१३ बळींसह ४१३ नवे कोरोनाबाधित

0
106

>> राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४.७३%

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे ४१३ रुग्ण आढळून आले असून आणखी १३ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. नवे कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२.५२ टक्क्यांवर वर आले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ५ हजार ६०५ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २८९१ झाली आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. जून महिन्यात कोरोना बळींच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोना रुग्णांच्या मृत्यूसत्रावर अद्यापही नियंत्रण आलेले नाही. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ७ रुग्णांचा आणि दक्षिण गोवा इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गोव्यातील दोन खासगी इस्पितळांत २ रुग्ण आणि उत्तर गोव्यातील दोन खासगी इस्पितळांत २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. खासगी इस्पितळात मृत्यू झालेल्या आणखी एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची उशिराने नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या बळींची एकूण संख्या दोन हजार नऊशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

नवे ४१३ रुग्ण
राज्यात चोवीस तासांत नवे ४१३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ३२९८ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील १२.५२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून ८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार १५३ एवढी झाली आहे.

फोंडा येथे सर्वाधिक ५३५ तर मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३८५ एवढी झाली आहे. पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २७९ आणि चिंबलमधील रूग्णसंख्या २६२ एवढी आहे. कांदोळी येथे १८८ रुग्ण, कुठ्ठाळी येथे २१८ रुग्ण, कासावली येथे १८५ रुग्ण, पर्वरी येथे २१० रुग्ण, पेडणे येथे २०१ रुग्ण, साखळी २१९ रुग्ण, कुडचडे येथे १८६ रुग्ण आहेत.

५८५ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी ५८५ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ६५७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्के एवढे आहे.

२४ तासांत ६७ जण इस्पितळांत
गेल्या चोवीस तासांत नव्या ६७ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येचेही प्रमाण बरेच कमी झाले आहे.