हवाई प्रवासात विघ्ने

0
13
  • धनंजय जोग

डायना डिसोझाने‘कॅलिफोर्निया एयर’ यांच्याकडून कोणतेही तिकीट खरेदी केलेले नाही. या दोन विमान कंपन्यांमधील अंतर्गत करार काय आहे याची डायनास काहीही माहिती नाही. कंपन्यांनी स्वतः एकमेकांच्या सोयीसाठी केलेला तो करार होता.

डायना डिसोझा (सगळ्या व्यक्ती व कंपन्यांची नावे बदलली आहेत) कायदा पदवी परीक्षेत पहिली आली. वडिलांनी वचन दिल्याप्रमाणे तिला अमेरिकास्थित आत्याकडे महिनाभर जाण्यास परवानगी मिळाली. परदेश प्रवासास निघण्यास ती सज्ज झाली. ‘मुंबई एयर’ विमान कंपनीच्या पणजीतील ऑफिसात जाऊन तिने गोवा-मुंबई-न्यूयॉर्क-सान फ्रान्सिस्को आणि त्याच मार्गे परत असे पैसे भरून तिकीट आरक्षित केले. जातानाचा प्रवास आलबेल झाला. डायना सान फ्रान्सिस्कोला सुखरूप व वेळेवर पोचली. परतीच्या प्रवासात मात्र सुरुवातीपासूनच अडचणी उद्भवल्या. आपल्यापरीने त्यांना तिने तोंड दिले व 6 जूनला सान फ्रान्सिस्को येथून निघून 8 जूनला ती गोव्यात पोहोचली.

अडचणी काय आल्या ते आपण बघूच, कारण त्यासाठीच तर ‘मुंबई एयर’विरुद्ध तक्रार घेऊन डायना आमच्यासमोर आली. ‘मुंबई एयर’ने तिकीट घेतानाच डायनास सांगितले होते की अमेरिकेतील अंतर्गत प्रवासासाठी (न्यूयॉर्क-सान फ्रान्सिस्को आणि परत) त्यांना परवानगी नाही. अमेरिकास्थित सहयोगी कंपनी ‘कॅलिफोर्निया एयर’ यांच्या विमानातून हा प्रवास होईल. पण संपूर्ण प्रवासाचे तिकीट ‘मुंबई एयर’नेच दिले होते.
सान फ्रान्सिस्को विमानतळावर 6 जूनला पोहोचताच डायनाच्या अडचणींस सुरुवात झाली. कॅलिफोर्निया एयरच्या स्वागतकक्षात तिला कळले की तिचे नाव त्यांच्या कॉम्प्युटरवर नाही. पण हे लक्षात येईपर्यंत तिच्या तीन बॅगांपैकी दोन ‘चेक-इन’ होऊन धडधडत धावत्या सामानपट्यावरून अवाढव्य विमानतळाच्या पोटात गडप झाल्या होत्या. सांगितल्याप्रमाणे डायना आपली तिसरी बॅग घेऊन नावाचा घोटाळा निस्तरण्याची वाट पाहत विमान-कंपनीच्या ‘काऊंटर’शेजारी उभी राहिली. डायनाने स्वतःदेखील मुंबई एयरला फोन केला पण शून्य मदत व उद्धट उत्तरे मिळाल्याचे ती सांगते.

शेवटी कॉम्प्युटरमध्ये नाव न मिळूनदेखील फोनाफोनी करून कॅलिफोर्निया एयरने विमान-उड्डाणास 5 मिनिटे बाकी असताना डायनास ‘इमर्जंसी बोर्डिंग पास’ दिला. तिसरी बॅग ‘चेक-इन’ करणे आता शक्य नव्हते. तिला सांगितले गेले की तिने ही बॅग हातात घेऊन विमानाच्या दाराशी कर्मचाऱ्यास द्यावी. त्याप्रमाणे डायनाने केले. कर्मचारी बॅगेला कॅलिफोर्निया एयरचा ‘टॅग’ लावेपर्यंत थांबून नंतर ती विमानात शिरली.
न्यूयॉर्क येथे कॅलिफोर्निया एयरच्या कक्षाने सांगितले की, पुढील (न्यूयॉर्क-मुंबई) प्रवासासाठी वेगळ्या टर्मिनलवर असलेल्या ‘मुंबई एयर’च्या कक्षाशी संपर्क साधावा. वास्तविक हे बरोबर होते. पण मुंबई एयरच्या स्वागत कक्षाने तिला परत कॅलिफोर्निया एयरकडे पाठवले. अशी टोलवा-टोलवी होऊन शेवटी तिला बोर्डिंग पास मुंबई एयरनेच दिला. तिने बॅगांच्या झालेल्या घोटाळ्याचे स्पष्ट वर्णन दोन्ही विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. पण मुंबईस पोचताच डायनास आढळले की तीनपैकी एकही बॅग आलेली नाही. मुंबई एयरच्या अधिकाऱ्यांनी तिचे तीनही ‘बॅगेज टॅग्स’ घेतले व ‘सामान गहाळ’ झाल्याचा अधिकृत अर्ज लिहून घेतला.

या सगळ्यामुळे 8 जूनला डायना गोव्यात सामानाशिवायच पोहोचली. 12 जूनला तिच्या दोनच बॅगा मुंबई एयरकडून दिल्या गेल्या. तिसरी 23 किलो वजनाची बॅग- जी तिने विमानाच्या दारात दिली होती- ती कधीच मिळाली नाही. खूप पत्र-व्यवहार व ई-मेल्स झाल्यावर मुंबई एयरने या गहाळ बॅगेची रु. 7,736/- भरपाई देऊ केली. गहाळ बॅगेला ‘हँड बॅगेज’ समजून हा हिशेब होता. डायनाने ही अल्प रक्कम नाकारली आणि आयोगात तक्रार घेऊन आली. प्रार्थनेत तिने गहाळ बॅग व सामानाची किंमत रु. 1,68,000/-, वर मनस्ताप व दिरंगाईसाठी रु. 5 लाख; आणि रु. 15,000 खटल्याचा खर्च असे मागितले. हरवलेल्या बॅगेतील सामानाची तिने मुंबईत अर्जासोबत दिलेली यादी व नंतरची पत्रे/ई-मेल सादर केली.
मुंबई एयरने बचावात असे आक्षेप नोंदविले की ‘कॅलिफोर्निया एयर’ ह्यांना देखिल प्रतिवादी नेमायला हवे होते जे केलेले नाही. शिवाय बॅग अमेरिकेत गहाळ झाल्यामुळे भारतातिल आमच्या आयोगाला निवाड्याचा अधिकार नाही. न्यूयॉर्कमधे उतरताच डायनाने स्वतः तिसऱ्या बॅगेचा ठावठिकाणा शोधणे जरूरी होते पण तसे तिने केले नाही. शेवटी, हरवलेली बॅग ‘चेक-इन’ केलेली नसल्यामुळे तिला ‘हँड बॅग’च समजले जाऊ शकते. अशी हँड-बॅग 8 किलो वजना पर्यंतच न्यावयाची परवानगी असते. त्याची भरपाई 20/- डॉलर प्रति किलो हिशोबाप्रमाणे डॉ.160/- म्हणजेच रु.7,736/- होतात, जे आम्ही देऊ केले पण डायनाने नाकारले. ह्या अशा परिस्थितीत ‘कॅलिफोर्निया एयर’ व डायना यांनी अमेरिकेत केलेल्या चुकांसाठी मुंबई एयरला दोषी ठरविले जाऊ नये.

मुंबई एयरने पुढे आमच्या लक्षात असे आणून दिले की डायना प्रवास करून 8 जूनला परतली. 12 जूनला तिच्या दोन बॅगा परत दिल्या गेल्या. पण तिची तक्रार दोन वर्षांनंतरच्या 14 जूनची आहे. अर्थात दोन वर्षांच्या वर सहा किंवा दोन दिवस (आपण मूळ तारीख 8 किंवा 12 धरू त्यावर) उलटले आहेत. म्हणजेच तक्रार कालबाह्य झालेली आहे. पण आमचे मत वेगळे होते. दोन वर्षांची मुदत ही समोरच्याची चूक लक्षात आल्यावर किंवा समोरच्याने ती नाकारल्यावर सुरू होते. डायनाचे परत येणे किंवा दोन बॅगा मिळणे या तारखांना महत्त्व नाही. मुंबई एयरने जेव्हा पत्राद्वारे कळविले की तिसरी बॅग गहाळ झालेली असून आता मिळणे शक्य नाही, तेव्हापासून ही मुदत सुरू होते. हे पत्र डायनाला 14 ऑगस्टला मिळाले. याचा अर्थ तक्रारीस उशीर झालेला नसून, दोन वर्षांच्या मुदतीतच केलेली आहे. एवढेच नव्हे तर मुंबई-एयरच्या मते जो दोन किंवा सहा दिवसांचा उशीर झालेला आहे, तो जरी ग्राह्य धरला तरी आयोगाला सयुक्तिक कारणे असल्यास उशीर माफ करण्याचा अधिकार आहे.

डायनाने स्वतः तोंडी युक्तिवाद सादर करून नव्याने मिळविलेल्या कायदा पदवीचे सार्थक केले. अर्थात, वाचकांना माहीतच आहे की ग्राहक आयोगासमोर कोणीही आपले प्रकरण लढवू शकतो- वकील नेमण्याची गरज नाही. मुंबई एयरच्या वकिलांनी तोंडी युक्तिवादात एक नवा मुद्दा मांडला तो असा की हरवलेल्या- तिसऱ्या बॅगचा- टॅग क्रमांक इतर दोन बॅगांच्या टॅग क्रमांकांशी मिळता-जुळता नाही. पण आमचे निरीक्षण असे होते की उलट हा तिसऱ्या टॅगचा वेगळा नंबर डायनाचेच म्हणणे सिद्ध करतो. तिसरा टॅग तिला ऐनवेळी, विमान उड्डाणास 5 मिनिटे असताना दिलेला. दोन बॅगा त्यापूर्वी तासाहून आधी चेक-इन झालेल्या. या मधल्या तासाभराच्या काळात इतर अनेक प्रवाशांच्या बॅग्सना टॅग्स दिले गेले असणार. तिसऱ्या टॅगचा नंबर वेगळा असणे साहजिकच आहे.

डायनाने संपूर्ण प्रवासाचे तिकीट मुंबई एयरकडूनच घेतलेले. त्यांच्याच तिकिटावर तिने अमेरिका अंतर्गत (न्यूयॉर्क- सान फ्रान्सिस्को व परत) प्रवासदेखील केला. तिने ‘कॅलिफोर्निया एयर’ यांच्याकडून कोणतेही तिकीट खरेदी केलेले नाही. या दोन विमान कंपन्यांमधील अंतर्गत करार काय आहे याची डायनास काहीही माहिती नाही. कंपन्यांनी स्वतः एकमेकांच्या सोयीसाठी तो केलेला. तेव्हा डायना ‘कॅलिफोर्निया एयर’ची ग्राहक नाही व म्हणून त्यांना प्रतिवादी न नेमल्याचा मुंबई एयरचा आक्षेप आम्ही फेटाळला.
चुकीची जबाबदारी मुंबई एयर यांचीच असे ठरविल्यावर डायनाला भरपाई किती मिळावी हे ठरविण्यास आम्ही ‘कॅरेज बाय एयर ॲक्ट 1972′ या कायद्याचा आधार घेतला. जगभर लागू असलेला हा कायदा विमान कंपन्यांच्या सामान वाहतुकीतील जबाबदाऱ्या ठरवितो. या कायद्यान्वये विमान कंपनीकडून 1,131 एस.डी.आर. (स्पेशल ड्रॉइंग राइट्स) एवढे आम्ही प्रवाशाला देऊ शकतो. या ‘एस.डी.आर’ची किंमत रोज बदलत असते. डायनाने प्रवास केला त्यादिवशी 1 ‘एस.डी.आर’ = रु. 87/- होता. या हिशेबाने रु. 98,397 होतात. पण हा आकडा म्हणजे मुंबई एयरवर आम्ही लादू शकण्याची सर्वोच्च मर्यादा. आम्ही डायनाने सादर केलेल्या गहाळ सामानाच्या यादीवरदेखील नजर टाकली. शेवटी आम्ही डायनास रु. 75,000, त्यावर तक्रार नोंदवल्याच्या तारखेपासून 9% व्याज आणि रु. 5000/- खर्च देववला.
एखाद्या वाचकाला या प्रकरणाविषयी किंवा आधीच्या लेखांविषयी प्रश्न वा टिप्पणी असल्यास अथवा ग्राहक आयोगात फिर्याद करायची असल्यास मी थोडक्यात मार्गदर्शन करू शकेन. त्यासाठी ई-मेल वरपक्षेसूरहेे.लेा