Home Featured ५४ दिवसांनंतर बळींची एकेरी संख्या

५४ दिवसांनंतर बळींची एकेरी संख्या

0

>> शुक्रवारी ८ मृत्यूंसह ४२३ कोरोनाबाधित

>> बरे होण्याचे प्रमाण ९४.९९ टक्के

>> एकूण बळी २८९९

राज्यात ५४ दिवसांच्या कालावधीनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एकेरी संख्येवर आला आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून नवे ४२३ रुग्ण आढळून आले आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ५ हजार २०१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २८९९ झाली आहे. नवे कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११.७५ टक्क्यांवर वर आले आहे. तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मृत्यूसत्रावर नियंत्रण
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूसत्रावर अखेर नियंत्रण येत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत घट होत आहे. राज्यात १७ एप्रिल २०२१ रोजी ४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. तर, १८ एप्रिलपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास प्रारंभ झाला. एप्रिल महिन्यात तीनशेपेक्षा जास्त रुग्णांचा बळी गेला. मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना मृत्यूंच्या संख्येत हळूहळू घट होण्यास सुरुवात होती. काल शुक्रवार दि. ११ जून रोजी ८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने कोरोना मृतांची संख्या एकेरीवर आली आहे.
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ६ रुग्णांचा आणि दक्षिण गोवा इस्पितळात १ रुग्णाचा मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात १ रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

चोवीस तासांत ४२३ रुग्ण
राज्यात नव्या कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत आहे. राज्यात चोवीस तासांत नवे ४२३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ३५९९ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील ११.७५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून ७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार ५७६ एवढी झाली आहे.

फोंडा येथे सर्वाधिक ५४८ सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३५६ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २५० आणि चिंबलमधील रूग्णसंख्या ३११ एवढी आहे. कांदोळी येथे १७० रुग्ण, कुठ्ठाळी येथे १८८ रुग्ण, कासावली येथे १५०रुग्ण, पर्वरी येथे १८९ रुग्ण, पेडणे येथे १९० रुग्ण, साखळी १८० रुग्ण, कुडचडे येथे १३४ रुग्ण आहेत.

२४ तासांत ५० जण इस्पितळांत
गेल्या चोवीस तासांत नव्या ६७ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येचेही प्रमाण बरेच कमी झाले आहे.

८१९ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी ८१९ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५३ हजार ४७६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९९ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ३७३ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.

३१ जुलैपर्यंत प्रत्येकाला लशीचा
पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी येत्या रविवार १३ जून २०२१ पासून ग्रामपातळीवरील लस महोत्सव-३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व नागरिकांना येत्या ३१ जुलै २०२१ पर्यंत लशीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाद्वारे दिली.
वय १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. नागरिकांनी आपल्या गावातील लसीकरण केंद्रात जाऊन थेट नोंदणी करून लस घ्यावी. एका गावातील नागरिकांनी दुसर्‍या गावातील केंद्रावर जाऊन लस घेऊ नये. प्रत्येक गावात लसीकरण शिबिर आयोजित केले जाणार आहे. नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रात १६४ ठिकाणी लस महोत्सव-३ चे आयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील कायमस्वरूपी ४० लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. या वयोगटातील नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन लसीकरण करून घ्यावे. नगरपालिका, पंचायत क्षेत्रातील सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
राज्यातील लस महोत्सव २ मध्ये लहान मुलांचे पालक, दिव्यांग, खलाशी, मोटर सायकल पायलट, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांचे लसीकरण करण्यात आले आहे. लस महोत्सव ३ चे सविस्तर वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.