दरम्यान, आग इतकी भयंकर होती की ती आटोक्यात आणताना अग्नीशामक दलास अथक परिश्रम करावे लागले. आगीचे तांडव नृत्य रोखण्यासाठी बागायतदारांबरोबर स्थानिक ग्रामस्थ हरमल पंचक्रोशी हायस्कूल व अवरलेडी ऑफ माऊण्ट कार्मेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही अथक परिश्रम घेतले. आठ तास आगीचे तांडव नृत्य चालू होते.
काल गुरुवार १२ रोजी सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यान कोरखण भागातून लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले व अवघ्या मिनिटांच्या आत आग पुढे पुढे सरकत गेली व काही क्षणातच आगीचे प्रचंड लोळ उसळू लागले. केवळ १५ मिनिटांच्या आत आग चणईवाडा, वस्तवाडा व कोळम तसेच केरी पठारावर पोहोचली व क्षणार्धात सर्व काजू व आंबा बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या.
यात चणईवाडा भागात सर्वे नं. २०३ मध्ये ४० हजार चौ. मी. जमिनीत २,५०० च्या आसपास काजूची उत्पन्न देणारी कलमे, काजूची मोठी झाडे आगीत पूर्णता बेचिराख झाली. ही बागायत राघू गावडे यांच्या मालकीची होती. त्याशिवाय प्रमोद गावडे, जानकी रामकृष्ण गावडे, सुनील विठू गावडे, रमेश तुकाराम गावडे यांच्या मालकीच्या काजू कलमांचाही त्यात समावेश आहे.
कोरखणवाड्यावरील मुकुंद कोरखणकर, सुरेश कोरखणकर यांची १०० काजू कलमे, मधलावाडा व वस्तवाडा भागात लागलेल्या आगीत नवसो वस्त, विलास वस्त, सुनील वस्त, राजन वस्त, रघुनाथ वस्त, नामदेव वस्त, उदय वस्त, मुकुंद वस्त, झीलू वस्त, कमल वस्त, वितोरिन फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस आदी शेतकर्यांची ३५० च्या आसपास उत्पन्न देणारी कलमे जळून गेली.
त्याशिवाय खालचावाडा भागातील संदीप वायंगणकर, तसेच इतर वायंगणकर कुटुंबीयांच्या बागायतीची नासाडी झाली. गावडे, वस्त, वायंगणकर, नाईक, फर्नांडिस आदी अनेक कुटुंबियांच्या बागायतींची नासाडी होऊन ऐन हंगामात बागायतदारांना अंदाजे ९०-९५ लाखांच नुकसान सोसावे लागले आहे. राघू गावडे व राजू गावडे यांनी पेडणे अग्निशामक दल, शेतकी खाते, मामलेदार, जिल्हाधिकारी हरमल-पोलीस स्थानकाला दुर्घटनेची माहिती दिली. पेडणे अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी एक तास उशिरा पोहोचले परंतु आग डोंगराळ भागात लागलेली असल्यामुळे वाहन त्याठिकाणी नेणे शक्य नसल्याने तिथेच बादलीतील पाण्याद्वारे आग विझविण्याचे प्रयत्न होऊ लागले.
राघू गावडे यांच्या मालकीच्या बागायतीबरोबर पाणी खेचण्याचा पंप व वीजवाहिन्याही आगीत जळून खाक झाल्याची माहिती श्री. गावडे यांनी दिली. पेडणे व म्हापसा अग्निशामक दलालाही या ठिकाणी पाचारण करूनही त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. दुर्घटनास्थळी पेडणेचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर, मामलेदार सतीश देसाई, मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री संगीता परब, सरपंच सूचना गडेकर, उपसरपंच प्रगती मयेकर, स्थानिक पंच प्रदीप नाईक, पेडणे अग्निशामक दलाचे प्रमुख तुकाराम सावळ देसाई, म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी दत्ताराम रेडकर, जवान स्वप्नील नागवेकर, उमेश शेट्ये उपस्थित होते. दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील हरमल पोलीस स्थानक व पेडणे पोलीस स्थानकाचे अधिकारी तसेच पेडणे शेतकी खात्याचे अधिकारी शेवटपर्यंत पोहचू शकले नाहीत.