हॉकी संघाला तृतीय क्रमांक

0
74
Odisha Men's Hockey World League Final Bhubaneswar 2017 Match id:21 India v Germany Foto: Harmanpreet Singh (Ind) scored 2-1 COPYRIGHT WORLDSPORTPICS FRANK UIJLENBROEK

भारताने काल जर्मनीला २-१ अशा फरकाने पराभूत करत हॉकी वर्ल्ड लीगमध्ये कांस्यपदकावर आपले नाव कोरले. भुवनेश्‍वरमधील कलिंग मैदानावर झालेल्या तिसर्‍या-चौथ्या स्थानासाठीच्या सामन्यात गोलरक्षक सूरज कारकेराच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला तिसरे स्थान मिळविणे शक्य झाले. ऑस्ट्रेलियाने २-१ असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अंतिम फेरीत जाण्याच्या आशांना अर्जेंटिनाने सुरुंग लावल्यानंतर कांस्यपदकासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी सावध सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीला जर्मन खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंना चकवत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र मध्यफळी व आघाडीफळीतील समन्वयाच्या अभावामुळे अखेरच्या क्षणाला त्या गोलमध्ये परावर्तित करण्यात जर्मनीला अपयश आले. भारताच्या सतर्क बजावफळीचा प्रत्ययही यावेळी जर्मनीला आला. सुरुवातीला दबावात खेळणार्‍या भारताच्या खेळाडूंनी दुसर्‍या सत्रात जबरदस्त खेळ करत २१व्या मिनिटाला गोल केला. आकाशदीपने दिलेल्या पासवर एस व्ही. सुनीलने हा गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर पाहुण्या जर्मनीने ३६व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. जर्मनीच्या मार्कने शानदार गोल करत सामना रंगतदार केला. चौथे सत्र सुरू होईपर्यंत सामना १-१ बरोबरीत होता. ५१व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि सामना संपेपर्यंत भारताने २-१ अशी आघाडी कायम राखली आणि कांस्यपदकावर नाव कोरले.