भारताकडे येणाऱ्या दोन एलपीजी जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. या जहाजांमध्ये 94,000 मेट्रिक टन एलपीजी आहे. या दोन्ही जहाजांना भारतीय नौदल संरक्षण देत आहे.
सरकारच्या माहितीनुसार, ही दोन्ही जहाजे या आठवड्यात मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी, भारतीय ध्वज असलेले चार एलपीजी टँकर या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून आधीच गेले आहेत, तर इतर तीन सध्या पश्चिम भागात आहेत.
सरकारने सांगितले की, या प्रदेशात एकूण 18 भारतीय जहाजे आणि 485 भारतीय खलाशी अजूनही उपस्थित आहेत. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश आहे. देशाच्या गरजांपैकी सुमारे 60% गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात, ज्यापैकी 90% आयात मध्य-पूर्वेकडून होते.
भारतीय नौदल सज्ज
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानली जाते आणि जागतिक तेल वाहतुकीचा मोठा भाग या मार्गावरून होतो.
सुरक्षेसाठी उपाय
या भागात कार्यरत असलेली जहाजे व नाविकांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांबाबत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. भारत सरकार पूर्णपणे येथील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
इंधन साठा पुरेसा
आखातात युद्धजन्य परिस्थिती असली तरी देशात सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सरकार वारंवार करत आहे. तसेच अतिरिक्त एलएनजी आणि आरएलएनजीची व्यवस्था करण्यात येत आहे.