हैदराबादमध्ये बीए.४ या ओमिक्रॉनच्या उपप्रकाराचा रुग्ण आढळला आहे. ओमिक्रॉनच्या या उपप्रकाराचा भारतातील हा पहिला रुग्ण आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमिक्रॉन बीए.४ हा विषाणू आढळला आहे. हैदराबादमधील रुग्ण समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी देशातील इतर शहरांमध्येही बीए.४ या उपप्रकाराचे रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवली आहे.
दक्षिण आफ्रिकामधून हैदराबादला आलेल्या व्यक्ती विमानतळावरील कोरोना चाचणीदरम्यान नमुने घेण्यात आले होते. जीनोम सिक्वेंसिंगमध्ये त्या व्यक्तीला ओमिक्रॉनच्या बीए.४ या उपप्रकाराची लागण झाल्याचे समोर आले. ९ मे रोजी तो व्यक्ती दक्षिण आफ्रिकेमधून हैदराबादला आला होता आणि १६ मे रोजी परत गेला.
भारतामध्ये बहुसंख्य लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे या नव्या प्रकाराचा भारताला जास्त धोका नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतात २२५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २२५९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर २० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १५०४४ वर पोहोचली आहे.