शवदर्शन सोहळ्यास आजपासून प्रारंभ

0
198
से कॅथेड्रलसमोर पोलिसांना मार्गदर्शन केले जात असताना (छाया : नंदेश कांबळी)

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर शवदर्शन सोहळ्याला आज दि. २२ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रार्थना सभेने प्रारंभ होणार आहे. दि. ४ जानेवारीपर्यंत चालणार्‍या या शवप्रदर्शन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज सकाळी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेनंतर बॅसिलिक ऑफ बॉं जिझसमधील ही शवपेटी सन्मानपूर्वक से कॅथेड्रल चर्चमध्ये नेण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येतील भाविक उपस्थित राहणार आहेत. यात गोव्याचे आर्चबिशप ज्येष्ठ धर्मगुरु, राजकीय नेतेमंडळी आदिंचा प्रामुख्याने समावेश असेल. दर दहा वर्षांनी शवदर्शन येथील से कॅथेड्रल चर्चमध्ये भरविण्यात येते. चर्चमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. आजपासून सुरु होणारे हे शवप्रदर्शन दि. ४ जानेवारी १५ पर्यंत चालु राहणार आहे. याकाळात देश विदेशातील भाविक सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या शवाचे दर्शन घेणार आहेत. तब्बल ४५ दिवस हे शवप्रदर्शन येथे चालू राहणार असल्याने पोलिस यंत्रणेवर बराच ताण पडणार आहे. दि. ३ डिसेंबर रोजी या सायबाचे वार्षिक फेस्त येत असल्याने या दिवशी मोठी गर्दी अपेक्षित आहे. देश विदेशातील भाविक येथील शवदर्शन सोहळ्याला उपजस्थत राहणार असल्याने विविध देशी-विदेशी भाषामधील प्रार्थना सभा येथे होणार आहेत. याचे वेळापत्रकही येथे लावण्यात आले आहे. कोकणी-मराठी बरोबर इंग्रजी, इटालीयन, मल्याळम, तामीळ, पोर्तुगीज, फ्रेंच, कन्नड, हिंदी, गुजरातीतून प्रार्थना सभा होणार आहेत. यात बिशप आर्चबिशप, ज्येष्ठ धर्मगुरु भाविकांना उपदेशपर संदेश देणार आहेत. यापूर्वी १७८२, १८५९, १८७९, १९००, १९१०, १९२२, १९३१, १९४२, १९५२, १९६१, १९६४, १९७४, १९८४, १९९४, २००४ व यावर्षी २०१४ साली असे एकंदर १६ शवदर्शन सोहळे आयोजित केले गेले आहेत. आजच्या सेंट फ्रान्सिस शवदर्शन सोहळ्यानंतर दि. २४ रोजीपासून नऊ दिवस नोव्हेनांना सुरुवात होणार आहे. नऊ दिवस पहाटे पासून रात्री नियोजित काळात प्रार्थना सभांचे दररोज आयोजन करण्यात आले आहे.