हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूपच बदलले : साहू

0
111

पणजी (बबन भगत यांजकडून)
मान्सून आता पूर्वीसारखा राहिला नसून हवामान बदलामुळे पावसाचे एकूण स्वरूपच बदलून गेले आहे, असे पणजी वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की आता जो पाऊस पडतो व पूर्वी जो पाऊस पडायचा यात बराच फरक आहे. ७० व ८० च्या दशकात एकदा पाऊस सुरू झाला की तो तीन-तीन, चार-चार दिवस व कधी कधी आठ-आठ दिवसही पाऊस थांबायचे नाव घ्यायचा नाही. सतत धो-धो पाऊस कोसळत रहायचा. तेव्हा पावसाला सातत्य होतं.
पण आता हवामान बदलामुळे पावसाचे एकूण स्वरूपच बदलून गेलेले आहे. मात्र, त्यात अचानक बदल झालेला नसून हवामान बदलामुळे कालानुरूप हा बदल होत गेलेला असल्याचे ते म्हणाले. आता ७०,८० च्या दशकाप्रमाणे सतत काही दिवस पाऊस पडत नाही. पण पडला तर एकदम पूर येईपर्यंत तो पडत असतो. आणि दडी मारली तर पुन्हा येण्याचं नाव घेत नाही. मानव जातीने निसर्गाशी जो खेळ मांडला आहे त्यामुळे पावसाचे गणित बदलले आहे आणि पर्यायाने त्याचे स्वरूपही बदलले आहे असे शास्त्रज्ञ असलेले मोहनलाल साहू म्हणाले.
वन संपदा व पाऊस याचे जवळचे नाते आहे याची मानवजातीला जाणीव आहे. पण तरीही विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे.
कॉंक्रिटीकरणामुळे भूगर्भात
पाणी मुरत नाही : साहू
विकासासाठी सध्या सर्वत्र कॉंक्रिटीकरण केले जाते. मात्र, कॉंक्रिटचे रस्ते, कॉंक्रिटची गटारे यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी व साठवण कमी होत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी जमीनीत मुरत असते. पण कॉंक्रिटचे रस्ते व कॉंक्रिटची गटारे यामुळे हे पावसाचे पाणी भूगर्भात जाऊ शकत नाही. ते वरच राहते व नंतर वाहून समुद्रात जाते असे साहू म्हणाले. पूर्वी कॉंक्रिटची गटारे व रस्ते नव्हते. त्यामुळे मोठा पाऊस आला की पाणी वाहून न जाता ते जमिनीवर साठून रहायचे व नंतर ते पाणी भूगर्भात जात असे. त्यामुळे भूगर्भात पाण्याची पातळी वाढत असे. पर्यायाने गावातील विहिरींत मुबलक पाणी मिळत असे. पाणी वाहून न जाता ज्या ज्या गावात पाणी साठून राहते ते गाव पाण्याच्या बाबतीत समृद्ध असतात, असे साहू यांनी स्पष्ट केले.
हवामान अंदाजासाठी
डॉप्लर रडार महत्त्वाचे
पणजी हवामान खात्यात आठवडाभरात डॉप्लर रडार बसवण्यात येणार असून या रडारमुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार असल्याचे ते म्हणाले. या रडारमुळे आकाशातील ढगाचा वेग व हालचाली यांचे अचूक असे मोजमाप डॉप्लर रडारद्वारे होणार असून त्यामुळे पाऊस व हवामान याचे अचूक असे अंदाज बांधता येतील. गोव्यापासून ३०० ते ५०० कि.मी. अंतरापर्यंतचा वेध हे रडार घेऊ शकेल. ३०० कि.मी. पर्यंतच्या अंतराचा अगदी अचूक तर त्यापुढील अंतराचा कमी पण बर्‍यापैकी वेध हे रडार घेऊ शकणार असल्याचे साहू यांनी स्पष्ट केले.