हस्तक शोधा!

0
12

काही दिवसांपूर्वी दिल्लीत पकडल्या गेलेल्या ‘आयसिस’च्या तिघा दहशतवाद्यांनी गोवा – कर्नाटक सीमेवर पश्चिम घाटात आपला तळ वसवला होता आणि देशातील अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याच्या दृष्टीने व्यापक रेकी केली होती असे त्यांच्या तपासात उघडकीस आले आहे. गोवा पोलिसांना मात्र ह्या दहशतवाद्यांच्या पश्चिम घाटातील वास्तव्याची गंधवार्ताही नव्हती आणि हे तिघे दहशतवादी गोव्यात आलेले नव्हते असे सांगत आपली ही अनभिज्ञता झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालला आहे. आयसिसप्रेरित दहशतवादी अगदी गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते असाच ह्या घटनेचा अर्थ आहे. यापूर्वीही असे अनेक दहशतवादी वेळोवेळी गोव्यात आढळून आले. काही येथे स्फोट घडविण्याची रेकी करून गेले होते, तर काही येथे महिनोन्‌‍महिने वास्तव्यालाही होते. मात्र, इतर राज्यांतील दहशतवादविरोधी पथके येथे येऊन माहिती देईपर्यंत स्थानिक पोलीस दलाला त्याची काहीही खबर नव्हती. वेळोवेळी केवळ सुदैवानेच गोवा घातपाती कारवायांपासून बचावत आला आहे. आजवर असे असंख्य दहशतवादी गोव्याला लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करून गेले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक सूत्रधार डेव्हीड कोलमन हेडली कॅनडात पकडला गेला तेव्हा त्याने आपण गोव्यात येऊन रेकी करून गेलो होतो ह्याची कबुली दिली होती. इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासिन भटकळ हा तर गोव्यात वास्तव्याला होता. सूरतवर अणूबॉम्ब टाकण्यासाठी छोट्या आकाराचे अणूबॉम्ब बनवता येतील का ह्याची चाचपणी आपण करीत होतो, असे त्याने तपास यंत्रणांना नंतर सांगितले होते. कर्नाटकात वाहनचोरीत योगायोगाने पकडल्या गेलेल्या रियाजुद्दिन नावाच्या एका तरुणाने ह्या चोरीच्या वाहनांचा वापर गोव्यातील पर्यटनस्थळांवर स्फोट घडविण्यासाठी केला जाणार होता अशी कबुली दिली होती. त्याने कसाब बरोबर पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्याचे चौकशीत उघड झाले होते. सय्यद इस्माईल नावाचा एक दहशतवादी घातपाती कृत्यांसाठी केरी – पेडण्यात पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेताना पकडला गेला होता. इतकेच कशाला, यापूर्वीही एकदा दिल्लीत पकडल्या गेलेल्या दोघा दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या पुण्यातील मुख्यालयाबरोबरच गोव्यातील नावीक तळाला लक्ष्य करण्याची तयारी चालवलेली होती. त्यासाठी लष्कराची आणि निळ्या बत्तीची वाहनेही चोरली गेली होती. गोव्यात मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असल्यामुळे हे राज्य नेहमीच दहशतवादी शक्तींच्या रडारवर राहिले आहे हेच ह्या सगळ्या इतिहासातून स्पष्ट होते. अनेक दहशतवादी, नक्षली आणि कुख्यात गुंड आजवर गोव्यात वास्तव्य करून गेले, तरी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या ते गावीही नव्हते. दाऊद टोळीतील श्याम गरिकापट्टी हा डॉन साळगावात वास्तव्याला होता. छोटा राजनचा साथीदार उमेर उर रेहमान हा हरमलमध्ये पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर कुटुंबासह वास्तव्य करून होता. उडिसाचा नक्षलवादी नेता शंभू बेक गोव्यातच पकडला गेला होता. वेर्ण्यात पकडल्या गेलेल्या एकाचे म्हापशात वास्तव्य होते. कोणीही यावे आणि गोव्याला आपले आश्रयस्थान बनवावे आणि स्थानिक यंत्रणांना त्यांचा थांगपत्ताही असू नये ही अक्षम्य बेफिकिरी आहे आणि ती कधी ना कधी गोव्याच्या अंगलट आल्याखेरीज राहणार नाही. गोवा कर्नाटक सीमेवर कर्नाटकच्या जंगलात वास्तव्य केलेल्या दहशतवाद्यांचे गोव्यात काही लागेबांधे असतीलच ना? गोवा – कर्नाटक सीमेवरील जंगलात ते केवळ वास्तव्यालाच नव्हते, तर त्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडविण्याच्या अनेक चाचण्याही त्या जंगलात घेतल्या होत्या. लवासा, महाबळेश्वर, हुबळी, उडुपी, केरळ, नलामल्लाच्या डोंगररांगा, चंदौली आदी निवांत ठिकाणी तळ ठोकता येतो का ह्याची चाचपणी घेऊन ही टोळी शेवटी पश्चिम घाटात गोवा – कर्नाटक सीमेवर स्थिरावली होती. अनेक महिने ते तेथे वास्तव्यास होते. विशेष म्हणजे हे तिघेही दहशतवादी उच्चशिक्षित आहेत. बी. टेक पदवीधारक आहेत. एक तर दिल्लीच्या जामिया मिलियामध्ये पीएच. डी. करतो आहे. त्यानेच आयईडी बनवले होते. राजस्थानच्या पश्चिम भागात तो तळ शोधत होता, कारण तेथून दिल्लीत दहशतवादी कृत्य करणे त्यांना सोपे बनले असते. केवळ दिल्लीच नव्हे, तर मुंबई, सूरत, वडोदरा, गांधीनगर, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणांची रेकी त्यांनी केलेली होती. हे लोक वेळीच पकडले गेल्याने दहशतवादी हल्ल्याचे हे संकट टळले असले, तरी भविष्यातील अशी संकटे टाळायची असतील, तर ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यांचे गोवा आणि कर्नाटकातील धागेदोरे शोधले जाणेही तितकेच जरूरी आहे. प्रत्येकवेळी दैव आपल्याला अनुकूल असेलच असे नाही.