१९ तासांनंतर चार वर्षांचा मुलगा सुखरूप बाहेर

0
311

>> महाड इमारत दुर्घटनेत ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे सोमवारी कोसळलेल्या पाच मजली इमारतीच्या ढिगार्‍यांखालून एका चार वर्षांच्या मुलाला तब्बल १९ तासांनंतर काल सुखरुप बाहेर काढण्यात आले. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय त्यामुळे उपस्थितांना आला. या मुलाला किरकोळ जखमा झाल्या असून त्याला एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढताच उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या घोषणा देत एकच जयघोष केला.

महाडमधील तारिक मंजिल ही पाच मजली इमारत सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. त्यानंतर युद्धपातळीवर मदतकार्य सुरू होते. अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीला काल एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी घेतलेल्या शोधाअंती इमारतीच्या ढिगार्‍याखाली चार वर्षांचा मुलगा जिवंत असल्याचे आढळून आले. अथक प्रयत्नांती महंमद नामक या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच या मुलाने उपस्थितांकडे हर्षभरित नजर टाकली, तेव्हा बघ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे जोरदार स्वागत केेले व गणपतीबाप्पा मोरयाचा गजर केला. त्याला बाहेर काढणार्‍या जवानांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.

महंमद बंगी असे या मुलाचे नाव असून त्याला बाहेर काढल्यानंतर लागलीच स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला विशेष जखमा झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

या पाच मजली इमारतीमध्ये ४५ सदनिका होत्या. एनडीआरएफची तीन पथके ढिगारा उपसण्याच्या कामाला लागली आहेत. अग्निशामक दलाची बारा पथकेही त्यांच्या मदतीला तैनात आहेत.

अनेक मृतदेह या ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले असून मदतकार्य सुरूच आहे. इमारतीचा बांधकाम कंत्राटदार व स्थापत्त्यविशारद यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
इमारतीचा सर्व ढिगारा उपसायला अजून अनेक तास लागतील अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

दरम्यान, सदर दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीआरएफच्या आपण संपर्कात असून स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली आहे. राज्याचे दोन मंत्री आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे यांनीही काल दुर्घटनास्थळाला भेट दिली.