॥ मनःशांती उपनिषदातून ॥ यती की ययाती?

0
314
  • प्रा. रमेश सप्रे

कित्येक शतकांपूर्वीची ही चर्चा आजच्या काळाशीही पूर्ण सुसंगत आहे. आज तर इंद्रियांच्या भोगविलासांचं प्रमाण एवढं वाढलंय की विवेकशक्ती असलेला माणूसही जनावरांसारखं जीवन जगतोय. पैसा हे परब्रह्म झाल्यामुळे त्यासाठी अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या, साठवण्याच्या मागे सारी मानवजात लागलीय.

कठोपनिषदातील अत्यंत बोधप्रद अशा यम- नचिकेता यांच्यातील संवादावर आपण आजच्या जीवनाच्या संदर्भात सहचिंतन करत आहोत. ज्या लोकांनी समाजाभिमुख राहून समाजसेवा करत स्वतःच्या मुक्तीचा मार्ग सोपा केला, त्या लोकांचं हे अत्यंत आवडतं उपनिषद आहे.

नचिकेताला मृत्यूचं रहस्य साक्षात् यमाकडून हवं होतं. नचिकेत्याच्या बुद्धिमत्तेबद्दल नि जिज्ञासेबद्दल यमदेवांची खात्री पटली होती. तरीही नचिकेताचं ‘पात्र’ हे मृत्यूविषयीचं रहस्य स्वीकारायला पात्र आहे का हेही त्यांना पाहायचं होतं. म्हणून त्यांनी कुणालाही मोहात पाडील अशी सांसारिक प्रलोभनं नचिकेताला दाखवली. यालाही नचिकेतानं स्पष्ट नकार देऊन, मृत्यूचं रहस्य जाणून घेण्याचाच आग्रह धरला. हे पाहून यमदेव प्रसन्न होऊन म्हणतात- ‘‘हे नचिकेता, तू अतिशय बुद्धिमान, विवेकी नि वैराग्यसंपन्न आहेस. स्वतःला महाबुद्धिमान मानणारे मोठमोठे ज्ञानी, तपस्वी, योगीसुद्धा संपत्ती आणि देहोपभोगांच्या जाळ्यात अडकतात. तुला यापैकी कश्शाचाही मोह नाही म्हणून तू परमात्मतत्त्व, मृत्यूरहस्य श्रवण आणि ग्रहण करण्याासाठी उत्तम अधिकारी आहेस’’. मोठ्या प्रसन्नतेनं यमधर्मांनी सांगायला सुरुवात केली –

दूरमेते विपरीते विषूची
अविद्या या च विद्येति ज्ञाता |
विद्याभीप्सिनं नचिकेतसं मन्ये
न त्वा कामा बहवोऽ लोलुपंत ॥

विद्या आणि अविद्या या दोन परस्परविरुद्ध गोष्टी आहेत. त्याचे परिणामही (विषूची) भिन्न असतात. नचिकेता, तुला मी (यमराज) विद्येचा अभिलाषी मानतो. मनातूनही तुला अविद्येचा स्पर्शही नको आहे. सर्व (अनेकानेक) भोगात तू लोलूप होत नाहीस. (न त्वा कामा बहवः अलोलुपन्त|) तुला भोग, भोग्यवस्तू आकर्षित करू शकत नाहीत.
यानंतर यमराज सांगतात ते आजही अत्यंत महत्त्वाचं आहे.
ते म्हणतात –
अविद्यायां अंतरे वर्तमानाः
स्वयं धीरा पंडितं मन्यमानाः|
दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा
अंधेनैव नीयमाना यथांधाः॥

म्हणजे – अविद्येच्या आत राहूनही स्वतःला बुद्धिमान समजणारे मूर्ख लोक (पढतमूर्ख) निरनिराळ्या योनींमध्ये भटकत राहून (दन्द्रम्यमाणाः) जीवनात ठेचकाळत राहतात, जसे अंध व्यक्तीच्या मागून जाणारे आंधळे. यांना वाटेवर असंख्य कष्टक्लेश सहन करावे लागतात.
इथं मुख्य मुद्दा आहे नेतृत्वाचा. अनुयायी (मागून जाणारे) खूप मिळतात. पण नेतेच जर आंधळे असतील तर त्यांच्यापासून जीवनमुक्तीची अपेक्षा बाळगणं चुकीचं नाही का?
‘अंधेनैव नीयमाना यथांधाः’ हा आपल्याला सर्व क्षेत्रात येणारा अनुभव आहे. शिक्षणक्षेत्र, व्यवसायक्षेत्र, क्रीडा- कलाक्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव असलेल्या लोकांकडे नेतृत्व क्वचितच असतं. अपात्र, अयोग्य मंडळी इतरांना मार्गदर्शन करत असलेल्या दिसून येतात. काही लोक म्हणतात, –
‘कलियुगात हे असंच घडायचं. पण यात हतबल निराशावाद दिसून येतो. आंधळाच आंधळ्यांचं नेतृत्व करतो- असं का घडतं? हे टाळणं शक्य आहे का? याविषयी कठ-उपनिषदाचे ऋषी सांगतात –

न सांपरायः, प्रतिभाति बालम्
प्रमाद्यन्त वित्तमोहेन मूढम् |
अयं लोको नास्ति पर इति मानी
पुनः पुनः वशमापद्यते मे ॥

म्हणजे – बालबुद्धीच्या, विवेकहीन माणसाला आत्मज्ञानाचं साधन करणं जमत नाही कारण अशा मंडळींचं लोभी मन संसारातल्या असंख्य वस्तूंमध्ये अडकलेलं असतं. शिवाय या जगापलीकडे दुसर्‍या जगाचं अस्तित्व नाही अशी या ‘बालां’ची (अज्ञानी लोकांची) ठाम श्रद्धा असते. त्यामुळे अशी मंडळी पुन्हा पुन्हा माझ्या (यमाच्या, मृत्यूच्या) स्वाधीन होतात.
इथं हे जग, दुसरं (मृत्यूनंतरचं) जग असा विचार करण्यापेक्षा एक आहे इंद्रियांना जाणवणारं, कळणारं, विश्‍व. इंद्रियातून घेता येणारे सर्व अनुभव. ज्या देहाच्या माध्यमातून असे अनुभव घेतले जातात तो देहच नाशिवंत आहे म्हणून अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं यमराज सुचवताहेत.

कित्येक शतकांपूर्वीची ही चर्चा आजच्या काळाशीही पूर्ण सुसंगत आहे. आज तर इंद्रियांच्या भोगविलासांचं प्रमाण एवढं वाढलंय की विवेकशक्ती असलेला माणूसही जनावरांसारखं जीवन जगतोय. पैसा हे परब्रह्म झाल्यामुळे प्रत्येक वस्तूसाठी नि सेवेसाठी पैसा मोजावा लागतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा- वैद्यकीय तसेच इतर सेवांवर खर्च करावा लागतोय की त्यासाठी अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या, साठवण्याच्या मागे सारी मानवजात लागलीय.
या संदर्भात एक प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे. प्रसंग घडला एका ‘अरुणांसाठी (टीन एजर्स)’ असलेल्या ‘व्यक्तिमत्त्व विकास’ शिबिरात. सत्र होतं – मुक्त शरसंधान (डायव्हर्जंट थिंकिंग).
प्रश्‍न होता – पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून तुम्हाला चंद्राच्या ठिकाणी काय दिसतं? गंमत्या अनय उद्गारला, ‘मला बुवा चंद्र दिसतो.’
कविमनाचा तन्मय म्हणाला, ‘प्रेयसीचा मुखचंद्रमा’ दिसतो.’
रसिकवृत्तीचा चिन्मय म्हणाला, ‘मला डफ दिसतो. पण कसा? – ‘निळ्या महाली नाचत माया, चंद्राचा डफ फडफडला | तुझे नि माझे अपुरे मीलन, जीव तयाने- तडफडला.’
असंच कुणाला कांकण (कंकण) दिसलं तर कुणाला वर्तुळ, कुणाला आपले गणितातले मार्क्सही दिसले. हे सारं हसतखेळत चाललं असताना – गंभीर वृत्तीचा विनय म्हणाला – मला पुनवेच्या चंद्राच्या ठिकाणी भाकरी दिसते, गरीबांना पृथ्वीवर न मिळणारी!
हे ऐकून सारेजण विचारात पडल्यावर अत्यंत व्यावहारिक विचार करणारा सुनय म्हणतो- ‘द होल थिंग- ’ असं म्हणताना त्यानं दोन्ही हातांचं वर्तुळ केलं- ‘इज दॅट की भैय्या सबसे बडा रुपय्या- मला चंद्राच्या ठिकाणी बंदा रुपया दिसतो’.
त्याचं म्हणणं ऐकून सारे विचार करू लागले… अजय सर म्हणाले, ‘सुनय म्हणतो ते अर्धं खरं आहे. ‘सबसे बडा रुपैय्या’ हे बरोबर आहे सध्याच्या जीवनाचा विचार करता. पण रुपया (पैसा) इज नॉट द होल थिंग’… मानवी जीवनाचा एक भाग, एक अंग रुपया व्यापतो – पण खरी कला, क्रीडा- विद्या पैशाच्या पलीकडे असतात. आज सर्व क्षेत्रात पैशाचा जो जयजयकार होतोय ती अत्यंत घातक गोष्ट आहे. मानवी संस्कृती, मूल्यं, माणुसकी यामुळे मागे फेकली गेलीयत. असो.

उपनिषदातले ऋषी, मध्ययुगातले संत (तुकाराम, कबीर इ.) पैशाला तुच्छ मानत नाहीत पण त्याला सर्वोपरी सर्वेसर्वा मानत नाहीत. असं मानणार्‍यांना कठोपनिषदात बालम्, मूढम् असं म्हटलंय.
योगी महेश (श्रीश्रीरविशंकर, ऋषी प्रभाकर, डॉ. दीपक चोप्रा यांचे सद्गुरु) हे एक शब्दप्रयोग वापरायचे. ‘कॉस्मिक सेल्फ (डिव्हाइन सेल्फ)’ याचा अर्थ फार सुंदर आहे. भगवंतानं श्रीमद्भगवद्गीतेत जे विश्‍वरूप दाखवलंय ते ‘पिंडात ब्रह्मांड’ दाखवणारं आहे. देवदेवता, निसर्गातील सर्व शक्ती, वैभव आपल्या आतच असतं. त्याचा आविष्कार नि अनुभव (रिअलायझेशन) मात्र आपण घ्यायला हवा. त्याच्यासाठी हवी उपासना, मुख्यतः अंतरंगीची! संतांचा भरही अशा चिंतनशील जीवनशैलीवर असतो.

आज जे मोल आपण जगाला, भोगांना, देहसुखांना म्हणूनच पैशाला देतो ती आपल्या मनःशांतीच्या आड येणारी मुख्य गोष्ट आहे. विशेष म्हणजे व्यासंग, ज्ञान, विद्वत्ता असलेली मंडळीही या देहभोग – प्रपंच – पैसा या दुष्टचक्रात अडकून फिरत राहतात. तसं पाहिलं तर सुख हे देहापर्यंतच सीमित असतं. इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या मन- बुद्धी- चित्त यांना टिकणारा आनंद हवा असतो. क्षणिक, क्षणभंगूर सुख नको असतं. त्यांना माहीत नसतं असं नाही. तरी ते भोगांच्या, सुखांच्या मोहात पडून आत्मनाश करून घेतात. बुद्धिमान लोकही ‘मी देह आहे’ या कल्पनेचे गुलाम बनतात. अशा ‘पढतमूर्खांना’ पाहून संतांना खूप वाईट वाटतं.

दुर्योधन हा बुद्धिमान होता. पण राज्य, वैभव, उपभोग, सत्ता, सामर्थ्य यालाच सर्वस्व मानल्यामुळे त्याचा नि त्याच्याशी संबंधित लोकांचा त्यानं सर्वनाश ओढवून घेतला. त्याच्याकडे वैभव काही कमी नव्हतं. हस्तिनापूरची सारी संपत्ती त्याच्या मालकीची होती. पण समाधान, संतोष नाही म्हणून मनःशांती नाही अशी त्याची अवस्था होती. याउलट युधिष्ठिर – अपमानाचे अनेक प्रसंग, वनवास, अज्ञातवास असं सारं सहन करूनही त्याची सत्यकथनाची प्रतिज्ञा शाबूत राहिली. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ म्हणजे जो धर्माचं (स्वधर्माचं) पालन करतो त्याचं रक्षण तो धर्मच करतो – हे युधिष्ठिराचं ब्रीदही अखंड राहिलं.

आणखी असंच समांतर उदाहरण म्हणजे ययाती नि त्याचा बंधू ‘यती’ यांचं.
ययाती हा आदर्श राजा पण देहभोगात, विषयसुखात पूर्ण बुडून गेलेला. विषयाची वासना ही कधीही तृप्त होणारी नाही. ययातीकडून देवयानीचा मोठा अपमान झाला कारण त्यानं देवयानीची दासी शर्मिष्ठा हिच्याशी गुप्त विवाह केली. शुक्राचार्यांनी आपल्या कन्येवर – देवयानीवर – झालेल्या या अन्यायासाठी ‘तू याक्षणी जरा, म्हातारा होशील’ असा शाप दिला. पण मुलीच्या आग्रहावरून, ‘तुझं वार्धक्य घेऊन आपलं तारुण्य कुणी दान दिलं तर तू पुन्हा तरुण होशील’, असा उःशाप दिला. शर्मिष्ठेचा पुत्र पुरुखा यानं आपल्या पिताश्रींचं शापित वार्धक्य स्वखुशीनं स्वीकारलं. पुन्हा तारुण्य लाभणं हा ययातीचा जणू पुनर्जन्म होता. अधिक नेटानं तो मदिरा – मदिराक्षी (स्त्री) – नृत्य अशा सर्व देहभोगांचा अतिरेकी उपभोग घेऊ लागला. कितीही भोगलं तरी समाधान, तृप्ती नाही हा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर ययाती जगाला संदेश देता झाला, ‘‘ज्याप्रमाणे अग्नीला हवं असलेलं तेल- तूप (इंधन) कितीही दिलं तरी तृप्तशांत होण्याऐवजी तो अधिक प्रदीप्त होतो. तशीच भोगवासना कधीही तृप्त होत नाही’’. – यतीची जीवनशैली साधी लंगोटी घातली तरी तृप्त समाधानी होती. ‘कौपीनवन्तः खलु भाग्यवंतः’ असं म्हणणारे शंकराचार्य, रामदास, पू. गोंदवलेकर महाराज या मंडळींनी समाजाचा विशाल प्रपंच केला तरी स्वतः ते मात्र कमलपत्रासारखे अलिप्त राहिले. आज सार्‍या जगाला यतिवर्गाची गरज आहे. ययातींची फौज तर सर्वत्र भोग भोगण्यासाठी सज्ज आहेच.

सध्याच्या कोविद्ग्रस्त वातावरणानं हा एकच धडा जर मानवजात शिकली तरी सध्याच्या कोरोना संकटाला ‘इष्टापत्ती’ म्हणता येईल. खूपच किंमत मानवानं सर्वच आघाड्यांवर या काळात चुकवली आहे. मानवजातीचं राहू द्या. .. आपण स्वतः जरी अंशतः ‘यती’ बनलो तरी खूप आहे, बघा विचार करून.