॥ श्रीगणेशाय नमः ॥

0
34
  • – डॉ. सोमनाथ कोमरपंत

आजच्या गतिमान युगातील लोकशाहीच्या मार्गाने वाटचाल करणार्‍या भारतात एकात्मतेच्या अंतःसूत्राने बांधण्यासाठी, सर्वसमावेशकतेचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेचा मार्ग हा प्रेयसाबरोबरच श्रेयसाकडे नेणारा आहे. तो गणनायक आहे. ऋतंभरा प्रज्ञा आणि नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा यांचे संगमतीर्थ असलेले श्रीगणेश हे आदिपीठ आहे. त्याची उपासना ही प्राचीन काळापासून चालत असलेल्या भारतातील ज्ञानपरंपरेची उपासना आहे.

श्रीगणेश हे आपल्या भारतीय जनमानसातील सर्वमान्य असे आदिदैवत आहे. श्रीगणेश हे दैवत अनेक नावांनी संबोधले जाते. ‘ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये’ अशी लोकोक्ती आहे. त्याचप्रमाणे ‘श्रीगणेशा’ची उपपत्ती सांगणे हे महाकठीण. वेदकालापासून आजमितीच्या इतिहासाचा मागोवा प्रकांड पंडितांनी, श्रेष्ठ प्रज्ञावंतांनी आणि प्रतिभावंतांनी प्रयत्नपूर्वक घेतला आहे. थोडासा वेगळा संदर्भ असलेले ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति|’ हे सुवचन असो वा ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना| कुण्डे कुण्डे नवं पयम्‌॥ जातौ जातौ नवाचारः| नवा वाणी मुखे मुखे॥ हे सुभाषित असो, एकमताने महासत्याचादेखील स्वीकार करणे ही अशक्यप्राय बाब आहे. मग श्रीगणेशासारख्या विघ्नविनाशक, अभ्युदयकर्त्या आणि सर्वशक्तिमान आदिदैवताविषयी संस्कृतिसंगमाचे आदिपीठ असलेल्या भारतवर्षात एकच मत स्वीकारले जाणे कसे शक्य आहे?
प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ, प्रज्ञावंत विदुषी डॉ. इरावती कर्वे यांनी त्रिविध पद्धतींनी संस्कृतीची व्याख्या केली आहे. त्यांतील दोन आकलनसुलभ व्याख्या आपण घेऊया. एका व्याख्येत त्या म्हणतात, ‘मनुष्यमात्राने आदिकालापासून सांप्रत कालापर्यंत केलेल्या धडपडीची गोळाबेरीज म्हणजे संस्कृती.’ दुसर्‍या व्याख्येत त्या म्हणतात, ‘प्रगमनशील-प्रयत्नवादी अशा मानवप्राण्याचे पृथ्वीवरील उन्नत जीवनाचे चित्र म्हणजे संस्कृती.’’ या दोन्ही व्याख्यांचा समवाय केला तर संस्कृतीच्या प्रक्रियेत संघर्ष- संगनमत- समन्वय- संगम या चार अवस्था संभवतात.

काही विद्वानांनी वेदपूर्वकालापासून श्रीगणेश हे दैवत मानले जात होते असे मत मांडले आहे. काही विद्वानांनी आर्य लोक भारतात वेगवेगळ्या मार्गांनी आले. त्यांच्याकडे अत्यंत सक्षम आणि बलिष्ठ अशी गणव्यवस्था होती. या आर्यगणांबरोबर गणपती होते आणि त्या सर्वांचा आदिनायक महागणपती होता. सहस्रावधी वर्षांच्या वाटचालीत सर्व विघ्ने समर्थपणे निवारण करणारा हा भीमपराक्रमी गणपती अनेक कुलचिन्हे अंगाखांद्यावर धारण करून आर्यविजयाची ध्वजा उत्तुंग, नील नभात फडकावीत आसेतुहिमाचल अप्रतिहतपणे गर्जत निघाला होता.
द्रविडांनी दक्षिण भारतात आसरा घेतला होता, त्यावेळी त्यांच्यात शिव होताच. शिवपुत्र सुब्रह्मण्यम् होता. पण अगस्ती ऋषीच्या दक्षिणेत झालेल्या आगमनानंतर आर्यांनी शिवालाही स्वीकारले होते. विघ्नहर्ता गणेश पार्वतीकुमार शिवनंदन बनून द्रविड संस्कृतीत जाऊन विराजमान झाला होता. आग्नेय आशियापर्यंत विस्तारलेल्या विशाल भारतातील जनतेने त्याला आपला मानलेला होता.
कुषाणकालीन शिलापट्टावर गजमुख यक्षाचे चित्रण करण्यात आलेले आहे. या गजमुख यक्षातून पुढील कालखंडात गणपतीचे स्वरूप परिणत झाले असे डॉ. कुमार स्वामी आणि डॉ. वासुदेवशरण अग्रवाल या विद्वानांचे मत आहे.

संक्षेपाने सांगायचे झाल्यास श्रीगणेशाच्या सामर्थ्याचा, सौष्ठवाचा आणि या सुखकर्त्याचा गुणगौरव आपल्या राष्ट्रात परंपरेने निरंतर होत गेलेला आहे. आजच्या गतिमान काळात- आस्तिक असो, नास्तिक असो अथवा अज्ञेयवादी असो- सार्‍यांचीच श्रीगणेशाची विलोभनीय रूपकळा पाहून चित्तवृत्ती पुलकित होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या धामधुमीच्या पर्वात जनमानसाचा कानोसा घेऊन समाजातील ऐक्यभावना वाढीस लागावी, राष्ट्रजागृती व्हावी आणि सार्‍यांचेच हात राष्ट्रकारणासाठी लागावेत म्हणून लोकमान्यांनी ‘श्रीगणेश’ या उपास्यदैवताची निवड केली. त्यांनी गणेशोत्सवाला १८९३ सालापासून सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप दिले. गणेशपूजनाची प्रथा आत्मोन्नतीपुरती सीमित होती. लोकमान्यांनी व्यक्तीचे हे केंद्र समष्टीपर्यंत नेऊन भिडविले. तेवढ्यापर्यंत त्यांचे हे कार्य मर्यादित राहिले नाही. तत्कालीन महाराष्ट्राच्या पुरुषार्थाला प्रेरणा देणार्‍या आणि सार्‍या भारतवर्षाचा माथा