गोव्याला कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीच्या १८ हजार डोसांचा दुसरा साठा काल मिळाला आहे. राज्यात कोरोना लसीकरणाची दुसरी फेरी शुक्रवार २२ व शनिवार २३ जानेवारीला घेतली जाणार आहे.
दाबोळी विमानतळावर आरोग्य विभागाकडे लसीच्या डोसांचा दुसरा साठा सुपूर्द करण्यात आला आहे. गेल्या १३ जानेवारीला लशींच्या २३ हजार ५०० डोसांचा पहिला साठा प्राप्त झाला होता.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीत ४२६ आरोग्य कर्मचार्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. राज्य सरकारने ७०० आरोग्य कर्मचार्यांना कोरोना लस देण्याची तयारी केली होती. पहिल्या फेरीत सुमारे ४० टक्के आरोग्य कर्मचार्यांनी कोरोना लस घेतलेली नाही.
कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात २२ रोजी आरोग्य खात्याने निश्चित केलेल्या सरकारी व खासगी इस्पितळातून लसीकरण केले जाणार आहे. या फेरीत लसीकरणासाठी निवड करण्यात येणार्या आरोग्य कर्मचार्यांना एसएमएस संदेशाद्वारे माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.
भूतान आणि मालदीवला
भारताकडून लस पुरवठा
भारत सरकारकडून सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर भारतात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आता भारताने भूतान आणि मालदीव या आपल्या शेजारी देशांना भेट स्वरुपात कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा केला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भतानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लशीचे १.५ लाख डोस पाठवले आहेत. तर मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे.