जीतू, हिनाला कांस्य

0
91

जपानमधील वाको सिटी येथे सुरू असलेल्या १०व्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत पिस्तोल प्रकारात भारताच्या जीतू राय व हिना सिद्धू यांनी रविवारी कांस्यपदक जिंकले. जीतूने आपल्या प्रकारात २१९.६ गुण घेत शहजारला थोडक्यात मागे टाकले. यानंतर शहजार रिझवी व ओमकार सिंग यांच्यासह मिळून भारताला सांघिक सुवर्णपदकदेखील मिळवून दिले. हिनाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तोलमध्ये वैयक्तिक कांस्य पदकाची कमाई केली. महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा हीना एकमेव भारतीय होती. २१७.२ गुणांसह तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जपानच्या युकारीने २४५.३ गुणांसह सुवर्ण तर मंगोलियाच्या गुंडेगमाने २४१.६ गुणांसह रौप्य पदक पटकावले. हीनाने श्री निवेता परमांथम व हरवीन श्राव यांच्यासह मिळून भारताला सांघिक रौप्य पदक प्राप्त करून दिले. ज्युनियर पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात अनमोल जैन याने वैयक्तिक तिसरा क्रमांक मिळविला. त्याच्यासह गौरव राणा व अभिषेक आर्य यांनी मिळून सांघिक रौप्य पदक मिळविले. पहिल्या दोन दिवशी ११ पदके भारताने जिंकली होती. तिसर्‍या दिवसानंतर ४ सुवर्ण, ६ रौप्य व ७ कांस्य पदकांसह भारताची एकूण पदकसंख्या १७ झाली आहे.