२०२१ हे वर्ष शेअर बाजारला कसे गेले?

0
16
  • – शशांक गुळगुळे

फेब्रुवारीत केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. हे ‘बजेट’ कसे असावे? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या अर्थसंकल्पात काय प्रस्तावित असेल यानुसार भारतीय अर्थव्यवस्था तसेच शेअरबाजार आकार घेईल.

२०२१ हे वर्ष शेअरबाजारला ‘कभी खुशी, कभी गम’ अशा स्वरुपाचे गेले. या वर्षी गुंतवणूकदारांनी जास्त जोखीम पेलली. कारण, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे त्यातून मार्ग म्हणून गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात जास्त जोखीम घेतली. परिणामी, त्यांना परतावाही जास्त मिळाला. ‘जास्त जोखीम, जास्त परतावा’ हे शेअरबाजारचे ब्रीद आहे. ‘रिस्क है तो इश्क है’ ही शेअरबाजारातल्या गुंतवणूकदारांची धारणा! गेल्या वर्षीच्या चलनवाढीचा विचार करता मुदतठेवींत गुंतवणूक असणार्‍यांना गेल्या वर्षी ‘निगेटिव्ह’ परतावा मिळाला होता. सोन्यानेही गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना हवा तसा हात दिला नाही.

सार्वजनिक उद्योगातील बँका, कंपन्या व बांधकाम उद्योगातील कंपन्या यांचे भाव चढे होते. २०२१ मध्ये शेअरबाजारात गुंतवणूक वाढली. परिणामी, ‘डिमॅट’ खाती उघडणार्‍यांचे प्रमाणही वाढले. जे १.७ दशलक्ष होते, ते वाढून ऑक्टोबर २०२१ पर्यंत साडेतीन दशलक्ष इतके झाले. ३१ डिसेंबर २०२० रोजी मुंबई शेअरबाजारात निर्देशांक ४७ हजार ७५१ अंशांवर बंद झाला होता. सोमवार, २० डिसेंबर रोजी तो ५८ हजार २८३.४२ अंशांवर बंद झाला. गेल्या एक वर्षात शेअरबाजार निर्देशांकात १० हजार ५३२.४२ अंशांनी वाढ झाली. कोरोना जोशात असताना दि. २३ मार्च २०२० रोजी मुंबई शेअरबाजार निर्देशांक प्रचंड कोलमडून २५ हजार ९८१ अंशांवर बंद झाला होता. १८ ऑक्टोबर रोजी मुंबई शेअरबाजाराने प्रचंड उसळी घेतली होती. या दिवशी शेअरबाजार निर्देशांक ६१ हजार ७६६ अंशांवर बंद झाला. बँकांतील मुदतठेवींवर वर्षाला मिळणार्‍या ५ टक्के व्याजाच्या तुलनेत शेअरबाजारने गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला.

२०२१ मध्ये भांडवली बाजारपेठेत ‘आयपीओ’ फार मोठ्या प्रमाणावर आले. या कंपन्यांचे ‘लिस्टिंग’ झाल्यामुळे शेअरबाजारातील ‘ट्रेडिंग’चे प्रमाणही वाढले. कमी भांडवल असणार्‍या कंपन्यांची किमगिरी २०२१ मध्ये चांगली राहिली. त्यांच्या कामगिरीत ५७ टक्के वाढ झाली. २०२० या वर्षी ही वाढ ३२ टक्के इतकी होती. म्हणजे २०२१ मध्ये २५ टक्के वाढ झाली. हैद्राबाद येथील ‘ब्राईट कॉम’ या कंपनीने २०२१ मध्ये गुंतवणूकदारांना २७६७ टक्के परतावा दिला. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र’ या कंपनीने २२८० टक्के, ‘जीआरएम ओव्हरसिज’ या कंपनीने १२१९ टक्के, ‘ओरम प्रायव्हेट’ या कंपनीने ८४१ टक्के, तर ‘रतन इंडिया एन्टरप्रायझेस’ या कंपनीने ७१९ टक्के असे भरघोस परतावे दिले. ‘सारेगम’ आणि ‘टिप्स इंडस्ट्रीज’ या दोन कंपन्यांनी प्रत्येकी ४९६ टक्के व ४०१ टक्के परतावा दिला. २०२० पर्यंत या कंपन्या ‘म्युझिक कॅसेट’ उत्पादित करीत. पण तांत्रिक प्रगतीमुळे ‘कॅसेट’ कालबाह्य झाल्यामुळे आता या कंपन्या ‘डिजिटल रेडिओ’ व सिनेमा यांची निर्मिती करतात. ‘इंडियन रेल्वेज केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) या कंपनीचे शेअरबाजारी मूल्य ३१ डिसेंबर २०२० रोजी २८८ रुपये होते ते वाढून १८ ऑक्टोबर २०२१ रोजी १,१७६ रुपये झाले. या शेअरने गुंतवणूकदारांना ३०८ टक्के परतावा दिला. हीच शेअरबाजारची जादू आहे, जी गुंतवणूकदारांना आकर्षित करते.

बँकांची शेअर बाजारातील कामगिरी
स्टेट बँकेच्या शेअरच्या बाजारीमूल्यात २०२१ मध्ये ७० टक्के वाढ झाली. इंडियन ओव्हरसिज बँकेच्या (आयओबी) शेअरच्या बाजारीमूल्यात ९३ टक्के वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँकांच्या शेअर्सनीही चांगली कामगिरी केली. ‘न्यू जनरेशन’ खाजगी क्षेत्रातील ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या शेअरला मात्र मागणी कमी होती. या बँकेच्या शेअरच्या बाजारीमूल्यात फक्त ३६ टक्के वाढ झाली. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांच्या भागधारकांना २०२१ मध्ये चांगला परतावा मिळू शकला नाही. २०२० मध्ये या बँकांची कामगिरी चांगली होती.

निफ्टी सार्वजनिक उद्योगातील बँका (पीएसयू), बँक इंडेक्समध्ये सार्वजनिक उद्योगातील १२ बँका व जम्मू आणि काश्मीर बँक लिस्ट आहेत. २०२१ मध्ये या ‘इंडेक्स’ने ४७ टक्के परतावा दिला.

बँकांशिवाय बांधकाम उद्योगातील कंपन्यांची कामगिरीही शेअरबाजारात चांगली होती. निफ्टी रिअल्टी इंडेक्सने गुंतवणूकदारांना ५२ टक्के परतावा दिला. निफ्टी मेटल इंडेक्सने गुंतवणूकदारांना ६८ टक्के परतावा दिला. ‘जास्त जोखीम, जास्त परतावा’ हे जरी शेअरबाजारचे ब्रीदवाक्य असले तरी ते नेहमीच यशस्वी होईल असे नाही. जास्त जोखमीने नुकसान झाल्याची उदाहरणे भरपूर आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांची अशी मनोवृत्ती असते की, ते सुरुवातीला गुंतवणूक करण्याचे धाडस करीत नाहीत. सुरुवातीस गुंतवणूक करण्यास कचरतात, पण शेअरबाजार वर जात असेल तर गुंतवणूक करतात. एका अर्थी अशी सावधानता बाळगणे बरोबर आहे. डिसेंबर २०१९ पासून डिसेंबर २०२० या कालावधीत ‘डिमॅट’ खाती २६ टक्क्यांनी वाढली. डिसेंबर २०१९ मध्ये असलेली ३९.४ दशलक्ष खाती वाढून डिसेंबर २०२० मध्ये ४९.८ दशलक्ष खाती झाली. डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ‘डिमॅट’ खात्यांमध्ये ४८ टक्के वाढ होऊन खात्यांचे प्रमाण ७३.८ दशलक्ष इतके झाले. फक्त फेब्रुवारी २०२१ मध्ये १.७ दशलक्ष नवी डिमॅट खाती उघडली गेली. ऑक्टोबरपर्यंत साडेतीन दशलक्ष खाती उघडली गेली. आता एखाद्या भागधारकाला फायदा करून घेण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव जर शेअर विकायचे असतील तर त्याचे ‘डिमॅट’ खाते असणे बंधनकारक आहे. ऑक्टोबरमध्ये शेअरबाजारने कमाल पातळी गाठली होती. शेअरबाजार वर आला की किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरबाजारात गुंतवणूक वाढते. ज्या गुंतवणूकदारांनी २०२१ मध्ये शेअरबाजार कमाल पातवळीवर असताना गुंतवणूक केली त्यांना आता नुकसानीचा फटका बसत आहे. पण जे अगोदरपासून शेअरबाजारात होते त्यांनी शेअरबाजार कमाल मर्यादेवर होता तेव्हा जर विक्री केली असेल तर नफा मिळवला असेल.

गुंतवणुकीच्या बाबतीत एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका, हे तत्त्व कधीही विसरू नका. संपूर्ण गुंतवणूक शेअरबाजारात करू नका. गुंतवणुकीसाठी इतर पर्यायही निवडा. जास्त परताव्याच्या आमिषाने तोंडघशी पडू नका. मुंबई शेअरबाजारचे ‘प्राईस-टू-अर्निंग्ज’ रेशोचे प्रमाण सध्या २६.७२ टक्के आहे. २०२० अखेरीच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी आहे. २०२० मध्ये मुंबई शेअरबाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे २३ अब्ज यूएस डॉलर्स गुंतवणूक केली होती. कारण २०२० मध्ये पाश्‍चिमात्त्य देशांत गुंतवणुकीवर कमी दराने व्याज मिळत होते. भारतात गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवावा या उद्देशाने परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढले होते. २०२१ मध्ये कोरोनाने जगातल्या सर्व अर्थव्यवस्था उलट्यापालट्या करून टाकल्या. भारत आता कोरोनातून सावरत आहे. ‘ओमिक्रॉन’ची पीडा मात्र भारताला न लागो, ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. २०२१ मध्ये शेअरबाजारात साडेचार अब्ज यूएस डॉलर इतकीच परदेशी गुंतवणूक झाली.

ऑक्टोबरमध्ये जेव्हा शेअरबाजारने कमाल उसळी घेतली होती तेव्हा व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेअरबाजारात असलेली परदेशी गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यात आली. त्यामुळे १८ ऑक्टोबर रोजी शेअरबाजार निर्देशांकाने जी कमाल पातळी गाठली होती त्यानंतर ७.७ टक्के घट झाली.

फेडरल रिझर्व्ह ऑफ दि युनायटेड स्टेट्‌स व दी अमेरिकन सेंट्रेल बँक यांनी मार्च २०२१ पर्यंत नोटा न छापण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दी बँक ऑफ इंग्लंड’ने यापूर्वीचे व्याजदर वाढविले आहेत. हे असेच सुरू राहिल्यास २०२२ मध्ये भारतीय शेअरबाजारात परदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाण कमी असेल. २०२१ मध्ये प्राथमिक भांडवली बाजारपेठेची (समभाग विक्री) घोडदौड मात्र कायम राहील. कारण बरेच ‘आयपीओ’ २०२२ मध्ये भांडवली बाजारपेठेत धडकणार आहेत. २०२१ मध्ये विक्रीस आलेल्या ‘आयपीओ’पैकी सर्व आयपीओ विक्रीमूल्याहून जास्त रकमेस ‘लिस्ट’ झाले नाहीत. बरेच आयपीओ कमी किमतीस लिस्ट झाले. ‘पेटीएम’चा शेअर तर ‘लिस्टींग’च्या वेळी इतका कोलमडला की त्याचे शेअरबाजारात काही दिवस गंभीर परिणाम जाणवत होते. त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रातील कित्येक जाणकार असा सल्ला देतात की, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सदर शेअर लिस्ट झाल्यावर शेअरबाजारात विकत घ्यावा. कारण त्यावेळी गुंतवणूकदाराला त्या शेअरचे खरे मूल्यांकन समजलेले असते. २०२१ मध्ये शेअरबाजारात देशांतर्गत गुंतवणूकदार जास्त सक्रिय होते. दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झालेल्या मुहूर्तांच्या सौद्याच्या दिवशीही शेअरबाजारात सकारात्मक वातावरण होते.
२०२२ मध्ये जर परदेशी गुंतवणूक रोडावली तर भारतीय गुंतवणूकदार ‘इश्क’ करण्याची ‘रिस्क’ घेतील का? हा कळीचा मुद्दा आहे. आता २०२१ संपलेले आहे. जानेवारी २०२२ संपल्यानंतर लगेच फेब्रुवारीत केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. हे ‘बजेट’ कसे असावे? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागण्या येत आहेत. या अर्थसंकल्पात काय प्रस्तावित असेल यानुसार भारतीय अर्थव्यवस्था तसेच शेअरबाजार आकार घेईल. जर तो नवा जीवाणू-जंतू फार मोठ्या प्रमाणावर आला नाही, कोरोनाही आटोक्यात राहिला व आकस्मिक काही संकट देशावर आलं नाही तर २०२२ हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसह शेअरबाजारालाही चांगले असेल हे निश्‍चित!