गोवा तसेच शेजारचे महाराष्ट्र व कर्नाटक अशा तिन्ही राज्यांत यंदा हवामान बदलामुळे (अवेळीचा पाऊस, उष्णता आदी) यंदा आंब्याचे पीक धोक्यात आले आहे. गोव्यात गोव्याचा मानकुराद व मुसराद या दोन अत्यंत लोकप्रिय आंब्यांच्या जातींबरोबरच महाराष्ट्रातील हापूस तसेच कर्नाटक राज्यांतून येणाऱ्या विविध जातींच्या आंब्यांची आवक कमी झाली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अजूनतरी बाजारपेठेत आंब्यांचे दर चढेच असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा खरेदी करणे आवाक्याबाहेरचे बनले आहे.
यंदा जेव्हा फेब्रुवारी महिन्यात मानकुराद, हापूस आदी आंबा जेव्हा बाजारात दाखल झाला तेव्हा त्याचे दर डझनामागे सात ते आठ हजार रु. असे दर होते. मात्र, नंतर मार्च महिन्यात जेव्हा आवक वाढली तेव्हा दर पाच हजारांपर्यंत खाली आले होते. आता एप्रिल महिन्याच्या प्रारंभी मानकुराद आंब्याचे दर हे 2 हजार ते दीड हजार रुपये (आकारानुसार) तर हापूसचे दर हे 1700 ते 1500 रु. प्रती डझन असे आहेत. मात्र बाजारात या आंब्यांची आवक ही तुलनेने बरीच कमी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मुसराद आंब्याचे पीक तर यंदा एवढे कमी झालेले आहे की हा आंबा यंदा बाजारात दृष्टीसही पडत नाही अशी स्थिती असल्याचे पहावयास मिळाले.
मानकुरादचा दर 1 हजारच्या वर
मोठ्या आकाराचा व चवदार मानकुराद आंबा प्रतीडझन 2 हजार रु. तर छोट्या आकाराचा व हलक्या प्रतीचा मानकुराद 1 हजार रु. प्रती डझन असा उपलब्ध आहे. देवगड हापूस (मोठ्या आकाराचा व चवदार) प्रती डझन 1600 तर रत्नागिरीचा 1400 प्रती डझन असे भाव आहेत. तर मडगाव व पणजीत मुसराद आंबा अल्प प्रमाणात दिसत आहे.
ऑगस्ट 2023 साली गोव्याच्या मानकुराद आंब्याला ‘जीआय’ दर्जा प्राप्त झाल्याने आता या आंब्याची मागणी वाढली आहे. देश-विदेशांत या आंब्याला वाढती मागणी असताना पीक धोक्यात आल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा प्रचंड नुकसान झालेले असून या पार्श्वभूमीवर सरकारकडून भरपाई मिळावी, अशी मागणी आंबा उत्पादकांकडून होऊ लागलेली आहे. महाराष्ट्रातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांनीही (देवगड व रत्नागिरी) यंदा हापूस आंब्याचे उत्पादन प्रचंड घटले असल्याने आपले मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट केलेले आहे. या हवामान बदलाचा फटका हा गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांनाही बसला आहे.
गोव्यात आंब्यांची आवक कमी
आंबा पिकावर परिणाम झालेला असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतूनही यंदा गोव्यात म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात आंब्याची आवक होऊ शकलेली नाही. आंध्र प्रदेशातून यंदा सिंधुरी या आंब्याची खूपच कमी प्रमाणात आवक झाली असल्याचे आंबा विक्रेत्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील हापूस आंबा गोव्याच्या बाजारपेठेत भरपूर यायचा. पण मुळातच उत्पादन कमी असल्याने त्याची आवकही म्हणावी तेवढी होऊ शकलेली नाही. परिणामी आंब्याचे दर म्हणावे तेवढे खाली येऊ शकलेले नसल्याने मध्यमवर्गीयांना अद्याप आंबा परवडेनासा झाला आहे.
यंदाचे आंबा पीक हे गेल्या 10 वर्षांतील सर्वांत कमी पीक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मे महिन्यात आंब्यांची थोडी आवक वाढल्यास दर खाली येण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
मानकुरादचे उत्पादन 40 टक्क्यांनी कमी
मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचा सर्वांत लोकप्रिय असलेल्या मानकुराद आंब्याचे उत्पादन यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी कमी झालेले आहे. उष्णता व अनिश्चित मोसमी वातावरण यामुळे एक तर पीक येण्यास उशीर झाला. शिवाय पीकावर परिणाम झाल्याने त्यात घट झाली. ही घट तब्बल 40 टक्के एवढी असल्याचे शेतकरी तसेच आंबा व्यवसायातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.