हरवळे धबधब्यात बुडून दिल्लीतील युवकाचा मृत्यू

0
79

हरवळे येथील धबधब्यावर हर्ष राजेश कुमार (वय २१, रा. उत्तमनगर, दिल्ली) या युवकाचा काल सायंकाळी बुडून मृत्यू झाला. हरवळे धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा युवक वाहून गेला. दरम्यान, या धबधब्यावर बुडून मृत्यू होण्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे.

दिल्लीतून गोवा पर्यटनासाठी चार युवकांचा एक गट शनिवारी कळंगुट येथे दाखल झाला होता. हे युवक काल सायंकाळी चारच्या सुमारास हरवळे धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना पाण्यात उतरू नका, असा सल्ला दिला. तसेच या ठिकाणी पाण्यात उतरू नये, असा फलक लावलेला आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हे सर्वजण पाण्यात उतरले. धबधब्यावर स्नानाचा आनंद लुटल्यानंतर सर्वजण पाण्यातून बाहेर आले होते. त्यानंतर हर्ष हा पुन्हा पाण्यात उतरला आणि थोड्या वेळातच तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. यावेळी त्याच्यासोबतच्या युवकांनी मदतीसाठी आरडाओरडा केली; मात्र त्याचा पत्ता लागला नाही.

या घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी श्रीपाद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर साडेसातच्या सुमारास हर्ष याचा मृतदेह सापडला. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी तो गोमेकॉत पाठवण्यात आला आहे.