हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील ६८ जागांसाठी तब्बल ४१२ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे राजकीय भवितव्य जवळपास ५६ लाख मतदार ठरवणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप आणि आप या पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. त्यामुळे मतदार कोणाच्या पाठिशी उभे राहतात हे जाणून घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सर्व सुविधा असणार आहेत. राज्यात ५६००० दिव्यांग मतदार आहेत, तर ८० वर्षांवरील मतदारांची संख्या १.२२ लाख एवढी आहे. तसेच ११८४ मतदार हे १०० वर्षांवरील आहेत. जवळपास ५६ लाख मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यात २७ लाख ८० हजार पुरुष, तर २७ लाख २७ हजार महिला मतदार आहेत.
राज्यातील १४२ मतदान केंद्रांची जबाबदारी महिला कर्मचारी सांभाळणार आहेत, तर ३७ मतदान केंद्रांची जबाबदारी दिव्यांग कर्मचारी सांभाळतील. निवडणूक आयोगाने ६८ विधानसभा क्षेत्रात ७८८१ मतदान केंद्रे तयार केली आहेत.
मागील निवडणुकीत भाजपने ४४ जागा जिंकत राज्यात सत्ता मिळवली होती. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. सद्य:स्थितीत भाजपकडे ४५, तर कॉंग्रेसकडे २२ आमदार आहेत. तसेच सीपीआईएमचा एक आमदार आहे.
हिमाचलमध्ये जगातील सर्वांत उंच मतदान केंद्र
निवडणूक आयोगाच्या पथकांनी काल राज्यातील मतदान केंद्रांवरील सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पथकाने १५,२५६ फूट उंचीवर असलेल्या जगातील सर्वांत उंच ताशिगंग मतदान केंद्राचा देखील दौरा करत पाहणी केली. या मतदान केंद्रावरील १०० टक्के मतदानाचे गेल्या वेळचा विक्रम कायम ठेवण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. ताशिगंगमध्ये ७५ लोकसंख्या असून, ५२ मतदार आहेत. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले होते.
१९८२ पासून आतापर्यंत दरवेळेस सत्ता परिवर्तन
हिमाचल प्रदेशमध्ये १९८२ पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन पाहायला मिळाले आहे. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना आलटून पालटून सत्ता मिळाली आहे. कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सत्ता काबीज करता आलेली नाही. यावेळेस ६८ पैकी २३ जागा अशा आहेत, ज्या ठिकाणी नवा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. २०१२ मध्ये कॉंग्रेसने भाजपला खाली खेचत सत्ता मिळवली होती, तर २०१७ मध्ये भाजपने निवडणुकीत विजय मिळवला होता.