७५% प्रौढांचे लसीकरण पूर्ण

0
14

>> केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

भारत देश सध्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करत आहे. कोरोनाविरोधात भारत देशात कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. देशभरात लसीकरण मोहीम जोरात राबवण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी काल माहिती देताना भारतातील ७५ टक्के प्रौढ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस मिळाले असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविय यांनी दिलेल्या माहितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी, जनतेचे अभिनंदन केले आहे. मदी यांनी, ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला संपूर्ण लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो असे म्हणत, आमची लसीकरण मोहीम यशस्वी करणार्‍या सर्वांचा मला अभिमान असल्याचे सांगितले.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण लसीकरणांची संख्या १,६५,७०,६०,६९२ वर पोहोचली आहे. यावर आनंद व्यक्त करताना आरोग्यमंत्री मांडविय यांनी ट्वीट करत, सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने, भारताने आपल्या ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला लशीचे दोन्ही डोस देण्याचे ध्येय गाठले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत. आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे आणि लवकरात लवकर लस घ्यावी असे आवाहन केले आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांत वाढ
गेल्या आठवड्यापासून भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असले तरी ओमिक्रॉन प्रकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ओमिक्रॉन प्रकारामुळे भारतासह जगभरात हाहाकार माजला असून त्याचा लहान मुलांना फारसा धोका नसल्याचे सुरूवातीला म्हटले जात होते. परंतु आता मुलांवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुलांना रुग्णालयात भरती करण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ओमिक्रॉन लागण झालेल्या मुलामध्ये सामान्यतः दिसणारी लक्षणे जाणून घ्यावीत असे मंत्रालयाने म्हटले आहे.