१ ऑगस्टपासून राज्यात मच्छीमारीस सुरुवात

0
114

६० दिवसांची बंदी संपणार
६१ दिवसांच्या बंदीनंतर परवा १ ऑगस्टपासून राज्यात मच्छीमारी मोसम सुरू होणार असून त्यासाठीची सगळी यंत्रणा सज्ज झाली असल्याचे मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
गेल्या १ जूनपासून राज्यात मच्छीमारी बंदी लागू झाल्यानंतर राज्यातील सर्व सहाही जेटींना जे सील ठोकण्यात आले होते ते काढण्यासाठीचा आदेश देण्याची विनंती उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे. तसेच मच्छीमारी ट्रॉलर्सना लागणारे डिझेल राज्यातील चार जेटींवरील पेट्रोलपंपांना पुरवणार्‍या तेल कंपन्यांना ते पुरवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
गोव्यातील मच्छीमारी ट्रॉलर्सवर काम करणारे केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यातील मच्छीमार उद्यापर्यंत गोव्यात परतणार असल्याचे मांडवी फिशिंग सोसायटीतील सूत्रांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
राज्यात ११६७ मच्छीमारी ट्रॉलर्सची नोंदणी झालेली आहे. मात्र, प्रत्यक्षात ८५० ट्रॉलर्सच मच्छीमारी करीत असल्याचे डॉ. शामिला मोंतेरो यांनी सांगितले. या ट्रॉलर्सवर हजारो मच्छीमार काम करीत असून जास्तीत जास्त हे परप्रांतीयच असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व मच्छीमारांना यापूर्वीच ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत.