५२ लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी पणजी मनपाचा कारकून निलंबित

0
107

>> संशयिताला शहराबाहेर न जाण्याची अट

‘कारकून कवळेकरला या प्रकरणी कोणाचा आशीर्वाद होता हे चौकशीनंतर स्पष्ट होईल’
– महापौर सुरेंद्र फुर्तादो

 

पणजी महापालिका क्षेत्रातील सोपो कर व पे पार्किंगच्या सुमारे ५२ लाख रुपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी वरिष्ठ कारकून नारायण कवळेकर याना सेवेतून निलंबित करून चौकशी सुरू केली आहे. महापालिकेच्या परवानगीशिवाय पणजी महापालिका क्षेत्राबाहेर न जाण्याची अट कवळेकरांना घालण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०१४ ते २०१५ या काळासाठी वरीकर वसुलीसाठी ४३ लाख २१ हजार रुपयांचे कंत्राट जुझे ग्रासिएस याना दिले होते. पैकी १२ लाख ४७ हजार रुपये तिजोरीत आले नाहीत त्यानंतर २०१५ ते २०१६ साठी राजन मयेकर यांना ६२ लाख ७ हजार रुपयांचे कंत्राट दिले होते. त्यातील २८ लाख ६७ हजार रु. तिजोरीत जमा झाले नाहीत.
२०१६-१७ साठी पे पार्किंगचे दर महिन्यासाठीचे ५ लाख २५ हजार रुपयांचे कंत्राट मेसर्स स्ट्रेट डिल सर्व्हिसेसला दिले होते. परंतु वरील कंत्राटदाराने अद्याप एकही पैसा महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेला नाही. सुमारे ५२ लाखांचा हा घोटाळा आहे. व्यापार परवाने, एटीएम परवाने, ऑक्युपन्सीच्या रुपाने गोळा करण्यात येणार्‍या कराच्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे कवळेकर यांच्या विरुध्द पोलीस स्थानकावर, दक्षता खात्यात व लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करावी, अशी सूचना आपण महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे, अशी माहिती महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिली. साध्या वरिष्ठ कारकूनकडून प्रचंड घोटाळा कसा झाला, याची चौकशी केल्यास त्यांना कुणाचा आशीर्वाद होता हे कळू शकेल, असे फुर्तादो यांनी सांगितले.