६० पदांची भरती प्रक्रिया झाली रद्द

0
88

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील १० महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवरील कनिष्ठ कारकून व डेटा एन्ट्रीपदाच्या पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. महसूल खात्यामधील नियमित विविध पदांच्या भरतीसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील ४० कंत्राटी कर्मचार्‍यांच्या रोजगार प्रश्‍नी महसूल मंत्री खंवटे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांना एक निवेदन काल सादर केले.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील ४० कंत्राटी पद्धतीवरील कर्मचार्‍यांचे कंत्राट नोव्हेंबर २०१७ मध्ये समाप्त झाले आहे. तरीही सदर कर्मचारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा देत होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेतून परतल्यानंतर नियमित पदाच्या नोकरभरतीला गती मिळणार आहे. महिला कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील ४० कंत्राटी कर्मचार्‍याबाबत सविस्तर माहिती देऊन शंकांचे निरसन केले आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.