५० जिल्हा पंचायतींसाठी तूर्त ३२० उमेदवार

0
98

शेवटच्या दिवशी उत्तर गोव्यातून ४७ व दक्षिण गोव्यातून ७३ अर्ज
गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या पन्नास मतदारसंघांसाठी काल अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर गोव्यातून १६६ व दक्षिण गोव्यातून १६० मिळून एकूण ३२६ उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्जांची छाननी होणार असून उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच उमेदवारांचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे.
काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर गोव्यातून ४७ व दक्षिण गोव्यातून ७३ मिळून १२० जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उत्तर गोव्यातील ३ लाख ८९ हजार ४५५ व दक्षिण गोव्यातील ३ लाख ९१ हजार ६२ मतदार मिळून एकूण ७ लाख ८० हजार ५१७ मतदार येत्या १८ मार्च रोजी आपला मताधिकार बजावणार आहेत.
तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझमध्ये १२, ताळगावमध्ये ५, चिंबलमध्ये ४, तर खोर्लीमध्ये १० आणि सेंट लॉरेन्समध्ये ५ उमेदवार सध्या रिंगणात आहेत.पेडणे तालुक्यात हरमलमध्ये ५, मोरजीत ९, धारगळमध्ये ५ व तोरसेमध्ये ६ मिळून एकूण २५ उमेदवार सध्या रिंगणात आहेत.
डिचोली तालुक्यात लाटंबार्सेमध्ये ८, कारापूर – सर्वणमध्ये ३, मयेमध्ये ८, पाळीमध्ये ७ मिळून एकूण २६ उमेदवार निवडणुकीला उभे आहेत.
सत्तरी तालुक्यात होंड्यातून ८, केरीतून १०, तर नगरगावमध्ये ९ जण रिंगणात आहेत. सत्तरीत एकूण २७ उमेदवार निवडणुकीला उभे आहेत.
बार्देशमधील कोलवाळमध्ये ४, हळदोण्यात ४, सुकूरमध्ये ४, रेईश मागूशमध्ये ७, पेन्ह द फ्रान्समध्ये ४, शिवोलीत ६, शिरसईत ४, हणजुणमधून १२, कळंगुटमधून ७ उमेदवार निवडणुकीला उभे आहेत.
फोंडा तालुक्यात उसगाव – गांजेमध्ये ९, बेतकी – खांडोळ्यात ५, कुर्टीत १०, वेलींग – प्रियोळमध्ये २, कवळ्यात ४, बोरीत ५, शिरोड्यात १० उमेदवार निवडणुकीस उभे आहेत.
मुरगाव तालुक्यात साकवाळमध्ये ११, कुठ्ठाळीत ७ मिळून एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत.
सांग्यात रिवण मतदारसंघात ४ उमेदवार, तर धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे मतदारसंघात ६ व धारबांदोडा मतदारसंघात ७ जण निवडणूक लढवीत आहेत.
केपे तालुक्यात शेल्डे येथून ७, बार्से मध्ये ७ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सालसेतमधील राया मतदारसंघात ६, नुवेमध्ये ५, कोलव्यात ५, वेळ्ळीत ४, बाणावलीत ४, दवर्लीत १६, गिरदोळीत ४, कुडतरीत ६, नावेलीत ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
काणकोण तालुक्यामध्ये खोला मतदारसंघात ६, पैंगीणमध्ये ६, मिळून १२ उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत.
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आणि सोमवारी अर्ज मागे घेतले गेल्यानंतर एकंदर चित्र स्पष्ट होऊ शकेल.
सावर्ड्यात सहा अर्ज
कालच्या शेवटच्या दिवशी सावर्डे मतदारसंघातून सारिका गावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांची संख्या पाच झाली आहे. काल या मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुवर्णा तेंडुलकर यांनी आणखी एक अर्ज दाखल केला. तर धारबांदोडा मतदारसंघात अपक्ष उमेदवार गंगाराम उर्फ मनिष लांबोर यांनीही आणखी एक उमेदवारी अर्ज भरला. सावर्डे मतदारसंघात यापूर्वी भाजपा उमेदवार सुवर्णा तेंडुलकर, त्यांच्या डमी म्हणून मनिशा शेळके, अपक्ष म्हणून सुविधा संदेश नाईक व माजी सरपंच सुकांती गावकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. धारबांदोडा मतदारसंघात भाजपाचे गोविंद गावकर, अपक्ष म्हणून गोविंद सावंत, गौतम सावंत, गंगाराम उर्फ मनिष लांबोर यांचे अर्ज दाखल झालेले आहेत.
आमदार कवळेकर समर्थकाची उमेदवारी
जिल्हा पंचायतीच्या खोला मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी सदस्य शाणू वेळीप व गणेश वेळीप यांनी अर्ज दाखल केले. यावेळी आमदार चंद्रकांत कवळेकर उपस्थित होते. आतापर्यंत पैंगीण मतदारसंघातून डॉ. पुष्पा अय्या, विंदा सतरकर, ऍड. अनुषा गावकर, प्रणाली प्रभुगावकर, तर खोला मतदारसंघातून कृष्णा वेळीप, बाबू वेळीप, गणेश वेळीप व शाणू वेळीप यांनी अर्ज दाखल केले आहेत.
मुरगाव तालुक्यातून ३३ अर्ज
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी मुरगाव तालुक्यातून एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यात कुठ्ठाळीतून १० तर सांकवाळमधून १३ अर्ज सादर करण्यात आले आहेत.काल शेवटच्या दिवशी एकूण १० उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्यात कुठ्ठाळी व सांकवाळमधून प्रत्येकी ५ जणांनी अर्ज भरले. कुठ्ठाळीतून भाजपातर्फे ओलांसियो सिमॉईश यांनी वनमंत्री एलिना साल्ढाणा यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. तर सांकवाळमधून भाजप गटाध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. काल भरण्यात आलेल्या अर्जांपैकी फिलीप डिसोझा, विल्बर्ट, रॉड्रिग्ज, अच्युत नाईक, तुळशीदास नाईक आणि फ्रान्सिस नुनीस यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. कुठ्ठाळीतून ओलांसियो सिमॉईश (भाजपा), कालिदास नाईक (भाजप), मारियान डायस (अपक्ष), लोवीतन झेव्हियर (अपक्ष) आणि आंतोनियो वाझ (अपक्ष) यांनी अर्ज भरले आहेत.
सत्तरीतून २७ जणांचे अर्ज
जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवारी सादर करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी वाळपईचे आमदार विश्‍वजित राणे समर्थकांनी होंडा, केरी व नगरगाव मतदारसंघातून तीन अर्ज भरले. होंडा मतदारसंघात माजी सरपंचा सौ. सरस्वती सगुण वाडकर, नगरगावातून प्रेमनाथ हजारे तर केरीतून फटी गावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तिन्ही उमेदवारांनी विश्‍वजित राणे यांच्या उपस्थितीत वाळपईतील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वाळपई शहरातून चालत जाऊन वाळपई मामलेदार कार्यालयात उमेदवारी भरली.
होंडा मतदारसंघात दिव्या गोवेकर, सपना परब, डमी उमेदवार रश्मी परब व सरस्वती वाडकर असे चार उमेदवारी अर्ज आले आहेत. केरी मतदारसंघात प्रसाद ठाणेकर, सीताराम गावस, गोविंद कोरगावकर, डमी उमेदवारी ऍड्. गणपत गावकर व फटी गावकर असे पाच उमेदवारी अर्ज तर नगरगाव मतदारसंघातून नंदकुमार कोपार्डेकर, राजेश गावकर, नारायण म्हाळशेकर, प्रेमनाथ हजारे व गोविंद बर्वे या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गोविंद बर्वे यांनी सत्तरीतील विविध संघटनांच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज भरला आहे.
कुठ्ठाळीतून वनमंत्र्यांचे समर्थक सिमॉईश
काल सकाळी भाजपतर्फे कुठ्ठाळीतून गोंय रापणकर संघटनेचे सचिव ओलांसियो सिमॉई यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून वनमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, यावेळी बोलताना वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी मुरगाव तालुक्यातील सांकवाळ व कुठ्ठाळी मतदारसंघातील युतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा दावा करून सांकवाळ मतदारसंघातील मगोच्या उमेदवार अपर्णा भोज नाईक यांना भाजप व आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
तिसवाडीत शेवटच्या दिवशी १३ जणांचे अर्ज
तिसवाडी तालुक्यातून काल भाजपच्या एका डमी उमेदवारासह १३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. काल सांताक्रुझ मतदारसंघातून हेलेना लॉरेन्सो (अपक्ष), इंदिरा फर्नांडिस (अपक्ष), फॅटेन्डी रॉड्रिग्स (अपक्ष) व दीशा कवळेकर (मगो) यांनी अर्ज भरले.
ताळगाव मतदारसंघातून उल्हास नावेलकर (भाजप) व सिडनी पावलो बार्रेटो (अपक्ष) यांनी, खोर्ली मतदारसंघातून अनिशा पेरेरा (अपक्ष), जेनिता पांडुरंग मडकईकर (अपक्ष) व सेलिस्टा साल्ढाणा (अपक्ष) यांनी अर्ज भरले. सेंट लॉरेन्स मतदारसंघातून नीलेश काणकोणकर (भाजप), चंदन वरगावकर (अपक्ष) व भालचंद्र उसगावकर यांनी अर्ज भरले.
डिचोलीतून २६ अर्ज

डिचोली तालुक्यातील मये, सर्वण, कारापूर, पाळी व लाटंबार्से या चार मतदारसंघातून एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काल शेवटच्या दिवशी ४ अर्ज दाखल करण्यात आले. काल शनिवारी मयेतून अमृत कवठणकर व चंद्रेश कवठणकर यांनी अर्ज भरले. पाळीतून लीना लक्ष्मीकांत परब व कारापूर मतदारसंघातून दीप सावंत यांनी अर्ज दाखल केला. तालुक्यात एकूण ९४ प्रभाग असून ५५३८२ मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.