१५ कोटी रुपये खर्चू फोंड्यात वस्तुसंग्रहालय

0
18

>> केंद्र सरकारकडून निधी मंजूर

फोंडा तालुक्यात अनुसूचित जमातींचे वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी केंद्र सरकारने १५ कोटी रुपयांची निधी मंजूर केला आहे. हा निधी केंद्रीय अनुसूचित जमाती व्यवहार मंत्रालयाकडून मिळणार आहे.

देशभरात अनुसूचित जमातींची अशा प्रकारची १० वस्तुसंग्रहालये उभारण्यासाठी केंद्रीय अनुसूचित जमाती व्यवहार मंत्रालयाकडून निधी मिळणार आहे. गोव्याबरोबरच गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा, मणिपूर व मिझोराम या राज्यात ही वस्तुसंग्रहालये उभारण्यात येणार आहेत.

ज्या ज्या ठिकाणी विदेशी राजवटींविरुद्ध आदिवासींनी उठाव केला होता, त्या त्या ठिकाणी ही वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहेत. आदिवासी समाजातील धाडसी व शूर अशा स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी केलेला त्याग व दिलेले बलिदान याची दखल म्हणून ही वस्तुसंग्रहालये उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही वस्तुसंग्रहालये पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत. ही संग्रहालये निसगसौंदर्याने नटलेल्या स्थळी उभारण्यात येणार असून, त्यांची वास्तूरचनाही सुरेख व आगळीवेगळी अशी असणार आहे. तसेच आदिवासींची संस्कृती, कला व हस्तकला याचे दर्शनही या वस्तुसंग्रहालयातून होणार आहे.