हैदराबादची लढत मातब्बर एटीकेविरुद्ध

0
114

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील जी.एम.सी. बालयोगी स्टेडियमवर तळातील हैदराबाद एफसीची लढत मातब्बर एटीकेविरुद्ध होणार आहे.
हैदराबादला पारडे फिरविण्याची नितांत गरज आहे. पदार्पण करीत असलेल्या या संघाचे आठ सामन्यांतून चार गुण आहेत. गेल्या पाच सामन्यांत फिल ब्राऊन यांचा संघ एकच गुण मिळवू शकला आहे.

दुसरीकडे एटीके तिसर्‍या क्रमांकावर आहे. आठ सामन्यांतून त्यांचे १४ गुण झाले आहेत. शनिवारी जिंकल्यास त्यांना आघाडी घेण्याची संधी असेल. हैदराबादला आतापर्यंत एकच विजय मिळाला आहे. यंदा त्यांना आंतोनिओ हबास यांच्या संघाविरुद्ध कोलकात्यामध्ये ०-५ अशी हार पत्करावी लागली. त्यांना या धक्कादायक निकालातून सावरावे लागेल.

हैदराबादचा बचाव यंदा सर्वांत खराब ठरला आहे. त्यांना १७ गोल पत्करावे लागले आहेत. दुसरीकडे एटीकेचा बचाव सर्वोत्तम असून त्यांनी १६ गोल केले आहेत. हैदराबादला अद्याप क्लीन शीट राखता आलेली नाही. त्यामुळे रॉय कृष्णा आणि डेव्हिड विल्यम्स यांच्या भेदक आक्रमणाला सामोरे जाण्यासाठी त्यांना सज्ज व्हावे लागेल.
हैदराबादला केवळ बचावच नव्हे तर आक्रमणातही समस्या जाणवत आहेत. त्यांना केवळ सातच गोल करता आले आहेत. चेन्नईयीन एफसीच्या पाच गोलांनंतर त्यांचा दुसरा क्रमांक आहे. त्यातच घरच्या मैदानावर हैदराबादला तीनच गोल करता आले आहेत. एकाही सामन्यात त्यांना पहिला गोल करता आलेला नाही आणि अशी वेळ आलेला हा स्पर्धेतील एकमेव संघ आहे.

एटीकेला मागील सामन्यात एफसी गोवाविरुद्ध १-२ असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांना विजयी मार्गावर परतण्याची इच्छा असेल. हैदराबादचे पारडे कमकुवत असले तरी घरच्या मैदानावर एटीकेला झुंजविण्याच्या निर्धाराने ते खेळतील.