ही माझी घरवापसी नव्हे, मी कॉंग्रेसचाच ः पायलट

0
213

मी नेहमी कॉंग्रेसचा भाग राहिलो असून त्यामुळे ही माझी घरवापसी नाही असे राजस्थान कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे. राजस्थान सरकारच्या कारभारासंबंधी आमचे जे आक्षेप आणि चिंता होती ती व्यक्त करणे गरजेचे होते असे पायलट म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘निकम्मा’ उल्लेख करत टीका केल्याने आपण दुखावलो असल्याचे पायलट यांनी सांगितले. अशा पद्धतीची टीका करण्यापासून नेहमी स्वत:ला नेहमी रोखतो. कारण लोकांना मी काय करतो हे माझ्या कामामधून दिसते. राजस्थानमध्ये मी काय काम केले हे तेथील लोकांनी पाहिले असल्याचे पायलट म्हणाले.

गेहलोत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना, मी कोणाचा कितीही विरोध केला तरी अशी भाषा वापरणार नाही. कुटुंबाकडून मला तशी शिकवण मिळाली आहे. गेहलोत हे माझे वरिष्ठ आहेत. आम्ही याआधीही एकत्र काम केले असून मला लोकांचा किती पाठिंबा आहे याची कल्पना आहे. त्यामुळे पदामुळे फरक पडत नाही.

आमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळेच आम्ही रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला. आम्ही कोणाकडूनही सुविधा घेत नव्हतो. आमचा खर्च आम्हीच उचलला, असे यावेळी पायलट म्हणाले.
दरम्यान, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार कॉंग्रेसमध्ये परतल्याने राजस्थानच्या इतर आमदारांत संतापाची भावना दिसून येत आहे. राजस्थानचे परिवहनमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी पायलट यांच्या गटातील एका आमदाराने आमच्यावर वाईट टीका केली होती. त्यामुळे आपल्याला संताप आला होता. त्याला उत्तर म्हणून आपण पायलट आमच्यानंतर राजकारणात आल्याचे असे म्हटले होतं, असे सांगितले.