२०२४ पर्यंतही लढा सुरू ठेवू

0
192

>> शेतकर्‍यांचा इशारा, सरकारसोबतची आठवी चर्चाही निष्फळ

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून शेतकर्‍यांचे आंदोेलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये गुरुवारी ट्रॅक्टर रॅली काढली. आता शेतकर्‍यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच शेतकर्‍यांनी केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही दिल्लीच्या सीमांवर २०२४ पर्यंत म्हणजेच दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत राहणार असल्याचे म्हटले आहे.

भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही गुरूवारी टॅक्टर रॅली काढल्याचे सांगितले. यात २५०० ट्रॅक्टर सहभागी झाले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच प्रजासत्ताक दिनीही आम्ही ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचे टिकैत यांनी स्पष्ट केले. तसेच जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनीही २६ जानेवारी रोजी रॅली काढणार असल्याचे सांगितले. सोमवारी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेच्या सातवी फेरीत कोणताच निर्णय न झाल्याने शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता.

आठवी फेरीही निष्फळ
दरम्यान, शेतकरी आणि आंदोलकांमध्ये काल शुक्रवारी चर्चेची आठवी फेरी झाली. मात्र कालच्या बैठकीमध्येही दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे लावून धरल्याने काहीच ठोस तोडगा न निघताच बैठक संपली. बैठकीत केंद्रीय नेत्यांनी शेतकर्‍यांना पुन्हा एकदा नवे कायदे हे संपूर्ण देशासाठी असून फक्त पंजाब आणि हरियाणापुरते मर्यादित नसल्याचे सांगितले. तर शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम असून राज्यांना आपला कायदा आणू द्यावा अशी मागणी केली.