५ मृत्यूंसह १४२ कोरोना पॉझिटिव्ह

0
243

राज्यातील कोविड प्रयोगशाळेतील कोविड स्वॅबच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून चोवीस तासांत नवीन १४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना रुग्णांच्या बळींची एकूण संख्या ६०९ झाली आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ७६८ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २२४४ एवढी झाली आहे. चोवीस तासात बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत ८९२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

२३७ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी २३७ रुग्ण बरे झाले असून बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९१५ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४८ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ५७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात कोरोना पॉझिटिव्ह ४३ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

आणखी ५ रूग्णांचा मृत्यू
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये गेल्या चोवीस तासांत आणखी ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ३ रुग्ण डिचोलीतील आहेत. एका रुग्णाचा इस्पितळात दाखल केल्यानंतर केवळ तासाभरात मृत्यू झाला. तर, अन्य एका रुग्णाचा इस्पितळात दाखल केल्यानंतर केवळ ६ तासांत मृत्यू झाला आहे. चिंबल येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्ण, डिचोली येथील ७० वर्षीय पुरुष रुग्ण, डिचोली येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्ण आणि डिचोली येथील २५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उत्तर गोव्यात पणजी येथे सर्वाधिक १३० रुग्ण आहेत. पर्वरी आणि चिंबल येथे प्रत्येकी १२८ रुग्ण, कोलवाळ येथे १२५ रुग्ण आहेत. तर, दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक २०८ रुग्ण आहेत. फोंडा येथे १२८ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरापेक्षा कमी आहे. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ७९ रुग्ण आणि दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ५७ रुग्ण उपचार घेत आहे. या दोन्ही ठिकाणच्या कोविड सेंटरमधील बहुतांश खाटा रिक्त आहे.

सरासरी दीड हजार चाचण्या
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दोन हजार ते अडीच हजार स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्याची घोषणा केली होती. तथापि, मागील महिन्यात दिवसाला सरासरी दीड हजारांच्या आसपास स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत होती. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी केवळ ८९२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.