तीन दिवसांत २९ बळी, १५४७ पॉझिटिव्ह
राज्यात नवे ६२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी चार कोरोना रुग्णांचा काल मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २६,१३९ झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५३७५ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३१९ झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ३५१ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २०,४४५ एवढी झाली आहे.
राज्यात सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, बुधवारी कोरोना रुग्णाची मृत्यूच्या संख्येत थोडी घट झाली आहे. राज्यात मागील तीन दिवसात २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
चारजणांचा मृत्यू
बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात कुंभारजुवा येथील कोरोना पॉझिटिव्ह एका ४७ वर्षांच्या पुरुषाला मृतावस्थेत आणण्यात आल्याचे दैनंदिन आरोग्य अहवालात नमूद करण्यात आले आहे. साखळी – डिचोली येथील ७६ वर्षांची महिला रुग्ण, झुवारीनगर वास्को येथील ७४ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि पणजी येथील ७९ वर्षांच्या पुरुष रुग्णाचा गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
एकूण रुग्णसंख्या २६ हजार पार
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णांची संख्या २६ हजार १३९ वर पोहोचली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत २०६६ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २ लाख २९ हजार ८७६ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
कोरोनामुक्तांचा आकडा २० हजारांवर
राज्यात एका बाजूने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसर्या बाजूने कोरोनातून बरे होणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आत्तापर्यंत २० हजार ४४५ रुग्ण बरे झाले आहे. कोरोनातून बरे होणार्यांची टक्केवारी ७८.२१ टक्के एवढी आहे.
पणजीत नवे ३६ रुग्ण
पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत काल नवे ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पणजीत रुग्णांची संख्या ३१४ एवढी झाली आहे. पणजीतील नेवगीनगर, टोक, करंजाळे, रामभुवनवाडा – रायबंदर, बॉक द व्हॉक, सांतइनेज, पाटो रायबंदर, कोर्तिम-मळा, पाटो-पणजी आदी भागात नवीन रुग्ण आढळले आहेत.उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील ५४५ खाटांपैकी १७४ खाटा तर दक्षिण गोव्यातील १००६ खाटांपैकी ५४८ खाटा रिक्त आहेत.
माजी नगरसेवकांचे निधन
पणजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रजनीकांत धोंड यांचे कोरोनामुळे काल निधन झाले आहे. भाटले पणजी येथे राहणार्या धोंड यांना कोरोनाची बाधा झाल्याने ११ सप्टेंबरला बांबोळी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. धोंड हे १९७८ ते १९८३ या काळात पणजीचे नगरसेवक होते.
१६ दिवसांत ८७२१ पॉझिटिव्ह
राज्यात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांत ८,७२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, याच काळात ६,८६८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. याच काळात कोरोना पॉझिटिव्ह १२७ जणांचा बळी गेला आहे.