१५० ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच

0
15

>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा दावा; विधानसभा निवडणुकीत पराभूत काही आमदारांचे दमदार राजकीय पुनरागमन

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच पदांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली. बहुतांश पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली, तर काही ठिकाणी दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ताधारी भाजपच्या समर्थकांची सरपंच व उपसरपंचपदी वर्णी लागली आहे. तसेच मगो आणि कॉंग्रेसच्या समर्थकांनी काही पंचायतींतील दोन्ही पदे प्राप्त केली. दरम्यान, भाजपने जवळपास १५० ग्रामपंचायतींवर सरपंच, उपसरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे, असा दावा काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. दुसर्‍या बाजूला कॉंग्रेसने मात्र कोणताही दावा न करता मौन राखणेच पसंत केले.

ग्रामपंचायत निवडणुकांचा १२ ऑगस्टला निकाल जाहीर झाल्यानंतर काल सरपंच आणि उपसरपंच पदांसाठी निवडणूक झाली. सर्व पंचायतींकरिता निवडणूक अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. गोवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला दबदबा राखत पुनरागमन केले. त्यांच्या समर्थक पंच सदस्यांची दोन्ही पदांवर वर्णी लागली.
मांद्रे मतदारसंघात भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या समर्थकांनी अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले, तर विद्यमान आमदार जीत आरोलकर यांना दणका बसला. केपे मतदारसंघात भाजपचे उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या समर्थकांनी पाच ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले, तेथे कॉंग्रेसचे आमदार ऍल्टन डिकॉस्टा यांना दणका बसला.
सांत आंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींवर सरपंच बसवण्यात यश मिळवले, तर आरजीचे विद्यमान आमदार वीरेश बोरकर यांना अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले. नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी आपल्या मतदारसंघातील पंचायतींसह सत्तरी तालुक्यातील सर्व पंचायतींवर वर्चस्व कायम राखले. फोंडा मतदारसंघातील कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीवर मगोचे नेते केतन भाटीकर यांच्या समर्थकांनी वर्चस्व राखले. कृषी मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या समर्थकांना वर्चस्व मिळविण्यात अपयश आले. मगोचे नेते तथा वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या समर्थकांनी मडकई मतदारसंघातील पंचायतींवर वर्चस्व मिळविलेे. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या समर्थकांनी शिरोडा मतदारसंघातील पंचायतींवर आपला सरपंच बसवण्यात यश मिळवले.
सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई, काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. मंत्री गोविंद गावडे यांनी चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनीही आपल्या मतदारसंघातील पंचायती ताब्यात ठेवल्या.

काणकोणातील ६ पंचायतींचे
सरपंच, उपसरपंच बिनविरोध

काणकोण तालुक्यातील ७ पंचायतींपैकी गावडोंगरी पंचायत वगळता बाकीच्या सहाही पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच बिनविरोध निवडून आले असून, सर्व पंचायतींवर भाजप पुरस्कृत मंडळांनी बाजी मारली. या तालुक्यातील सर्वांच्या नजरा असलेल्या पैंगीण पंचायतींवर सभापतींच्या पत्नी सविता तवडकर यांची, तर सुनील पैंगीणकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. गावडोंगरी पंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात धिलोन देसाई हे ९ पैकी ५ मते मिळवून सरपंचपदी, तर उपसरपंचपदी सलोनी गावकर निवडून आल्या.

निधीचा योग्य वापर करा : मुख्यमंत्री
पंचायती ह्या ग्रामीण विकासाची प्रमुख केंद्रे आहेत. त्यामुळे विकासाची दिशा ठरवताना योग्य नियोजनाची गरज आहे. सरकारकडून मिळणार्‍या निधीचा वापर करताना तो वाया जाणार नाही आणि परत माघारी पाठवला जाणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अकारण पैशांचा चुराडा करून चुकीचे प्रकल्प राबवण्यास आपला विरोध असेल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व सरपंच, उपसरपंच व पंच सदस्यांना केले.

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व
डिचोली तालुक्यातील सर्व १७ पंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. साखळी मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा पंचायतींवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले वर्चस्व राखले. मये मतदारसंघातील सातही पंचायतीत आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर डिचोली मतदारसंघातील पाच पैकी चार पंचायतींवर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी झेंडा रोवला.

मायकल लोबोंचे पुत्र उपसरपंचपदी
कॉंग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी कळंगुट वगळता इतर ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. आमदार डिलायला लोबो यांनी मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा पंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. मायकल लोबो आणि डिलायला लोबो यांचा पुत्र डॅनियल लोबो यांची पर्रा पंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली.

राज्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व पंचायतींचे सरपंच आपली जबाबदारी निष्ठेने आणि काळजीपूर्वक पार पाडतील, अशी अपेक्षा आहे. तळागाळातील लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारे सरपंच, उपसरपंच गावांना स्वयंपूर्णतेकडे नेतील. त्यांच्या प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून पंचायती या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेच्या सुवाहक बनतील, असा आपणास विश्‍वास आहे.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

सांगेत फळदेसाईंनी, तर सावर्डेत
गणेश गावकर यांनी वर्चस्व राखले
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे मतदारसंघातील सातही पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवला. तसेच भाजपचे आमदार गणेश गावकर यांनीही सावर्डे मतदारसंघातील सातही पंचायती ताब्यात घेतल्या.

पेडण्यातील १७ पैकी १४ पंचायतींवर भाजप समर्थक सरपंच
पेडणे तालुक्यातील एकूण १७ पैकी १५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड बिनविरोध झाली, तर १७ पैकी १७ पंचायतींच्या उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली. त्यात भाजपने १४ पंचायतींवर आपले वर्चस्व कायम ठेवले. पार्से आणि धारगळ या दोन पंचायतींच्या सरपंच व उपरपंचसाठी पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मांद्रे मतदारसंघातील एकूण ८ पैकी ५ पंचायतींवर भाजप नेते दयानंद सोपटे यांनी, तर तीन पंचायतींवर मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी वर्चस्व राखले. पेडणे मतदारसंघातील ९ पंचायती भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या ताब्यात आल्या.

दोन माजी आमदारांच्या
पत्नी सरपंच, उपसरपंचपदी

बाणावली मतदारसंघातील ९ पैकी ७ पंचायतींवर सरपंच व उपसरपंच बिनविरोध निवडून आले. माजी आमदार बाबाशान डिसा यांच्या पत्नी फ्रेडा डिसा या नुवे पंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. तसेच बेताळभाटी पंचायतीच्या उपसरपंचपदी माजी आमदार मिकी पाशेको यांच्या पत्नी व्हियोला पाशेको यांनी विराजमान झाल्या.

७२ वर्षांच्या आजीबाई
सरपंचपदी विराजमान
सावर्डे मतदारसंघातील किर्लपाल-दाभाळ पंचायतीच्या सरपंचपदी ७२ वर्षीय रुक्मिणी गावकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंचपदी कालिदास गावकर यांची निवड झाली. रुक्मिणी गावकर यांनी पंचायत निवडणुकीतही विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. त्यांना ७५० पैकी ५५० मते मिळाली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

सत्तरीतील बाराही पंचायतींवर विश्‍वजीत राणेंचे समर्थक सरपंच
सत्तरीतील बाराही पंचायतींवर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. होंडा वगळता उर्वरित अकरा पंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. पिसुर्ले, भिरोंडा, खोतोडा, नगरगाव, ठाणे, सावर्डे, गुळेली, मोर्ले, पर्ये, म्हाउस व केरी या पंचायतींवर सरपंच, उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. गुळेली पंचायतीवर सुध्दा राणे समर्थकांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे आयआयटी विरोधाचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. होंडा पंचायतीचे सरपंच, उपसरपंच आठ विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले.

कुंकळ्ळीत कॉंग्रेसचा वरचष्मा
सासष्टीमध्ये कॉँग्रेसच्या समर्थकांना ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यात यश आले. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतींवर आपले समर्थक पंच दोन्ही पदांवर निवडून आणले. बाळ्ळी आणि सां जुझे द आरियल पंचायत देखील कॉंग्रेसकडेच आली. नावेली मतदारसंघातील दोन पंचायतील कॉंग्रेस समर्थक पंचांची दोन्ही पदांवर वर्णी लागली, तर उर्वरित तीन पंचायती भाजपने आपल्या ताब्यात घेतल्या.

दाबोळीतील दोन्ही पंचायती भाजपकडे
दाबोळी मतदारसंघातील चिखली, चिकोळणा-बोगमाळो या पंचायतींवर मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपले समर्थक पंच दोन्ही पदांवर विराजमान केले. तसेच अपक्ष आमदार आंतोन वाझ यांनीही कुठ्ठाळी मतदारसंघातील कुठ्ठाळी व केळशी या दोन पंचायतींवर वर्चस्व राखले. केळशी, वेळसाव-पाली या पंचायती गोंयचो एकवोटच्या ओलांन्सिओ सिमोईश गटाकडे राहिल्या.

थिवी, हळदोणेत भाजपची सत्ता
थिवी मतदारसंघातील ८ पैकी ७ पंचायतींमध्ये मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपले सरपंच, उपसरपंच निवडून आणले. पिर्ण पंचायतीत सदानंद शेट तानावडे यांचे बंधू संदीप शेट तानावडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. हळदोणेत ६ पैकी २ पंचायतींवर कॉंग्रेसचे आमदार कार्लूस फेरेरा यांनी आपले सरपंच, उपसरपंच निवडून आणले, तर उर्वरित ४ पंचायतींत भाजपने सत्ता मिळवली.

केपेतील पाच पंचायती भाजपकडे,
दोन पंचायती कॉंग्रेसच्या ताब्यात

केपे मतदारसंघातील सात पंचायतींपैकी तीन पंचायतींवर कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या समर्थकांनी वर्चस्व राखले, तर उर्वरित चार पंचायतींवर भाजपचे माजी आमदार बाबू कवळेकर यांचे समर्थक सरपंच व उपसरपंच पदावर विराजमान झाले.

सत्तरीतील बाराही पंचायतींवर विश्‍वजीत राणेंचे समर्थक सरपंच
सत्तरीतील बाराही पंचायतींवर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. होंडा वगळता उर्वरित अकरा पंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. पिसुर्ले, भिरोंडा, खोतोडा, नगरगाव, ठाणे, सावर्डे, गुळेली, मोर्ले, पर्ये, म्हाउस व केरी या पंचायतींवर सरपंच, उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. गुळेली पंचायतीवर सुध्दा राणे समर्थकांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे आयआयटी विरोधाचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. होंडा पंचायतीचे सरपंच, उपसरपंच आठ विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले.