- प्रा. रमेश सप्रे
सुसंस्कृत समाजाचं स्वप्न आहे- ‘वसुधैव कुटुंबकम्’. यात एक तिळ जरी मिळाला तरी तो सात जणांनी वाटून घ्यावा नि एकमेकांची सेवा करावी. यालाच म्हणतात ‘केअरिंग अँड् शेअरिंग’! – असे संस्कार बालवयापासूनच घरी व शाळेत घडवले गेले पाहिजेत.
सृष्टीचा एक नियम आहे- ‘जीवो जीवस्य जीवनम्’ म्हणजे एक जीव हा दुसर्याच्या जगण्याचं साधन आहे. खाद्य आहे. ‘मोठे मासे छोट्या माशांना खातात.’ ‘शक्तिमान प्राणी अरण्यात दुर्बल प्राण्यांना खातात’. हे सगळीकडे, अगदी मानवी समाजातही दिसणारं, अनुभवाला येणारं दृश्य आहे.
म्हणूनच मानवी जीवनात ‘लिव्ह अँड् लेट् लिव्ह’ या सूत्राला महत्त्व आहे.
याचा अर्थ ‘जगा आणि जगू द्या’. म्हणजे स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या.
पण याच सूत्राचा वरच्या पातळीवरचा अर्थ आहे – ‘जगा आणि जगवा’. म्हणजे स्वतः जगा तसं इतरांना – शक्य होईल तितक्या व्यक्ती, प्राणी, वनस्पती यांना जगवा. आपल्यापेक्षा अनेक दृष्टीनं कमी असलेल्यांच्या जगण्यासाठी मदत करा. शक्यतो हाती असलेल्या साधनसामग्रीनं सेवा, त्याग यांच्याद्वारा अधिकाधिक माणसं, प्राणी, वृक्षवेली यांचे प्राण वाचवा, त्यांचं जीवन सुकर करायला साह्य करा. अशी संधी सदैव आपल्या आजूबाजूला असतेच.
एक गोष्ट उघड आहे फक्त माणूसच असा विचार करू शकतो. मुख्य म्हणजे असा विचार करण्याची आवश्यकताही माणसालाच असते. एकाच वेळी अतिशय क्रूर, हिंसक आणि प्रेमळ, दयाळू असलेला प्राणी म्हणजे माणूस. तरीही त्याला वारंवार सांगावं, सुचवावं लागतं की हिंसेचा, विध्वंसाचा मार्ग सोडून अहिंसेचा, करुणेचा, विकासाचा मार्ग स्वीकार.
एखादी बहिणाई याचसाठी कळवळून विचारते – ‘मानसा मानसा, कधी व्हशील मानूस!’ ज्ञानदेवांच्या पसायदानात ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’ असं मागणं याच संदर्भात आहे.
काही प्रसंगचित्र पाहू या आपल्या बायोस्कोपमध्ये.
- एक चित्र त्या शिकार्याचं ज्याचं हृदयपरिवर्तन केलं त्या आपणहून पिलांसह परत आलेल्या हरिणीनं. ‘‘तुझ्या कुटुंबाला जगवण्यासाठी आम्हाला मार आणि आमचं मांस घरी ने.’ या त्या माता हरिणीच्या उद्गारांनी त्यांच्या विचारात म्हणून आचारात क्रांतिकारक परिवर्तन झालं. त्यानं शिकार करणं सोडून दिलं.
- दुसरं चित्र. काहीही गरज नसताना आपली मर्दानगी नि मर्दुमकी दाखवण्यासाठी काही चित्रपटक्षेत्रातील तार्यातारकांनी केलेली हरणांची शिकार. केवळ गंमत म्हणून अशी शिकार करतात त्याला गेम, स्पोर्ट अशी क्रीडासंबंधित नावं दिली जातात. हा प्रकार तर प्रत्यक्ष शिकारीहून वाईट आहे. यातून जी वृत्ति-प्रवृत्ती निर्माण होते तिचं हिडीस दर्शन असे क्रूर प्रकार करणार्यांच्या बनियन किंवा शर्टवर लिहिलेले शब्द – ‘बीइंग ह्यूमन’ म्हणजे माणूस बनू या – माणुसकी असलेले.
- आठवीचा वर्ग. हुशार पण दंगेबाज मुलांचा. त्या वर्गाचा विशेष उपक्रम होता. निसर्गसंतुलन राखण्याची जागृती निर्माण करण्यासाठी मुलं, वडील मंडळी, समाजातील लोक यांचं प्रबोधन करणं. साहजिकच निसर्गातील निरनिराळे घटक पर्वत, नद्या, जंगलं यांचा त्यांचा नुसता चांगला अभ्यास नव्हता तर योग्य दृष्टिकोनही होता.
एकदा खूप दंगा-गोंगाट सुरू असताना मुख्याध्यापक वर्गात आले नि रागानं म्हणाले ‘व्हॉट इज धिस रूल ऑफ् जंगल?’ मुलं एकदम शांत झाली. पण वर्गप्रमुखानं हात वर केला नि सांगितलं, ‘एक वेळ आमच्या गोंगाटाला फिश् मार्केट म्हणा कारण तिथे मासे मेलेले असतात नि गोंगाट जिवंत माणसं करत असतात. पण अशा गोंधळाला ‘रूल ऑफ् जंगल’ (जंगलराज) म्हणणं हा तेथील प्राण्यांचा अपमान आहे. कारण तिथं प्रत्येकजण ठरलेल्या शिस्तीत जगत असतो, असं तुम्हाला नाही वाटत?’ त्या बुद्धिमान विद्यार्थ्याच्या तर्कशुद्ध बोलण्यानं मुख्याध्यापक प्रभावित झाले. त्यांनी ते शब्द उच्चारल्याबद्दल माफीही मागितली. हा फार प्रेरणादायी प्रसंग आहे.
- आणखी एक तत्त्व आहे- ‘वन् मॅन्स मीट इज अनदर्स पॉयझन.’ सोपं उदाहरण म्हणजे जे शाकाहारी असतात ते मांसाहार करत नाहीत. तो जणू त्यांच्या दृष्टीनं विषमय असतो. सगळेच शाकाहारी बनले तर भाज्या पुरतील का? त्यांचे भाव गगनाला भिडणार नाहीत का? पण मुळात दुसर्याचा जीव घेऊन स्वतःचा जीव वाचवणं यात सुसंस्कृतपणा तो कुठला?
- संतांच्या शिकवणुकीचं जे मर्म आहे ते ‘जगा, जगू द्या नि जगवा’. एवढेच नव्हे तर सर्वांना प्रेमानं जगायला शिकवा.’ रस्त्यावरची भटकी कुत्री नि मोकाट जनावरंसुद्धा आपल्याशी मित्रासारखा व्यवहार करू शकतात. पण या बाबतीत पुढाकार अर्थातच मानवानं घेतला पाहिजे. पण झाडं निर्दयपणे तोडणार्यांना – ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे कोण शिकवणार?
- यासाठीच ‘वसुंधरा दिवस, जागतिक पर्यावरण, हवामान दिवस असे साजरे केले जातात. पण त्यांचे उत्सव किंवा इव्हेंट बनण्याऐवजी ठोस कार्यक्रम हाती घेणं महत्त्वाचं आहे. पण ज्या प्रगत राष्ट्रांनी पुढाकार घ्यायला हवा तेच ‘वीरभोग्या वसुंधरा’ या न्यायानं इतरांना उपदेश करून निसर्गाला, सृष्टीला माता मानणं सोडून दासीसारखा तिचा भोग घेत आहेत.
- सुसंस्कृत समाजाचं स्वप्न आहे- ‘वसुधैव कुटुंबकम्’. यात एक तिळ जरी मिळाला तरी तो सात जणांनी वाटून घ्यावा नि एकमेकांची सेवा करावी. यालाच म्हणतात ‘केअरिंग अँड् शेअरिंग’! – असे संस्कार बालवयापासूनच घरी व शाळेत घडवले गेले पाहिजेत.
कोविड कोरोनानं धोक्याची घंटा वाजवली आहेच. आपण ती ऐकली मात्र पाहिजे. ‘लिव्ह अँड् लेट् लिव्ह’- ‘जगा- जगू द्या – जगवा!’ अशा आचरणासाठी फक्त एक गोष्ट आवश्यक आहे – माणसानं माणूस बनायचं. माणुसकीनं वागायचं.