिला. हार्वर्ड विद्यापीठात अलीकडेच ‘राईज अँड डिक्लाईन ऑफ इंडियाज काँग्रेस पार्टी’, असा विषय घेऊन अभ्यास करण्यात आला. भविष्यात काँग्रेस पक्षाच्या पतनाबाबत हार्वर्ड नव्हे तर जगातील अनेक नामांकित विद्यापीठे अभ्यास करतील. काँग्रेस पक्ष बुडवणाऱ्या लोकांचाही अभ्यास केला जाईल, अशी खोचक टिप्पणी मोदींनी केली.

पंतप्रधान मोदी अदानींना वाचवताहेत : राहुल गांधी
माझ्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्क्यातून सावरले नसावेत. त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मी त्यांना कोणतेही किचकट प्रश्न विचारले नव्हते. तुम्ही गौतम अदानी यांच्यासोबत कितीवेळा गेला आहात? त्यांना कितीवेळा भेटलात? माझे हे प्रश्न अत्यंत साधे होते. पण पंतप्रधान मोदी यांनी त्यावर उत्तर दिले नाही. यावर मी समाधानी नाही. अदानी समूहावरील आरोपांच्या चौकशीबाबत ते काहीच बोलले नाहीत. यावरुन एक स्पष्ट होतेय की, मोदी हे अदानींना वाचवत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.